पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): गेल्या तीन महिन्यांत केंद्र सरकारने दोनदा डिझेल दरवाढ केल्याने खाजगी बस मालकांनी जनतेचे हित लक्षात घेऊन प्रतिकिलोमीटर केवळ वीस पैशांची तिकीट दरवाढ मागितली होती, सरकार मात्र दहा पैशांवर अडून राहिले आहे. त्यातून निर्माण झालेला तिढा सुटला नाही तर येत्या १२ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
आज संघटनेची येथील टी.बी.कुन्हा सभागृहात बैठक झाली. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष शिवदास कांबळी, सरचिटणीस सुदीप ताम्हणकर, शेख फर्याझ, प्रसाद परब, मॅन्युएल रॉड्रिगीस आदी उपस्थित होते. खाजगी बस मालक संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यातील सर्व खाजगी बस मालकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल संघटनेतर्फे त्यांचे अभार मानण्यात आले. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी बंदमध्ये सहभागी झालेल्या बस मालकांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी संघटना ही कृती करीत आहे. आता वाहतूकमंत्र्यांकडून खाजगी बस मालकांच्या वाट्याला जाण्याचा प्रकार घडला तर तो हाणून पाडला जाईल,असा इशारा यावेळी देण्यात आला.
खाजगी बस व्यावसायिकांच्या वाट्याला गेलेल्या प्रत्येक मंत्र्याला घरी बसावे लागले आहे, याची जाणीव श्री.ढवळीकरांनी ठेवावी,असा सल्लाही यावेळी देण्यात आला. १२ जुलैपासूनच्या बेमुदत संपाची नोटीस आज सादर करण्यात आल्याची माहिती सुदीप ताम्हणकर यांनी दिली. या नोटिशीत सरकारला एकूण सोळा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून या सर्वच्या सर्व मागण्या पूर्ण व्हायलाच हव्यात,असाही इशारा देण्यात आला. सरकारने एकतर्फी निर्णय न घेता संघटनेला चर्चेसाठी पाचारण करावे जेणेकरून संघटना आपले म्हणणे व्यवस्थितपणे मांडता येणे शक्य होईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
खाजगी बसमालक फायद्यात आहेत व त्यांना तिकीट दरवाढीची गरज नाही, असे भासवण्याचा प्रयत्न वाहतूकमंत्र्यांकडून होतो आहे. मुळातच कर्जांच्या डोंगरामुळे खंगलेल्या बस मालकांना जेव्हा बसगाडी दुरुस्तीसाठी नेण्याची वेळ येते तेव्हा कधी कधी घरातील दागिने गहाण ठेवावे लागतात. रोज पहाटे ते रात्री उशिरापर्यंत जिवाचे पाणी करून बसमालकांना हा व्यवसाय करावा लागतो. हा व्यवसाय थेट जनतेच्या सेवेशी निगडित आहे; पण सरकारकडून खाजगी बस व्यावसायिकांना कोणताही लाभ मिळत नाही. वाहतूक व रस्ता परिवहन अधिकारी या ना त्या कारणाने बस मालकांना लुटत असतात, अशी कडक टीका श्री.ताम्हणकर यांनी केली.
कदंब महामंडळाकडून होणारी सतावणूक थांबवणे, खाजगी बसगाड्यांवर जाहिरात करण्यास मुभा देणे, प्रत्येक महिन्याला बस संघटनेशी विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावणे, डिझेलवर अनुदान देणे आदी विविध मागण्या संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
जनतेला भिकेला लावणारे सरकारः प्रा. पर्वतकर
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेच्या बैठकीला भाजपचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी खास उपस्थिती लावली व बंद यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. गोवा बंद यशस्वी होण्याचे श्रेय हे जनतेचे आहे. यापुढेही जनतेच्या विषयांवरून भाजप नेहमीच अग्रेसर असेल, असेही ते म्हणाले.विद्यमान कॉंग्रेस सरकारने जनतेला भिकेलाच लावले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.लमाण्यांकडूनही हप्ते गोळा केले जातात व त्याचा वाटा थेट नेत्यांना पोहोचवला जातो यावरून या सरकारची लायकी काय, हे कळून येते. महागाईने उच्चांक गाठला असताना इंधनदरवाढ करून सरकारने जनतेला वेठीस धरल्याचा आरोपही त्यांनी केला.
Tuesday, 6 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment