Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 6 June 2010

अखेर मिकी यांचा राजीनामा

नादिया मृत्यूप्रकरण भोवले,
पोलिसांना गुंगारा देऊन मिकी 'बेपत्ता',
रिक्त मंत्रिपदासाठी जबरदस्त रस्सीखेच

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): लोटली येथील नादिया तोरादो या महिलेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी काल गुन्हे अन्वेषण विभागाकडून तब्बल आठ तास चौकशीला सामोरे गेलेले पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज अचानकपणे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. आज सकाळी १० वाजता सीआयडीसमोर पुन्हा जबानीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांनी पाठ फिरवल्याने पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे. राज्यातील सर्व पोलिस स्थानकांना तशी सूचना देण्यात आली आहे. मिकी यांचे अधिकृत राजीनामापत्र आपल्याला मिळाले व ते राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांना पाठवले असता त्यांनी ते तात्काळ स्वीकारल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर मिकी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले मंत्रिपद कोणाला मिळणार यावरून विविध नेत्यांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली आहे.
लोटली येथील नादिया मृत्यूप्रकरणी मिकी यांच्याभोवती संशयाचे ढग अधिक गडद होऊ लागले आहेत. सीआयडीकडून काल आठ तासांची जबानी घेतल्यानंतर बिथरलेले मिकी आज जबानीसाठी पुन्हा पाचारण करूनही रात्री उशिरापर्यंत गैरहजर राहिले. त्यामुळे पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली. दरम्यान, दुपारी त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सादर केला. कामत यांनी तो राज्यपालांकडे पाठवला असता तो तात्काळ मंजूर करण्यात आला. मिकी यांची चौकशी अजून पूर्ण व्हायची आहे. म्हणून ते पोलिसांना हवे आहेत. ते गैरहजर राहिल्याने राज्यातील सर्व पोलिस स्थानकांना सतर्क करण्यात आले आहे. त्यांचा शोध घेण्याचे आदेश जारी केल्याची माहिती पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली.
दाबोळी विमानतळावरही पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त लावण्यात आला होता. याठिकाणी ते गोव्याबाहेर जाण्यासाठी आल्यास तिथेच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते, अशीही माहिती मिळाली आहे.
मिकी यांच्या अटकेच्या शक्यतेबाबत मात्र देशपांडे यांनी काहीही सांगण्याचे नाकारले. मिकी यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसांसमोर हजर होतील,असे संकेत मिळत होते. मिकी यांचे वकील विक्रम वर्मा यांनीही आपला मोबाईल बंद ठेवल्याने त्यांची पुढील कृती काय असेल, हे समजू शकले नाही.मिकी पाशेको यांचे मंत्रिपद राष्ट्रवादीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना मिळणार काय, असा सवाल कामत यांना केला असता त्यांनी याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षाचे श्रेष्ठी घेतील, असे सांगितले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांनी मात्र हे पद आघाडीच्या धर्मानुसार राष्ट्रवादीकडेच राहणार असून नीळकंठ हळर्णकर यांची मंत्रिपदी नेमणूक होईल, असा आशावाद व्यक्त केला.
या संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल संध्याकाळपर्यंत तयार करून दिल्लीत पाठवून देणार असल्याने नव्या मंत्रिपदाचा शपथविधी येत्या दोन दिवसांत होईल, असेही संकेत कामत यांनी दिले. मिकी यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशा प्रसंगी त्यांनी राजीनामा देणेच योग्य होते,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आपण काल रात्री यासंबंधी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती,असेही त्यांनी सांगितले.
मिकी पाशेको यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी होत्या. महिलांबाबत त्यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्येही श्रेष्ठींनी गंभीरतेने घेतली होती. यावेळी मात्र मर्यादेचे उल्लंघन झाल्याने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश श्रेष्ठींनी दिले,असे श्री. देशप्रभू यांनी दिल्लीहून सांगितले.
दरम्यान, नादियाचा पती विन्स्टन बार्रेटो, नादियाची आई सोनिया व तिचे भाऊ सीआयडीपुढे सकाळीच हजर झाले होते. कालच्या चौकशीनंतर आपल्याला याप्रकरणात गोवले जाणार याची चाहूल लागल्यानेच मिकी "बेपत्ता' झाल्याची खबर आहे. मिकी यांना अटक होईल याचे सूतोवाच पोलिसांकडून कालच केले गेले होते. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय नव्हता. हे सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच ते बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. तथापि, त्यामुळे ते आणखी अडचणीत येण्याची जास्त शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटानेही त्यांची साथ सोडल्याची खबर आहे. मिकी यांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, असे आघाडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. नीळकंठ हळर्णकर यांना वगळून हे पद कॉंग्रेसला देण्याचा प्रयत्न झाला तरच गोंधळ होण्याचा संभव आहे. कामत यांनाही हा गोंधळ नको असल्याने हे पद राष्ट्रवादीला मिळावे, अशी त्यांची मनोधारणा आहे.
अन्य कलंकितांनाही घरी पाठवा : भाजप
केवळ एका मिकींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकारची प्रतिमा स्वच्छ होणार नाही. विविध घोटाळ्यात अडकलेले इतरही मंत्री या सरकारात आहेत. त्यांनाही घरी पाठवा, अशी आक्रमक प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली. ड्रग माफिया प्रकरण, बेकायदा खाणी, अबकारी घोटाळा, भूखंड माफिया अशा अनेक भानगडींनी अर्धेअधिक मंत्रिमंडळ गुंतले आहे. म्हणून मिकींना अर्धचंद्र देऊन हे सरकार "पवित्र' झाले असे समजण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
भाजपने यापूर्वीच याप्रकरणी मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा किंवा त्यांना डच्चू द्यावा, अशी मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, ही मागणी कायम आहे, असे भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर म्हणाले.
खातेपालटाची शक्यता
मिकी यांच्या राजीनाम्यामुळे आता खातेपालटाच्या मागणीला जोर प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिकी यांचे मंत्रिपद नीळकंठ हळर्णकर यांना द्यायचे झाल्यास त्यांच्याकडे पर्यटन खाते देण्याची शक्यता कमी असल्याने हे खाते अन्य कुणाकडे जाण्याची शक्यता आहे. नीळकंठ हळर्णकर यांनी मात्र आपण श्रेष्ठी काय निर्णय घेतील, त्याच्याशी बांधील असू असे स्पष्ट करून आपल्याला अमुक खात्याचीच गरज आहे असे नाही, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे प्रदेश नेते श्रेष्ठींशी चर्चा करूनच काय तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्षात अस्वस्थता
दरम्यान, मिकी पाशेको यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेस पक्षातही अस्वस्थता पसरली आहे. मिकी पाशेको यांचे मंत्रिपद कॉंग्रेसकडे राहावे यासाठी काही नेते कामत यांच्यावर दबाव टाकण्याच्या तयारीत आहेत. कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर व माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर हे रांगेत आहेत. तसेच उपसभापती माविन गुदिन्हो हेदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. परिणामी हे पद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता धुसर दिसत आहे.हळर्णकर हे पहिल्यांदाच निवडून आल्याने त्यांना एखादे महत्त्वाचे महामंडळ देऊन हे मंत्रिपद कॉंग्रेसकडे ठेवण्यासाठी काही नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे. मुख्यमंत्री कामत हे मात्र या निर्णयाला अनुकूल नाहीत, असे कळते. पर्यटन खाते मिळवण्यासाठीही सध्याच्या काही मंत्र्यांत चुरस लागण्याचा संभव आहे. त्यामुळे सरकारच्या तीन वर्षांच्या पूर्ततेच्या मुहुर्तावर पुन्हा एकदा कामत यांना हा घटनाक्रम डोकेदुखी ठरण्याचीच दाट शक्यता आहे.
मंत्रिपद राष्ट्रवादीकडेच राहील
मिकी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर करून पक्षशिस्तीचे पालन केले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. कार्मो पेगादो यांनी दिली. पोलिस या प्रकरणी तपास करीतच आहेच त्यामुळे सत्य उजेडात येणार आहे. प्रदेश राष्ट्रवादी या संपूर्ण प्रकरणी सातत्याने श्रेष्ठींच्या संपर्कात आहे व श्रेष्ठींनीच राजीनामा देण्याचा सल्ला मिकी पाशेको यांना दिला,असेही त्यांनी उघड केले. मिकी यांच्याकडील मंत्रिपद राष्ट्रवादीकडेच राहील यात शंका नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची निवडणूकपूर्वी आघाडी आहे व दोन्ही पक्ष आघाडीचा धर्म पाळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments: