Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 16 March 2008

"अपनाघर'मधून पुन्हा पाच तरुणी पळाल्या

सुधारगृहाची सुरक्षा व व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) : मेरशी येथील "अपनाघर' सुधारगृहातून पाच तरुणी आज पहाटे पळून गेल्याने या सुधारगृहाची सुरक्षा आणि व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहाटे ४ ते ५ सुमारास छताची कौले काढून राणी शिंदे (२०, कोलकाता), रेणू साहीन खान (२०, पारगाने कोलकाता), सपना अमजद सिकंदर (२१, मुंबई), मुमताज बाबू अली (२५, पुणे), व अंजली ऊर्फ फरीदा तडवी (कर्नाटक) या तरुणींनी पलायन केल्याची तक्रार सुधारगृहाचे अधीक्षक डी. सी. कुडाळकर यांनी जुने गोवे पोलिस स्थानकावर नोंदवली आहे.
गेल्या सहा महिन्यांत १२ तरुणी पळून गेल्याने सुधारगृहाच्या व्यवस्थेवरच संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन या तरुणींची शोध सुरू केला आहे. मात्र, या तरुणींचे छायाचित्र नसल्याने तपासकामी अडचण निर्माण झाली आहे.
८ मार्च रोजी पर्वरी पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून सहा मुलींची सुटका केली होती. तसेच त्यांच्याबरोबर असलेले तीन गिऱ्हाईके व त्या हॉटेलच्या स्वागतकक्षावर असलेल्या तरुणाला अटक केली होती. या सहा तरुणींपैकी तिघी आणि अन्य दोघी अशा पाच जणींनी आज पोबारा केला.
प्राप्त माहितीनुसार, सुधारगृहात या तरुणी जेवून झोपायला गेल्या होत्या. यातील पाच तरुणींनी पळून जाण्याच्या बेत आखला होता. याठिकाणी व्यवस्थित जेवण व राहण्याची योग्य व्यवस्था नसल्यानेच त्या पळून गेल्याची माहिती तेथे असलेल्या अन्य तरुणींनी पोलिसांना दिली आहे. काल रात्री काही तरुणींमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर त्यांनी हा पळून जाण्याचा बेत आखला. बाथरूमच्या बाजूलाच एक दरवाजा असून तो खिळे ठोकून बंद करण्यात आला होता. पहाटे हा दरवाजा उघडून तेथे असलेल्या खिडकीतून या पाच तरुणींनी पळ काढला. या सर्वांची चपला तेथे मिळाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या तरुणींनी "आम्हाला आमच्या घरी नेऊन सोडा' अशी मागणी लावून धरली होती. तसेच जेवणही चांगल्या पद्धतीचे द्या, अशी मागणी केली होती. सुधारगृहात मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळेच या तरुणांनी पळ काढल्याचे अन्य तरुणींनी पोलिसांना सांगितले आहे. वेश्या व्यवसायातील दलालांच्या जाळ्यात फसलेल्या तरुणींची सुटका करून त्यांना मेरशीच्या सुधारगृहात ठेवण्यात येते. तसेच त्यांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर नेऊन सोडण्याची जबाबदारी सुधारगृहाच्या अधीक्षकांवर असते. या तरुणींना त्यांच्या कुटुंबीयाच्या स्वाधीन करण्यासाठी दर तरुणीमागे दहा हजार रुपये सरकार सुधारगृहाला देत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या तरुणींना एक ते दोन वर्षांपर्यंत तेथेच ठेवण्यात येते, असे उघडकीस आले आहे.

No comments: