इस्रायली दैनिकात लकी फार्महाऊसने केला पर्दाफाश
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)ः गोव्यात कार्यरत असलेल्या कथित इस्रायली ड्रग माफिया व्यवहारांत गोव्यातील एका बड्या मंत्रीपुत्राचा नामोल्लेख इस्राईलच्या एका अग्रेसर दैनिकात लकी फार्महाऊस हिने दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत केल्याने पोलिस खात्याची झोप पार उडाली आहे. पोलिस व ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणी अटाला याची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने यापूर्वीच एका नेत्याच्या पुत्राचा या प्रकरणी सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केला होता. इस्राईलच्या "मारीव' नामक एका अग्रेसर दैनिकांत दिलेल्या मुलाखतीत तिने थेट "त्या' मंत्रीपुत्राचे नावच जाहीर केल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या पोलिसांना जबरदस्त हादरा बसला आहे.
इस्राईलच्या "मारीव' या दुसऱ्या क्रमांकाच्या अग्रगण्य "टॅब्लॉइड' दैनिकांत २४ मे २०१० रोजी लकी फार्महाऊस हिची खळबळजनक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या दैनिकाचे शोध पत्रकार गाली गिनात यांनी तिची सविस्तर मुलाखतच प्रसिद्ध करून गोव्यातील इस्रायली ड्रग माफियांच्या व्यवहारांवर लखलखीत प्रकाश टाकला आहे. लकी फार्महाऊस ही इस्रायली ड्रग माफिया अटाला याची प्रेयसी आहे व तिनेच इंटरनेटवर "यूट्यूब'व्दारे या ड्रग प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. अलीकडेच अटाला याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलिस चौकशीबाबत ओढलेले ताशेरे पाहता पोलिस जाणीवपूर्वक या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची येथील लोकांची भावना बनली आहे. मुळात पोलिसांचाच सहभाग असलेले हे प्रकरण स्वतंत्र चौकशी यंत्रणेकडे देण्याची गरज असतानाही याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने संशयाला वाट मोकळी मिळाली होतीच; आता लकी फार्महाऊस हिने सदर मंत्रीपुत्राचे नावच उघड केल्याने या संशयाला अधिकच बळकटी मिळाली आहे.
लकी अमोरी फार्महाऊस हिने आपल्या या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, सदर मत्रीपुत्र अटाला याच्या हणजूण येथील घरी वारंवार भेट देत होता. तिने प्रसिद्ध केलेल्या "यूट्यूबवर' अटाला याच्या हातात चिलीम देताना एक हात दिसतो व हा हात सदर मंत्रीपुत्राचा असल्याचा दावाही तिने केला आहे. दरम्यान, लकी फार्महाऊस हिने आपण याप्रकरणी जबानी द्यायला तयार असल्याचे सांगूनही पोलिस अजूनही तिच्यापर्यंत पोहोचले नाहीत. ती शुटींगसाठी मुंबईत आली असतानाही पोलिस तिची जबानी घेण्यासाठी गेले नसल्याने तिनेही आश्चर्य व्यक्त केले होते.
दरम्यान, पोलिस व ड्रग माफियांचे घनिष्ठ संबंध असल्याचेही लकी हिने या मुलाखतीत म्हटले आहे. सदर मंत्रीपुत्राचा या प्रकरणात सहभाग असल्यानेच पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जात नसल्याचा आरोपही तिने केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांना या प्रकरणावरून पत्रकारांनी छेडले असता, लकी फार्महाऊस हिची जबानी नोंदवण्यासाठी स्वीडनला पोलिस पथक पाठवले जाईल, असे त्यांनी घोषित केले होते. दरम्यान, पोलिस व ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणाची चौकशी "सीबीआय' मार्फत करावी, अशी मागणी माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी केली होती. या मागणीमुळेच आपल्याला नादिया तोरादो मृत्यू प्रकरणी गोवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. लकी फार्महाऊस हिने उघड केलेल्या मंत्रीपुत्राचा सहभाग खरोखरच ड्रग प्रकरणात असेल तर मिकी पाशेको यांच्या मागणीबाबत फेरविचार करण्याची वेळ ओढवण्याचीही शक्यता निर्माण झाल्याने या प्रकरणावरून राज्यात येत्या काही दिवसांत राजकीय भूकंप होण्याचीच दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सगळेच चिडिचूप ?
दरम्यान, लकी फार्महाऊस हिच्या खळबळजनक मुलाखतीबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा काही पत्रकारांनी प्रयत्न केला असता एकाही अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. गृहमंत्री रवी नाईक यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो देखील वाया गेल्याचे कळते. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी, पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी तर मोबाईल उचलण्याचेच टाळले. या प्रकरणाच्या बाबतीत सगळ्यांची दातखिळी एकदम बसल्याने लकी फार्महाऊस हिने मुलाखतीतून केलेल्या गौप्यस्फोटाला एका अर्थाने बळकटीच मिळाली असल्याचे बोलले जाते आहे.
Wednesday, 7 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment