Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 25 March 2009

विरोधकांच्या घोषणांनी विधानसभा दणाणली..

स्थगन प्रस्ताव फेटाळल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : मूर्ती तोडफोडप्रकरणी राजकीय नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल विरोधकांनी आज विधानसभेत आणलेला स्थगन प्रस्ताव संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याच्या कारणावरून सभापती प्रतापसिंह राणे यांनी फेटाळून लावल्याने संतप्त विरोधी सदस्यांनी प्रचंड गदारोळ करत सभागृहाचे कामकाज रोखून धरले. यावेळी सरकारचा धिक्कार करणाऱ्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडणाऱ्या विरोधकांनी सभापतींना सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यास भाग पाडत आपले लक्ष्य साध्य केले.
गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांच्या तावडीतील संशयित कवेश गोसावी याने मंदिर तोडफोड प्रकरणात विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांची नावे गोवण्यासाठी पोलिस आपल्यावर कोठडीत दबाव आणत होते, असा आरोप केला आहे. त्याबाबतचे वृत्त एका स्थानिक दैनिकात प्रसिध्द झाले असून त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हा स्थगन प्रस्ताव सभापतींना सादर केला होता.
प्रश्नोत्तराचा तास संपताच सभापतींनी शून्य प्रहराची घोषणा केली. त्यावेळी सभापतींनी विरोधकांचा स्थगन प्रस्ताव आपल्याकडे आला असून सदर प्रस्ताव संबंधित दैनिकातील वृत्तावर आधारित आहे. तसेच सध्या त्याबाबतचे प्रकरणही न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत हा स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांचा पारा चढला.एका संशयितावर नेत्यांची नावे गोवण्यास पोलिस दबाव आणत असल्याने आम्ही गप्प कसे बसायचे, असे विरोधकांचे म्हणणे होते. तथापि,सभापती आपल्या निर्णयाशी ठाम राहिले.
सभापतींनी अनेकदा विरोधी नेते पर्रीकर यांना तुमच्या सदस्यांना आवरा अन्यथा मार्शलकरवी त्यांना बाहेर काढावे लागेल, असा इशाराही देऊन पाहिला. मात्र त्याचा विरोधकांवर प्रभाव पडला नाही. विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम होते. नंतर विरोधी सदस्य जागेवरच उभे राहून घोषणा देऊ लागले. विरोधकांनी सभापतींच्या आवाहनाला दाद दिली नाही. सभापतींनी विरोधकांना बसण्याची सूचना केली. मात्र विरोधक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर सभापतींनी गदारोळातच पुढच्या कामकाजाची घोषणा केली. त्यावेळी पर्रीकर यांनी आम्हाला काहीही ऐकू येत नसल्याची तक्रार केली.
या गोंधळातच सभापतींनी पुढील कामकाजाला सुरूवात केल्याने विरोधक भलतेच खवळले. त्यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली व सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. प्रचंड गदारोळ करीत विरोधकांनी सभापतींना पुढचे कामकाज घेणे अशक्य करून सोडले. त्यामुळे सभापतींनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करीत असल्याची घोषणा केली. स्थगन प्रस्ताव फेटाळला तरी दहा मिनिटांसाठी का होईना सभापतींना कामकाज तहकूब करण्यास भाग पाडून विरोधकांनी आज पुन्हा एकदा आपल्या ताकदीचा प्रत्यय सभागृहाला दिला.
दरम्यान, सभापती प्रतापसिंह राणे यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळण्याचा आपण जो निर्णय दिला त्यानंतर जे काही सभागृहात घडले ते अधिकृत नसल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनाही त्यांचे थेट प्रक्षेपण थांबवण्याचे आदेश दिले गेले. विधानसभा सचिव आर. कोथंडरामन यांनी तर एका आदेशाव्दारे स्थगन प्रस्ताव फेटाळण्याच्या सभापतींच्या निर्णयानंतरच्या गोंधळाचे वृत्त अधिकृत नसल्याने त्याचे वृत्तांकन न करण्याची ताकीदही पत्रकारांना दिली.

No comments: