Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 9 July 2010

अखेर मिकी पाशेको गजाआड

इस्पितळातून डिस्चार्ज होताच पोलिसांची कारवाई

मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी) : नादिया तोरादो मृत्युप्रकरणी ५ जूनपासून गुन्हा अन्वेषण विभागाच्या चौकशीचा ससेमिरा चुकविणारे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना आज दुपारी अखेर पोलिसांनी गलितगात्र अवस्थेत ताब्यात घेतले व नंतर गुन्हा अन्वेषण विभागाच्या स्वाधीन केल्यामुळे २९ मे रोजी चेन्नई इस्पितळात नादियाला मृत्यू आल्यापासून सुरू झालेल्या घटनाचक्रातील एक वर्तूळ पूर्ण झाले आहे.
गेल्या शनिवारी येथील सत्र न्यायालयात शरण आलेल्या व न्यायालयीन कोठडीतून प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिसियोमध्ये दाखल केलेल्या माजी मंत्र्यांचा जामीन अर्ज काल फेटाळून लावताना न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात त्यांची वैद्यकीय चिकित्सा करण्याचा व इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना ताब्यात घेण्याबाबत हालचाल करावी असा जो अभिप्राय दिला होता, त्याच्या अनुषंगाने आज एकंदर हालचाली झालेल्या दिसून आल्या.
मिकी पाशेको यांना आज सकाळी ११-३० वाजता हॉस्पिसियोच्या रुग्णवाहिकेतून गोमेकॉत तपासणीसाठी नेले गेले व तेथे डॉ. अनार खांडेपारकर यांनी त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्या तसेच त्यांचा रक्तदाब, नाडीचे ठोके आदींचीही तपासणी केली गेली व त्यांना सायंकाळी साधारण चारच्या सुमारास गोमेकॉच्या रुग्णवाहिकेतून परत आणण्यात आले. गोमेकॉतील वैद्यकीय अहवाल चांगला आलेला असल्याने मडगावात परत आणल्यावर त्यांची पुन्हा एकदा तपासणी केली गेली व त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तेथेच पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी त्यांना ताब्यात घेतले व गुन्हा अन्वेषण विभागाच्या स्वाधीन करण्यासाठी ते दोनापॉलकडे रवाना झाले.
इकडे त्यांना गोमेकॉत नेल्याचे कळल्यावर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने हॉस्पिसियोकडे जमले पण तेथे कडक बंदोबस्त ठेवलेला असल्याने ते निमूट राहिले. सायंकाळी ४ च्या सुमारास त्याला परत आणल्यावर समर्थकही भराभर गोळा झाले. पण संतोष देसाई बरोबर बाहेर आलेले मिकी पाशेको साफ खचलेले दिसून आले व त्यांना त्या अवस्थेत पाहून त्यांच्या समर्थकांचेही अवसान गळाले, त्यांनी त्यांचा जयजयकार केला व तुम्ही भिऊ नका , आपण तुमच्याबरोबर आहोत, असा गिल्ला केलेला खरा पण त्यात पूर्वींचा आवेश दिसून आला नाही.
आज इस्पितळाबाहेर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला होता. त्यात महिला पोलिसांबरोबरच ईगल फोर्सचे कमांडोही होते. आज मिकी यांना गुन्हा अन्वेषणाकडे स्वाधीन केल्यामुळे येथील पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. मिकी गेल्या शनिवारी सत्र न्यायालयात शरण आल्यापासून तब्बल सहा दिवस पोलिसांची धावपळ चालू होती. सोमवारपासून त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरु झाल्यापासून त्याच्या समर्थकांनी न्यायालयासमोर सुरु केलेल्या गर्दीमुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधिकाऱ्यांची धावपळ चालू झाली होती, ती आज संपल्यासारखी झाली आहे.
काल सत्र न्यायालयाने आपल्या निकालपत्रात हॉस्पिसियोतील डॉक्टरांवर जे ताशेरे झोडले होते, त्याची मात्रा आज अचूक लागू पडली व त्यातूनच मिकींना गोमेकॉत तपासणीसाठी पाठविण्यात आले, असे सांगितले जाते.

No comments: