Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 17 November 2010

खनिज उत्खननासाठी लईराईचे होमकुंडच 'लीझ'वर

लाखो भाविकांच्या श्रद्धास्थानाला सुरुंग
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोवा तसेच शेजारच्या राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगांवच्या श्री देवी लईराईचे पवित्र होमकुंड जिथे धगधगते व लाखो भाविकांना पावन करून घेते तीच जागा "मेसर्स राजाराम बांदेकर खाण कंपनी'ला खनिज उत्खननासाठी बहाल करून राज्य सरकारने जनतेच्या श्रद्धेलाच सुरुंग लावण्याचे काम केले आहे. सदर खनिज कंपनीला ही जागा "लीझ'वर देण्याच्या खाण खात्याच्या निर्णयामुळे शिरगावात प्रचंड असंतोष खदखदतो आहे.
खरे म्हणजे, लोकांच्या श्रद्धेला सुरुंग लावू पाहणाऱ्या या कथित "लीझ'चे नूतनीकरण करणारी अधिसूचना जारी करण्यास शिरगाववासीयांनी तीव्र विरोध दर्शवला होता. परंतु, त्याकडे साफ दुर्लक्ष करून खाण खात्याने हा परवाना दिल्याने आता यापुढील परिणामांना सामोरे जाण्यास सरकारने सज्ज राहावे, असा सज्जड इशारा शिरगावातील श्रद्धाळू ग्रामस्थांनी दिला आहे.
टीसी -४/४९ अंतर्गत ६ लाख ९० हजार चौरसमीटर जागेसाठीच्या या खाण करारा(लीझ)चे नूतनीकरण करण्यात आले आहे. २०२७ पर्यंत या जागेत या कंपनीला खनिज उत्खनन करण्याची मोकळीक याद्वारे देण्यात आली आहे. आत्तापर्यंत शिरगावचे "शीर' शाबूत होते; पण या "लीझ'चा वार करून सरकारने शिरगावचा शिरच्छेदच केल्याची प्रतिक्रिया दिलीप भास्कर गावकर यांनी दिली. गावाची धारणाच पणाला लागली असल्याने निदान आतातरी शिरगाववासीय आपापसातील मतभेद विसरून एक होतील आणि हा कुटील डाव हाणून पाडतील, अशी आपण देवी लईराईकडे प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारच्या खाण व भूगर्भशास्त्र खात्याने ११ नोव्हेंबर रोजी ही अधिसूचना जारी केली. शिरगावची सुमारे ६९ हेक्टर जमीन या खाण "लीझ'अंतर्गत येते. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी देवी लईराईचे जगप्रसिद्ध होमकुंड पेटते त्या सर्वे क्रमांक ५३ चा या करारात समावेश आहे. या जागेत सर्वे क्रमांक ५३, ५९ ते ६२, ८३, ८५ ते ८९, भाग सर्वे क्रमांक ४८, ४९, ५२, ५४ ते ५८, ६३, ६४, ६९, ७०, ८० ते ८२, ९०,९१,९४ व ९५ आदींचा समावेश आहे. सध्या न्यायप्रविष्ट असलेली सर्वे क्रमांक ८२, ८३ व ८५ ही कोमुनिदादची जमीनही या करारात आहे. सदर जमीन चुकून "मेसर्स राजाराम बांदेकर खाण कंपनी'च्या नावावर नोंद झाली आहे व ती परत मिळवण्यासाठी प्रशासकीय व न्यायालयीन लढा सुरू आहे. कोमुनिदाद जमिनीचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे; पण ही जमीन खाण उद्योगाला देऊन सरकारने आपले "खायचे दात' दाखवले, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. लोह व बॉक्साइट खाणीसाठी हा परवाना देण्यात आला आहे. आत्तापर्यंत या खाण उद्योगाने शिरगावच्या डोंगरावरील नैसर्गिक संपत्ती नष्ट केली व आता शिरगावमधील घरांवरूनही पोकलिन फिरवण्यासाठी सरकार पुढे सरसावले आहे, असेही श्री. गावकर म्हणाले.
दरम्यान, मेसर्स चौगुले खाण कंपनी व मेसर्स राजाराम बांदेकर खाण कंपनी यांच्याविरुद्ध कोमुनिदादच्या जागेवरून शिरगाववासीयांचा गेली कित्येक वर्षे लढा सुरू आहे. या दोन्ही खाण कंपन्यांनी याच गावातील काही लोकांना हाताशी धरून त्यांच्यात फूट पाडली आहे. अनेक लोकांना खाण उद्योगात सामावून घेऊन तसेच काही युवकांना रोजगाराचे "गाजर' दाखवून आपल्या बाजूने ओढले आहे. आज हे लोक आपल्याच गावची धुळधाण करण्यासाठी उघडपणे या खाण उद्योगाची बाजू घेत आहेत, अशी बिकट परिस्थिती या गावात ओढवली आहे. शिरगाववासीयांत एकजूट नसल्याच्या संधीचा फायदा घेऊनच सरकारने या खाण कराराचे नूतनीकरण केल्याचा आरोप होत आहे. खाण खात्याने पवित्र होमकुंडाची जागाच खाण कंपनीला बहाल करून केवळ शिरगाववासीयांनाच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यांत पसरलेल्या देवी लईराईच्या भक्तांनाच थेट आव्हान दिले आहे. यामुळे यापुढे निर्माण होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी दिगंबर कामत सरकारच जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री दिगंबर कामत हे देवभक्त आहेत. आपल्या सरकारवर देवाची कृपा असल्याचे ते जाहीरपणे सांगतात. मात्र शिरगावच्या श्री देवी लईराईचे पवित्र होमकुंड खाण कंपनीच्या घशात घालताना कामत यांची देवभक्ती कुठे लोप पावली होती, असा खडा सवाल दिलीप भास्कर गावकर यांनी केला आहे. बेकायदा खाण उद्योगातून मिळणाऱ्या अमाप पैशांमुळे हे सरकार आंधळे बनले आहे व त्यांना या खाण उद्योगामुळे उध्वस्त झालेल्या लोकांचे काहीही पडून गेलेले नाही. पैशांच्या लालसेने हपापलेले हे खाण उद्योजक व राजकारणी होमकुंडाला हात घालू शकतात तर उद्या श्री देवी लईराईच्या मंदिराकडेही ते वाकड्या नजरेने पाहणार नाहीत, याची शाश्वती काय? पूर्वी पोर्तुगिजांपासून आपल्या दैवतांचे रक्षण करण्यासाठी देवतांचे स्थलांतर करावे लागले होते, आता मुक्त गोव्यात या खाण उद्योजकांपासून त्याच पद्धतीने देवांचे रक्षण करण्याची वेळ शिरगाववासीयांवर ओढवणार आहे का, असाही सवाल यावेळी करण्यात आला आहे.

No comments: