Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 10 July 2010

मिकींना ७ दिवसांची पोलिस कोठडी

जामिनासाठी अर्ज : सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी
मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणी काल गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या आमदार मिकी पाशेको यांना आज येथील प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता न्या. केरकर यांनी त्यांची ७ दिवसांच्या कोठडीत रिमांडवर रवानगी केली. त्यानंतर त्यांचे वकील अमित पालेकर यांनी त्यांची जामिनावर सुटका व्हावी म्हणून अर्ज सादर केला, त्यावर येत्या सोमवारी दुपारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
काल संपूर्णतः खचलेल्या मानसिक अवस्थेतून नेलेल्या मिकी यांना आज सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात येथील न्यायालयात आणले असता जुन्या बाजारातील न्यायालयीन परिसर त्यांच्या समर्थकांनी भरून गेला होता.
सरकारी वकील गावडे व मिकीतर्फे ऍड. पालेकर यांनी यावेळी युक्तिवाद केले. सरकारी वकिलांनी अजून या मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण व्हावयाचा आहे, त्याशिवाय अनेक वस्तूंची त्यांच्याकडून माहिती मिळविणे आवश्यक असल्याने त्यांना १४ दिवसांच्या पोलिस कोठडीतील रिमांड द्यावा अशी मागणी केली. कोठडीतील चौकशीशिवाय ही माहिती मिळविणे शक्य नसल्याचे त्यांनी न्यायाधीशांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
मिकीचे वकील अमित पालेकर यांनी आपल्या युक्तिवादात त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यावरच जास्त भर दिला व आरोग्य ठीक नसताना त्यांना कोठडीत पाठविणे उचित होणार नाही असे सांगून गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील अनुभवी व ज्येष्ठ डॉक्टरांकडून त्यांची पुन्हा तपासणी करावी व त्यांनी अहवाल दिल्यास पोलिस कोठडीतील रिमांड द्यावा असे प्रतिपादन केले.
न्यायमूर्ती केरकर यांच्या न्यायालयात दुपारी १ पर्यंत हे युक्तिवाद चालले. त्यावेळी सरकारी वकिलांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून दोन मोबाईल, संगणक व पासपोर्ट गुन्हा अन्वेषण विभागाला हवा आहे. त्याशिवाय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याने त्यांना पोलिस कोठडीत ठेवून चौकशी करण्याच्या आवश्यकतेवर जो भर दिला आहे, त्याकडे अंगुलिनिर्देश करून गुन्हा अन्वेषण विभाग दर ४८ तासांनी गोवा वैद्यकीय इस्पितळात नेऊन त्यांची वैद्यकीत तपासणी करील अशी हमी दिली व आज सकाळी त्यांची अशी वैद्यकीय तपासणी केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
त्यावर ऍड. पालेकर यांनी गुन्हा अन्वेषण विभागाने याआधी त्यांची जबानी घेतलेली आहे व आणखी जबानी घेण्यासाठी १४ दिवसांच्या कोठडीची गरज नसून त्यांची ढासळलेली प्रकृती पाहता अवघ्या काही दिवसांसाठी वाटल्यास पोलिस कोठडी द्यावी पण ती देण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करावी अशी विनंती केली. आज जी तपासणी झालेली आहे ती कनिष्ठ डॉक्टरांकडून, त्याचा अहवाल अजून मिळालेला नाही. त्यांच्या यकृताला सूज आल्याचा हॉस्पिसियो डॉक्टरांचा अहवाल आहे व ते आज न्यायालयात उपस्थित असून त्यांचा चेहरा पाहिल्यासही कोणाला त्यांच्या आजारपणाची कल्पना येईल असे सांगून गुन्हा अन्वेषण विभाग त्यांच्या वैद्यकीय तपासणीला का विरोध करतो, असा सवाल त्यांनी केला. यदाकदाचित कोठडीत त्यांची प्रकृती ढासळली तर गुन्हा अन्वेषण विभाग व न्यायालयावर त्याचा ठपका येईल असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या युक्तिवादानंतर सायंकाळी ४ वाजता निवाडा देण्याचे न्यायाधीशांनी जाहीर केले. निवाडा मिळाल्यानंतर त्याची प्रत घेऊन जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे मिकींचे वकील अमित पालेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते व नंतर त्यांनी लगेच तसा अर्ज दाखलही केला.
पालेकर यांनी मिकींच्या यकृताला सूज आल्याचा हॉस्पिसियो इस्पितळाच्या डॉक्टरांनी दिलेला अहवाल पत्रकारांना दाखविला. गोवा वैद्यकीय इस्पितळातील अहवाल आपणास मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयात सुनावणीसाठी मिकी पाशेको यांना पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले, तेव्हा शेकडो समर्थक कोर्टाबाहेर उभे होते व सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुपारच्या कोर्टाच्या सुट्टीवेळी मिकींना मडगाव पोलिस स्टेशनवर आणून ठेवण्यात आले होते व त्यांना त्या स्थितीत पाहून पोलिस कर्मचाऱ्यांत खालच्या स्वरांत त्यांचीच चर्चा चालू होेती.
-------------------------------------------------------------
जैसी करनी वैसी...
मडगावः करावे तसे भरावे अशी म्हण आहे व काल मिकी पाशेको यांच्याबाबतीत तो प्रत्यय आला. काल त्यांना हॉस्पिसियोतून डिस्चार्ज मिळाल्यावर अटक करून नेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांत कपील देसाई या तरुण पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. योगायोग म्हणजे याच अधिकाऱ्यावर मिकी यांनी कोलवा पोलिस स्टेशनात टेलिफोन उचलून फेकून मारला होता. तर आणखी एकावर खुर्ची फेकून मारली होती. काल त्याला जेरबंद करून नेताना अशा अधिकाऱ्यांना पूर्वीचे हे किस्से आठवून मनातल्या मनात हसू फुटल्याशिवाय राहणार नाही, अशीच चर्चा पोलिस वर्तुळात चालू होती.
मिकीचे वर्तन सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेले आहे. मंत्रिपदावर असताना त्यांनी आपणाला बाजू देत नाही म्हणून एका कदंब चालकाला भररस्त्यात अडवून मारहाण केली होती तर एका वीज अभियंत्याला कार्यालयात बोलावून झोडपले होते. मूड गेला की क्षणार्धात भडकणारी व आकाशपाताळ एक करणारीही व्यक्ती आता मात्र गोगलगाय बनून गुन्हा अन्वेषणासमोर बसल्याचे पाहून अशा लोकांच्या मनात वरील म्हण आल्याशिवाय राहणार नाही.

No comments: