Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 18 March 2008

मुलीच्या मृत्यूला आईच जबाबदार: गृहमंत्री

पणजी, दि. 17 (प्रतिनिधी): फियोना मॅंकेवॉन ही बेजबाबदार व गुन्हेगारी प्रवृत्तीची बाई आहे. स्वतःच्या किशोरवयीन मुलीला एका अनोळखी इसमाकडे सोडून अन्य सात मुलांसह फिरण्यासाठी जाणारी ही बाईच स्कार्लेटच्या मृत्यूस जबाबदार असल्याची टीका गृहमंत्री रवी नाईक यांनी केली.
गृहमंत्री रवी नाईक व पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार यांचे अमलीपदार्थ माफियांशी साटेलोटे असल्याचा आरोप फियोनाने केला होता. आज प्रथमच या प्रकरणावर भाष्य करताना रवी नाईक यांनी फियोनाच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. या बाईची संपूर्ण पार्श्वभूमी ब्रिटनहून मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी सुरवातीस प्रसारमाध्यमांत जेव्हा बातम्या झळकू लागल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त केले होते. जेव्हा मुख्यमंत्री बोलतात तेव्हा इतर मंत्र्यांनी विनाकारण नाक खुपसायचे नसते, त्यामुळेच आपण या प्रकरणी काही बोललो नाही, असे स्पष्टीकरणही रवी यांनी दिले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या बाईचे उत्पन्नाचे साधन काय, आर्थिक स्थिती चांगली नसताना ती गोव्यात आपल्या आठही मुलांना घेऊन पर्यटनासाठी कशीय आली, याचा थांगपत्ता लावला जात आहे. या बाईने जाहीर वक्तव्ये करून गोव्याची जी बदनामी सुरू केली आहे त्यामागे राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय शक्ती कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रवी म्हणाले.
स्कार्लेटला ज्या इसमाकडे फियोनाने गोकर्णला जाताना सोपवले होती त्या इसमाशी फियोनाचे संबंध होते, हे उघड झाले आहे यापूर्वी ती गोव्यात आली होती काय, याचाही तपास सुरू असून आपल्या अल्पवयीन मुलीची काळजी घेण्यात तिने केलेल्या कुचराईमुळे तिच्यावर गोवा बाल सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करता येणे शक्य आहे का, याचाही विचार सुरू असल्याचे रवी यांनी सांगितले.
येत्या दोन महिन्यात फियोनाचा व्हिसा संपणार असल्याने तिला मुदतवाढ दिली जाऊ नये. तसेच यापुढे गोव्यात तिला येण्याची परवानगी नाकारावी अशी मागणी विदेश व्यवहार मंत्रालयाकडे केली जाईल. फियोनाला मदत करणारे वकील विक्रम गुप्ता पर्वरी येथे राहतात. विदेशी लोकांबाबतची अनेक प्रकरणे ते हाताळत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या पार्श्वभूमीचाही अभ्यास केला जाईल,असे संकेत रवीयांनी दिले.

No comments: