पणजी, दि. 17 (प्रतिनिधी): राज्यातील अमलीपदार्थ तस्करीचे जाळे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी गृह खात्याने कंबर कसली असून या व्यवहारांत गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री रवी नाईक यांनी दिला. आज मंत्रालयातील आपल्या दालनात घेतलेल्या खास पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मद्यविक्री आणि हॉटेलबाबत कायद्यात दुरुस्ती करून मद्यालये रात्री अकरापर्यंत व उपाहारगृहे रात्री बारापर्यंतच चालू ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. सरकारकडे अतिरिक्त पैशांचा भरणा केल्यास पहाटेपर्यंत शॅक्स उघडे ठेवण्याची परवानगी अबकारी आयुक्तांकडून दिली जाते, याचाही फेरविचार होणार असल्याचे त्यांनी सूचित केले. गोव्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशींना कोणत्याही स्थितीत येथे राहू दिले जाणार नाही. 2005 ते आतापर्यंत 104 विदेशींना परत पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
शिक्षणासाठी किंवा गुन्हेगारीच्या प्रकरणात अडकून गोव्यात जास्तीत जास्त दिवस राहण्याची शक्कलही काही विदेशी पर्यटकांकडून लढवली जाते असे उघड झाले आहे. यापुढे अशा गोष्टींना थारा दिला जाणार नाही, असा इशारा रवी यांनी दिला.
अमलीपदार्थांच्याबाबतीत सूत्रांकडून मिळवलेल्या माहितीनुसार लॅटिन अमेरिकेतील कोलंबिया तथा इतर देशांतून विविध राज्यांमार्गे अमलीपदार्थ गोव्यात येतात व येथून ते चार्टर विमानांतून युरोपीय देशांत नेले जातात अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. हे रोखण्यासाठी विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्याची मागणी केंद्राकडे केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्कार्लेटची आई फियोना ही तिच्या आठ मुलांसह गोव्यात पर्यटक व्हिसावर आली आहे. तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही ती गोव्यात कशी पोहचली, याचाही तपास होणे आवश्यक आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे सोडून येथे अडचणी निर्माण करणारे पर्यटक गोव्याला अजिबात नकोत. त्यासाठी विदेश व्यवहार मंत्रालयाकडे व्हिसा बहाल प्रक्रियेत अधिक कडकपणा आणण्याकरता विनंती केली जाईल, असे रवी म्हणाले.
गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी पुरेशी दक्षता घेणे गरजेचे आहे. येथे येऊन कसेही वागता येते ही मानसिकता बदलली जाणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित देशांच्या दूतावासांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमलीपदार्थविरोधी पथक व इतर पोलिस स्थानकांकडून झालेल्या तक्रारींची नोंद
----------------------------------------
2007
प्रकरणे नोंद-23, अटक-30 भारतीय(17) व विदेशी(13), मालजप्त-71.524.8 किलो,किंमत- सुमारे 80,59,250 रुपये.
नेपाळी-8, नायजेरियन-2, इटालीयन-1, डच-1, कोस्टा रिका-1
-------------------------------------
2008
प्रकरणे नोंद-8, अटक-8 भारतीय(4) व विदेशी(4), माल जप्त-30.703 किलो, किंमत- सुमारे 41,15,250 रुपये.
इस्रायली-1, नेपाळी-3
-----------------------------------------
छापे टाकून 2006 मध्ये जप्त केलेल्या अमलीपदार्थांची राज्यवार माहिती
उत्तरप्रदेश- 904 किलो,दिल्ली-598,गुजरात-529,महाराष्ट्र-468,हिमाचल प्रदेश-313,जम्मू आणि काश्मीर-245 व गोवा-64
(इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात असे व्यवहार कमी प्रमाणात होतात हे या आकडेवारीवरून दिसून येते, असे रवी यांनी सांगितले )
Tuesday, 18 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment