पणजी, काणकोण व कुळे, दि. १५ (प्रतिनिधी)ः सोसाट्याचे वारे, विजेचा गडगडाट आणि अवेळी कोसळलेल्या पावसाने सोमवारी राज्याला जोरदार तडाखा दिला. काणकोण भागातील वीजपुरवठा, दळणवळण आदींवर याचा परिणाम झाला. तसेच, संध्याकाळच्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली, यामुळे आधीच कुर्मगतीने चालणाऱ्या राजधानीतील वाहनांचा वेग आखणी मंदावला होता. दरम्यान, सातत्याने दणका देणाऱ्या या अवेळी पावसामुळे शेतीवर मिळणाऱ्या उत्पन्नाने दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवाळे निघण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
काणकोणात पुन्हा कहर
गेल्या दोन-तीन दिवसांपासून संध्याकाळच्या वेळेस अचानक हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी राज्यातील बहुतांश भागात उपस्थिती लावली. यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता व भर संध्याकाळी दाट काळोख पसरला होता. याचा सर्वाधिक फटका काणकोण भागाला बसला. सुमारे दीड तास कोसळलेल्या पावसामुळे श्रीस्थळ येथील ओहोळ दुथडी भरून वाहत होते. यावेळी दूरध्वनी यंत्रणा ठप्प झाली होती, वीजपुरवठा खंडित झाला होता.
भारतीय किसान संघाचे अध्यक्ष बाबू कोमरपंत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अवेळी पावसामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे अवसान गळाल्याचे सांगितले. परिस्थिती अशीच कायम राहिली आणि सरकारने त्वरित साहाय्य उपलब्ध केले नाही तर महागाईमुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे दिवाळीपूर्वीच पिकून तयार झालेले शेत कापण्यास काही शेतकऱ्यांनी विलंब केला होता. तर, काही शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवली होती. मात्र, अवेळी आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी धान्य आडवे झालेले असून काही ठिकाणी त्याला अंकुर फुटला आहे. पाण्याखाली गेलेली ही शेती कुजल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. काणकोणमध्ये यंदा मिरचीचे भरपूर पीक आलेले असले तरी ती सुकवण्यास अडथळे येत असल्याचे, प्रभाकर वेळीप यांनी सांगितले.
कुळे भागात शेतकरी हवालदिल
अवेळी कोसळलेल्या पावसामुळे कुळे व आसपासच्या परिसरातील भातशेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली असून शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. भातशेती कापणीला आलेली असतानाच पाऊस पडल्याने आता करावे काय? असा प्रश्न हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे.
काही ठिकाणी शेतीची कापणी करण्यात आली होती. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे मळणी शक्य नसल्याने व साठवून ठेवलेल्या भात शेतीला अंकुर फुटल्याने शेतकऱ्याचे श्रम वाया गेल्यात जमा आहेत.
वाकीकुळण शिगाव येथे सुमारे साठ शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून भात शेतीची लागवड करीत आहेत. पण यंदा या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून भात कापणीला आलेले असून सुद्धा कापणी करायला मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी भात आडवे होऊन सतत पडणाऱ्या पावसाने कुजून गेले आहे. संबंधितांनी पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई देण्याची मागणी होत आहे.
कुळेहून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या करंझोळ येथील घनदाट जंगलात गेल्या अनेक वर्षांपासून भात शेती करणाऱ्या शिगाव येथील किरण खुशाली मामलेकर यांच्या सुमारे सहा एकर जमिनीतील भातशेती नष्ट झाली आहे. त्यांना अंदाजे दीड लाख रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज आहे. कापणी सुरू असताना अचानक पडलेल्या पावसाने संपूर्ण शेती आडवी झाली होती. प्रयत्न करून त्यांनी काही प्रमाणात भात शेतीची कापणी केली. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे साठवून ठेवलेल्या भात शेतीला कोंब आलेले आहेत. किरण मामलेकर या महिला असूनही रानटी जनावरांपासून धोका पत्करून मोठ्या कष्टाने एकट्याच करंझोळ येथे पावसाळ्यात भातशेतीची लागवड करतात. रानटी जनावरांपासून रक्षण करूनसुद्धा तोंडी आलेला घास अवेळी पडणाऱ्या पावसाने हिसकावून घेतल्याने त्यांना फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
सौ. किरण यांच्याप्रमाणेच इतर अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून सरकारने त्यांना त्वरित साहाय्य करण्याची मागणी येथून होत आहे.
Tuesday, 16 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment