Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 16 March 2008

हणजूण सरपंचाच्या चौकशीचे आदेश

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): "कर्लीज' शॅकचे मालक तथा हणजूणचे सरपंच एडविन नुनीस यांची स्कार्लेट खून प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश तपास पथकाला देण्यात आले आहेत. तसेच गृहमंत्री रवी नाईक यांनी डिव्होन इंग्लंड येथे राहणाऱ्या फियोना किलींग यांची पार्श्वभूमी पडताळून त्याबाबतचा अहवाल देण्याची मागणी ब्रिटिश सरकारकडे केली आहे.
स्कार्लेटला अमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले तेव्हा तेथे काही राजकीय व्यक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. याचा तपास लावण्यासाठी खास पोलिस उपअधीक्षक शांबा सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. सरपंच नुनीस यांची चौकशी केल्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ शकत नसल्याचे मत एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले.
फियोनाची पार्श्वभूमी पडताळून पाहणे या प्रकरणात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठीची तयारी पोलिसांनी केली आहे.फियोना संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने तिने आता पोलिस आणि राजकारण्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून त्यांचे हात बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आगामी काळात तिच्याविरोधातील पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यास तिच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळेच तिने ही नवी खेळी खेळली आहे, अशी चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

"मुरली'ची भूमिका महत्त्वाची
स्कार्लेटचा मित्र "मुरली' याचीही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती या प्रकरणात अटक केलेल्या शाणाबॉय याने आपल्या जबानीत पोलिसांना दिली आहे. "मुरली' हा बॉलिवूड संगीत क्षेत्रातील एका नामांकित कॅसेट कंपनीच्या मालकाचा नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या दिवशी स्कार्लेटचा खून झाला, त्याच्या काही तासापूर्वी "मुरली' स्कार्लेटला "लुई'या शॅकमधून घेऊन "कर्लीज' या शॅकमध्ये गेला होता.

No comments: