माथानी साल्ढाणा यांचा खणखणीत इशारा
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): कदंब महामंडळातर्फे स्वतःच्या ताब्यातील जमीन खाजगी उद्योजकांना विकण्याचा किंवा करारावर देण्याचा प्रयत्न हाणून पाडायला हवा,अशी मागणी माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांनी केली आहे. लोकहितासाठी सामान्य लोकांकडून अत्यल्पदरांत जमीन संपादन करून ही अशा पद्धतीने खाजगी उद्योजकांना देण्यात येत असेल तर सरकारकडून ती जनतेशी प्रतारणा ठरेल, असेही साल्ढाणा यांनी स्पष्ट केले.
साल्ढाणा यांनी अलीकडेच यासंबंधी कदंब महामंडळाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. गोव्यात मुळातच जागा कमी आहे व त्यात विशेषकरून शहरी भागांत जागाच नसल्याने सरकारच्या ताब्यातीलही जमीन जर खाजगी उद्योजक किंवा बिल्डरांच्या घशात घातली गेली तर भविष्यात सरकारच भूमिहीन बनेल,असा टोलाही साल्ढाणा यांनी हाणला. सरकारकडून निश्चित कारणांसाठी भूसंपादन केले जाते व अशा जमिनी अन्य कारणांसाठी देण्यात येऊ नयेत,असा इशारा त्यांनी दिला.कदंब महामंडळाची अतिरिक्त जागा सदर महामंडळ खाजगी उद्योजकांना देत असल्याचे ते म्हणाले.
महामंडळाकडे अतिरिक्त जागा असल्याचा जो दावा केला जातो याचा अर्थ कोणतेही नियोजन नसताना जागा संपादन केली जाते काय, असा सवाल साल्ढाणा यांनी केला. कदंब महामंडळाने ही जागा खाजगी उद्योजकांना न देता स्वतःहून तिथे पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात व त्याव्दारे महसूल प्राप्तीचे स्त्रोत्र निर्माण करावे,अशी सूचनाही साल्ढाणा यांनी केली. याठिकाणी अतिरिक्त जागेत टॅक्सी, रिक्षा किंवा अन्य खाजगी वाहनांच्या पार्किंगची सोय केली जाऊ शकते. महामंडळातर्फेच याठिकाणी एखादा मॉल किंवा हॉटेल सुरू करून त्याव्दारेही महसूल मिळू शकतो. पण कोणताही विचार न करता थेट ही जागा खाजगी उद्योजकांना देण्याचा घाट हा योग्य नसून त्याला प्राणपणाने विरोध केला जाईल,असा इशाराही साल्ढाणा यांनी दिला.
Sunday, 4 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment