Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 6 July 2010

महाराष्ट्रातही शंभर टक्के!

* मुंडे, मुनगंटीवार, सोमय्या यांना मुंबईत अटक
* ७ खासदार, २९ आमदारांसह हजारोंना अटक
* खडसे, फुंडकर, तावडे, जोशी, सुभाष देसाई, नांदगावकर, अबु आझमी यांना ठिकठिकाणी अटक
* दोनशेवर बसेसची तोडफोड
* शासकीय कार्यालयातील उपस्थिती १५ टक्क्यांवर
* विमानांची ९२ उड्डाणे रद्द

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी): पेट्रोल, डिझेलच्या किमतीतली वाढ आणि एकूणच महागाईच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या आणि शिवसेना, मनसे, समाजवादी पक्ष, रिडालोस यांच्यासह अन्य विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेल्या बंदला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान मुंबईत भाजपानेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय महामंत्री किरीट सोमय्या, स्मृती इराणी, गोपाळ शेट्टी यांच्यासह शेकडो लोकांना अटक करण्यात आली.
हा बंद चिरडण्यासाठी सरकारने प्रचंड बळाचा वापर करूनही मुंबईत लोकांनी घराबाहेर निघणे टाळले. अनुपस्थित राहिल्यास कारवाई करू या सरकारच्या धमकीलाही "प्रतिसाद' मिळू शकला नाही. परिणामी बंदच्या दिवशी केवळ पंधरा टक्के कर्मचारीच शासकीय कार्यालयात हजर राहू शकलेत. शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने शंभर टक्के बंद होती. मात्र, औषधांची दुकाने आणि दवाखाने यांना आजच्या बंदमधून वगळण्यात आले होते.
या बंददरम्यान राज्यभरात ७ खासदार, २९ आमदारांसह हजारो लोकांना अटक करण्यात आली. मुंबईत बेस्टच्या १५५, तर राज्यभरात एसटीच्या ५५ बसेसची तोडफोड करण्यात आली. एकूण ५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. किमान १७ हजार लोकांना बंदपूर्वी नोटीसेस बजावण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या एकूण ३९ घटना राज्यभरात घडल्यात.
महागाई आणि इंधन दरवाढीविरुद्ध पुकारण्यात आलेल्या या बंददरम्यान, अंधेरीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वात भाजपा कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन करण्यासाठी रेल्वे स्थानकावर धडक दिली. मात्र, तेथे उपस्थित प्रचंड पोलिस ताफ्याने या नेत्यांसह तेथे आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. मुंबई शहर अध्यक्ष गोपाळ शेट्टी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्मृती इराणी, खा. पीयुष गोयल, राजेश शर्मा, अतुल भातखळकर यांचा यात प्रामुख्याने समावेश होता. नागपुरात पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात भाजपाचे प्रा. संजय भेंडे आणि अरविंद शहापूरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते जबर जखमी झालेत.
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना पुण्यात, युवा नेते विनोद तावडे व खा. प्रतापदादा सोनावणे यांना नाशकात, किरीट सोमय्या यांना मुंबईत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांना औरंगाबाद येथे, आ. संजय केळकर व एकनाथ शिंदे यांना ठाण्यात, शिवसेना नेते मनोहर जोशी यांना दादरमध्ये, गोरेगाव येथे सुभाष देसाई, आ. संभाजीराव पवार, आ. सुरेश खाडे यांना मिरजेत, गोपाळ शेट्टी व योगेश सागर यांना बोरिवलीत, नागपुरात आमदार देवेंद्र फडणवीस यांना, मुंबई महानगर पालिकेतील भाजपाचे गटनेते ऍड्. आशीष शेलार यांना बांद्रा येथे, अतुल भातखळकर यांना कांदिवलीत, जयवंतीबेन मेहता यांना सी. पी. टॅंक दरम्यान, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा मनीषाताई चौधरी यांना डहाणूजवळ तर समाजवादी पार्टीचे अबु आझमी यांना शिवाजी नगरात अटक करण्यात आली. नवी मुंबईत सुरेश हावरे यांच्या नेतृत्त्वात बंद शंभर टक्के यशस्वी ठरला. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रमोद जठार यांच्या नेतृत्त्वात मराठवाडा, कोकणात आंदोलन झाले. जळगावात प्रदेश भाजपा सारचिटणीस गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात रेल रोको आंदोलन करण्यात आले. दादर येथे मनसेचे नितीन सरदेसाई यांना, तर भोईवाड्यात बाळा नांदगावकर यांना अटक करण्यात आली.
भाजपा तसेच शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांनी पुकारलेल्या या बंदचे परिणाम विमानसेवेपासून तर लोकलपर्यंत सर्वत्र झाले आहेत. विविध विमान वाहतूक कंपन्यांच्या विमानांची एकूण ९२ उड्डाणे सोमवारी रद्द झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबईत लोकल रद्द झाल्या नसल्या तरी त्यातील गर्दी मोठ्या प्रमाणात ओसरली होती. सोमवारी सकाळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता. शिवसैनिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. मुंबईत काही ठिकाणी समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस नेत्यांचे पुतळे जाळले. अनेक ठिकाणी तर रस्ते निर्मनुष्य होते.

No comments: