कुठे आहे आरोग्यमंत्र्यांचा करिष्मा?
शैलेश तिवरेकर
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - सांतइनेज - पणजी येथील क्षयरोग इस्पितळाची अवस्था सध्या अखेरची घटका मोजणाऱ्या क्षयग्रस्त रुग्णासारखीच बनलेली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे राज्यातील आरोग्यसेवेबाबत केलेल्या सुधारणा व विकासाचा दावा वेळोवेळी करतात; मात्र तांबडी माती येथे असलेल्या या महत्त्वाच्या क्षयरोग इस्पितळाची बिकट अवस्था पाहिली तर आरोग्यमंत्र्यांचा हा दावा म्हणजे निव्वळ तोंडाच्या बाता असल्याचेच उघड होते.
या इस्पितळात उपचार घेणारे रुग्ण व तिथे काम करणारे कर्मचारी कोणत्या परिस्थितीत येथे दिवस काढतात हे पाहिले तर आरोग्य सेवेबाबत आपले राज्य अग्रेसर असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारला आपली मान शरमेने खाली घालावीच लागेल, अशीच परिस्थिती आहे. संपूर्ण राज्यात क्षयरोगाने बाधित झालेल्या रुग्णांवर या इस्पितळांत उपचार करण्यात येतात. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असल्याने या इस्पितळात स्वच्छतेवर सर्वाधिक भर देणे गरजेचे आहे. पण राज्यातील या क्षयरोग इस्पितळाकडे लक्ष द्यायला कुणाकडेही वेळ नाही व त्यामुळे आरोग्यसेवेच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या गोव्यासाठी ही लांच्छनास्पद गोष्ट ठरली आहे.
या इस्पितळात सुमारे २५ कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांच्या असंख्य अडचणी व तक्रारी आहेत. पण त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आरोग्य खात्याची तयारी नाही. या इस्पितळातील साधन सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असून केवळ नोकरी करण्यावाचून पर्याय नाही, या एकाच गोष्टीसाठी या इस्पितळात हे कर्मचारी काम करताना दिसतात. या इस्पितळाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला आरोग्यमंत्र्यांनी या खात्यात नेमकी काय सुधारणा केली आहे त्याचे दर्शन होईल, अशी टीकाही येथे येणारे लोक करतात.
इस्पितळ इमारतच रुग्णशय्येवर
राज्यात सध्या असलेल्या इस्पितळांची परिस्थिती कशीही असो, पण आरोग्यमंत्री मात्र ठिकाठिकाणी नव्या इस्पितळांच्या इमारतींची उभारणी करीतच सुटले आहेत. सांतइनेज येथील क्षयरोग इस्पितळाची इमारतच खुद्द रुग्णशय्येवर असल्यागत बनली आहे. रुग्णांसाठी व येथील कर्मचाऱ्यांसाठीही ही इमारत धोकादायक बनली आहे. या रया गेलेल्या इमारतीत एखादा रुग्ण बरा होणे शक्यच नाही, असे येथील डॉक्टरही खाजगीत बोलतात. इमारतीची एवढ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे की, बोलायची सोयच राहिली नाही. या इमारतीची लिफ्ट गेली कित्येक वर्षे बंद आहे व त्यामुळे क्षयरोगाने पीडित झालेल्यांना थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत पायऱ्यांवरून चालत जावे लागते. एवढेच नव्हे तर चालण्याचे त्राणही नसलेल्या रुग्णांना "स्ट्रेचर'च्या साहाय्याने पायऱ्या चढून नेणे भाग पडत आहे. बहुतांश क्षयरुग्ण हे दम्यानेही बाधित असतात व त्यामुळे त्यांना पायऱ्यांवरून चालायला लावणे म्हणजे मृत्यूच्या छायेत ढकलण्यासारखेच असल्याचा आरोपही होत आहे. तिसऱ्या मजल्यावर चढण्यासाठी किमान चाळीस पायऱ्या चढाव्या लागतात. कित्येकवेळा भलेमोठे "ऑक्सिजन सिलिंडर' घेऊन कर्मचाऱ्यांना हे मजले सर करावे लागतात. विविध वॉर्डांत पावसाचे पाणी झिरपत असल्याने रुग्णांच्या खाटा वारंवार हालवाव्या लागतात. बाहेर पाऊस पडत असल्यास एक सफाई कामगार कायमस्वरूपी पाणी साफ करण्यासाठीही ठेवावा लागतो. महिला वॉर्डांचीही तीच परिस्थिती बनली आहे. येथील शौचालयांची अवस्था विचारण्याच्या पलीकडे गेली आहे. केवळ गोव्यातूनच नव्हे तर गोव्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात या इस्पितळात रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र इथे जो रुग्ण येतो त्याची अवस्था येथे राहण्यापेक्षा मरण परवडले अशी होत नसली तरच नवल, अशी परिस्थिती आहे.
इस्पितळातील साधनांचा बोजवारा
इस्पितळाच्या इमारतीप्रमाणेच येथील सोयीसुविधांची स्थिती बनली आहे. रुग्णांचे कपडे धुण्यासाठीचे मशीन गेली कित्येक वर्षे बंद पडले आहे व त्यामुळे हे कपडे बांबोळी येथे पाठवले जातात. या कपड्यांसाठीच आता काही कर्मचाऱ्यांना दिवसागणिक बांबोळी ते पणजी असा प्रवास करावा लागतो. विजेच्या सामानाची एवढी दुर्दशा झाली आहे की कधी कुणाला विजेचा झटका येईल व अपघात घडेल हे सांगता येत नाही. आरोग्यमंत्र्यांना वाईट वाटेल या भावनेने या सर्व दुखण्यांबाबत चकार शब्दही काढायला येथील कर्मचारी तयार नाहीत व ते मुकाट्याने हा प्रकार सहन करीत आहेत. लोकांकडूनही केवळ नाराजी व्यक्त केली जाते व इथे उपचारांसाठी येण्याची वेळ ओढवली याला आपले नशीबच जबाबदार असल्याचे म्हणून ते गप्प राहतात. या इस्पितळाला आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी एकदा भेट द्यावी व नंतरच राज्याच्या आरोग्य सेवेच्या बाता माराव्यात, असे आवाहन इथे उपचार घेणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी केले आहे.
Thursday, 8 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment