पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने गेल्या तीन वर्षांच्या काळात केलेल्या अनेक भ्रष्टाचार प्रकरणांची जंत्रीच आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ. एस. एस.सिद्धू यांच्यासमोर ठेवली. राज्याची तिजोरी लुटण्याचे काम या सरकारने सुरू ठेवले आहे. सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ आपली तुंबडी भरण्यातच हे सरकार व्यस्त असून जनतेच्या पैशांवर महोत्सव साजरे केले जात आहेत. अस्थायी समिती व पुढील विधानसभा अधिवेशनाची संधी साधून सरकारला जेरीस आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होईल. एवढे करूनही दोषींवर कारवाई झाली नाही तर प्रसंगी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यास भाजप कमी राहणार नाही, असा खणखणीत इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने आज राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजप विधिमंडळ गटाचे उपनेते ऍड. फ्रान्सिस डिसोझा, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, विधिमंडळ प्रवक्ते दामोदर नाईक, प्रदेश सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर व प्रा.गोविंद पर्वतकर आदींचा
समावेश होता. सुमारे पाऊण तास झालेल्या बैठकीत या शिष्टमंडळाने सरकारच्या भ्रष्टाचार प्रकरणांची मालिकाच राज्यपालांसमोर सादर केली. जनतेच्या पैशांची अमर्याद उधळपट्टी सुरू असताना घटनेचे रक्षक या नात्याने राज्यपालांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या गंभीर प्रकरणांची दखल राज्यपालांनी घेतली असून सखोल चौकशी करण्याचे ठोस आश्वासन शिष्टमंडळाला दिले. ही माहिती पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मिकी कसे गायब झाले?
राज्याचा एक मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देऊन गायब होतो याचे नेमके कारण काय? पोलिसांनी अद्याप मिकी पाशेको यांच्याविरोधात एकही गुन्हा नोंद केलेला नसताना ते गायब होण्यामागचे नेमके कारण काय, असा सवालही पर्रीकर यांनी केला.
अबकारी घोटाळा ः चौकशी ठप्पच
अबकारी घोटाळा विधानसभेत उघड करूनही त्याची चौकशी होत नाही. जम्मू काश्मीरच्या गुन्हे विभागाने चौकशी सुरू केल्यानंतर गोव्यातील अबकारी आयुक्तांकडून कार्यालयातील फॅक्सचा गैरवापर व बनावट सह्यांची तक्रार पोलिसांत नोंद केली, पण त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. नव्या अबकारी आयुक्तांनी ताबा घेतल्यानंतर घातलेल्या छाप्यात लाखो लीटर्स मद्यार्क सापडले. वास्को कार्यालयातील छाप्यात घोटाळ्याचे पुरावेही सापडले. मात्र त्याबाबत फौजदारी चौकशीचा मागमूसही नाही. सुमारे शंभर कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात सरकारातील नेत्यांचे लागेबांधे आहेत व त्यांना संरक्षण देण्यासाठीच हे प्रकरण दडपले जात आहे, असा सनसनाटी आरोप पर्रीकर यांनी केला.
नंबरप्लेटमागील गौडबंगाल
नंबरप्लेटचा घोटाळा उघड केल्यानंतर खुद्द मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालात अनेक गैरप्रकार उघडकीस आणूनही हे कंत्राट रद्द केले जात नाही. कमी दरांत उच्च सुरक्षा नंबरप्लेट उपलब्ध होत असताना जादा दर आकारणारे कंत्राट जनहितार्थ रद्द करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला, पण गोव्यात मात्र राज्य सरकारने ४६९ रुपयांची नंबरप्लेट १२०० रुपयांना वाहन चालकांच्या गळी उतरवण्याचा डाव आखला आहे. या कंत्राटात हात धुऊन घेतलेले नेते व वरिष्ठ अधिकारी कोण,असा प्रश्न पर्रीकरांनी केला.
राज्यातील खनिज निर्यातीपैकी २० टक्के महसूल गळती विरोधकांनी उघड केली; पण त्याबद्दल सरकारला ना खंत ना खेद. ड्रग व पोलिस साटेलोटे प्रकरणी झालेल्या पोलिस चौकशीवर उच्च न्यायालयानेच ताशेरे ओढले आहे. पोलिसांना गुंगारा देऊन अनेक दिवस बेपत्ता असलेल्या संजय परब या पोलिस शिपायाला आठ दिवसांत जामीन मिळतो यावरून या प्रकरणात "फिक्सिंग' झाल्याचाच संशय येतो, अशी शक्यता पर्रीकरांनी व्यक्त केली. या प्रकरणांत वरिष्ठ पोलिस गुंतल्याने योग्य पोलिस चौकशी होत नाही आणि राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे सरकारही बेफिकीर आहे.
भ्रष्टाचाराला रान मोकळेच
भ्रष्टाचाराला रान मोकळे ठेवण्यासाठीच लोकायुक्त विधेयक रखडत ठेवले जात आहे. सरकारातील मंत्रीच एकमेकांच्या उरावर बसले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या भानगडी पुढील आठवड्यात लेखी स्वरूपातच राज्यपालांना पुराव्यांसह सादर केल्या जातील, असेही पर्रीकर म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत केवळ कला व संस्कृती खात्याचा लवाजमा वापरून राज्यकारभाराचा देखावा करीत असल्याचा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला. "गोमंत विभूषण' हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाला बहाल करताना मुख्यमंत्री वगळता एकही मंत्री व आमदार सोहळ्याला हजर राहत नाहीत यावरूनच सरकारच्या बेशिस्तीचे व बेफिकीरीचे दर्शन घडते, असा चिमटा पर्रीकरांनी काढला.
राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आहे, याचे भान न ठेवता कॉंग्रेसच्या व्यासपीठावर आघाडीतील इतर घटकांवर दोषारोप करण्याचे व स्वबळावर लढण्याचे इरादे व्यक्त केले जातात यातून कॉंग्रेस पक्ष सत्तेसाठी कसा हपापला आहे याचेच दर्शन होते, असा टोलाही पर्रीकरांनी लगावला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment