Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 16 March 2008

तिबेटमध्ये वाढती अस्वस्थता

चीनकडून "जनयुद्ध' घोषित, हिंसेचा आगडोंब
ल्हासा, ता. १६ : ऑलिंपिक स्पर्धा तोंडावर आलेली असताना तिबेटमध्ये चीनविरोधी हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून तो चिरडून टाकण्यासाठी चीनने तेथे आता "जनयुद्धा'ची घोषणा केली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत दहा जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येत असले तरी अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या शंभराहून अधिक असावी.
तब्बल वीस वर्षांनंतर हा जनक्षोभ तिबेटमध्ये उसळला आहे. गेल्या शुक्रवारपासून विविध ठिकाणी जमावाकडून दुकाने लुटणे, वाहनांना आगी लावणे, इमारतींवर हल्ले करणे, वाहनचालकांना बडवून काढणे हे प्रकार नित्याचेच बनले आहेत. हे कमी म्हणून की काय चीनमध्येही तिबेट समर्थकांकडून तीव्र निदर्शने होऊ लागले आहेत.प्रामुख्याने सिच्युआन प्रांतात या निदर्शनाची धार वाढत चालली आहे. त्यात आतापर्यंत तिघा तिबेटींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. चीनविरोधी आंदोलनात भाग घेतलेल्या तिबेटींना शरणागती पत्करण्यास चीनच्या प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपर्यंतची मुदत दिली आहे. अर्थात, तिबेटमध्ये लष्करी कायदा लागू केला जाणार नाही, असा निर्वाळा चीनने दिला आहे. हिंसाचार मोडून काढण्यासाठी ठिकठिकाणी सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. काही बौद्ध भिख्खू चीनविरोधी आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप चीनच्या प्रशासनाने केला आहे.

अमेरिकेचा निर्वाणीचा सल्ला
गेल्या ५७ वर्षांपासून तिबेट चीनच्या जोखडाखाली असून त्याविरोधात जगभरात विखुरलेली तिबेटी जनता लढा देत आहे. सध्या तेथे सुरू असलेल्या हिंसाचाराविरुद्ध अमेरिकेसह युरोपिय देशांनीही चिंता व्यक्त केली आहे. हा हिंसाचार हाताळताना चीनने सावधगिरी बाळगावी, असा सूचक सल्ला अमेरिकेने चीनला दिला आहे. चीनच्या आक्रमक धोरणाबद्दल जपानसह अन्य आशियाई देशांनीही नाक मुरडले आहे.

"ही चीनची सांस्कृतिक दडपशाही'
तिबेटचे धार्मिक गुरू दलाई लामा यांनी या घटनेचे वर्णन "चीनची सांस्कृतिक दडपशाही' असे केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय पातळीवर केली जावी, अशी मागणी दलाई लामांनी केली आहे. बळाचा वापर करून निष्पाप तिबेटी जनतेची तोंडे बंद करणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, येत्या ऑगस्टमध्ये चीनने ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करण्यास आपली हरकत नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

No comments: