वेळगे येथील घटना; अन्नातून विषबाधा?
पाळी, दि. २१, (वार्ताहर): वेळगे पंचायतीजवळ राहणारे लक्ष्मीकांत अनंत गोबरे (वय ७३) व त्यांची बहीण शशिकला अनंत गोबरे ( ६०) यांचा आज संशयास्पद मृत्यू झाला.
लक्ष्मीकांत अनंत गोबरे वेळगे येथे आपल्या निवासस्थानी आपली पत्नी सौ. शालिनी, मुलगे प्रदीप व अनंत, सून प्राची प्रदीप गोबरे, नात कु. मेधा प्रदीप गोबरे व अविवाहीत बहिण शशिकला अनंत गोबरे यांच्या समवेत राहात होते. रविवारी (ता. १६) दुपारच्या जेवणासाठी केलेली कोबी भाजी खाल्ल्यावर घरातील लक्ष्मीकांत व शशिकला यांना उलटी व जुलाब सुरू झाले. मात्र तेव्हा त्यांनी याची गंभीर दखल घेतली नाही. नंतर प्राची गोबरे व लक्ष्मीकांत यांची पत्नी शालिनी गोबरे यांना त्रास जाणवू लागला. पाठोपाठ लक्ष्मीकांत यांचा धाकटा मुलगा अनंत यांनाही त्रास होऊ लागला. एक दोन दिवसांत त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली.
काल (दि. २०) अचानकपणे लक्ष्मीकांत यांची प्रकृती खालावू लागली व रात्री १०.३० च्या दरम्यान लक्ष्मीकांत यांचा मृत्यू झाला. लगेच वेळगे येथील डॉ. वझे यांना फोनवरून पाचारण करण्यात आले. त्यांनी गोबरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच शशिकला यांची प्रकृती खालावली. त्यांना बांबोळीला सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सकाळी दहाच्या सुमारास शशिकला यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर शशिकला यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी लक्ष्मीकांत गोबरे यांच्या सर्व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून शालिनी लक्ष्मीकांत गोबरे (वय ६५), प्राची प्रदीप गोबरे (३७), अनंत लक्ष्मीकांत गोबरे (३५), प्रदीप लक्ष्मीकांत गोबरे (४१), मेधा प्रदीप गोबरे (दीड वर्षे) यांची तपासणी करून शालीन, प्राची व अनंत यांना दाखल करून घेतले. प्रदीप व त्यांची मुलगी यांना घरी पाठवण्यात आले.
गोबरे कुटुंबीयांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती त्या परिसरातील लोकांकडून मिळाली. मात्र शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पाळी, वेलघे-सूर्ल, कोळंबी, भामय या भागात राहणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तेथे एकही डॉक्टर रात्री उपलब्ध नसतो. भाजपचे सरकार होते त्यावेळी आरोग्यमंत्री या नात्याने डॉ. सुरेश आमोणकर यांनी पाळी पंचायतीच्या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. येथील लोकांना तपासण्यासाठी एका कायमस्वरुपी डॉक्टराची नेमणूक केली होती. मात्र कॉंग्रेस सरकार सत्तेवर येताच डॉ. आमोणकरांनी सुरू केलेल्या आरोग्य तपासणी केंद्राच्या डॉक्टरांची इतरत्र बदली करण्यात आली. त्यामुळे रुग्णांनी या केंद्राकडे पाठ फिरवली. हे केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी सरकारकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काल जर या भागात डॉक्टर उपलब्ध असता तर दोघांचेही प्राण वाचले असते. अशी भावना गोबरे यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.
-------------------------------------------
वाढदिवसापूर्वीच मृत्यू
२२ मार्च रोजी आपला साठावा वाढदिवस साजरा करण्याची शशिकला गोबरे यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. परंतु वाढदिवसाच्या एक दिवस अगोदरच त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
Friday, 21 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment