वीजमंत्र्यांनाच प्रत्यंतर; चौकशीचा आदेश
मडगाव, दि.17 (प्रतिनिधी): मोठा गाजावाजा करून टाकण्यात आलेल्या मडगाव शहरातील भूमिगत वीज केबल्सच्या कोट्यवधींच्या कामात झालेला गैरप्रकार आज खुद्द वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनाच पाहायला मिळाला. त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेताना या कामाची संपूर्ण फेरतपासणी तातडीने करून आपल्याला सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे कामाची मुख्य ठेकेदार कंपनी, उपठेकेदार व या कामावर देखरेख करणारे वीज खात्याचे अधिकारी यांची सध्या पाचावर धारण बसली आहे.
आज वीज खात्याच्या येथील कार्यालयात या प्रकरणाचीच चर्चा चालू होती व त्यातून या कंत्राटातील अनेक रंगतदार किस्से ऐकायला मिळाले. या प्रकरणात अनेक बडी धेंडे अडकल्याचे दिसून आले. मडगाव शहराच्या भूमिगत वीज केबलचे हे कंत्राट एकूण 30 कोटींना पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनला दिले गेले होते. त्याच्याकडून लार्सन अँड टुब्रोला उपकंत्राट मिळाले होते. पहिल्या टप्प्यातील हे काम गेल्या फेब्रुवारीत घाईघाईत पूर्ण करून विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी त्याच्या उद्घाटनाचा थाटही उडवून देण्यात आला पण प्रत्यक्षात काही ठिकाणचे काम अजूनही चालू आहे व ही परिस्थिती असतानाच दुसऱ्या टप्प्याचेही काम सदर ठेकेदारांनाच देण्यात आले आहे.
या कामाचा दर्जा काय, त्याची चाचणी कुणी घेतली, त्यावर देखरेख कुणाची या बाबत वीज खात्यात कुणालाच काही माहिती नाही की कुणी काही सांगायला तयार नाही, हे पाहून येथील एक जागरूक नागरिक सावियो फालेरो यांनी थेट वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांच्याशी संपर्क साधला व अशा भूवीज केबलव्दारा पथदीपांसाठी जे खांब उभारलेले आहेत, त्यांना अर्थिंगच्या जोडण्या दिलेल्या नसल्याने पावसाळ्यात ते धोकादायक ठरणार असल्याची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली व आपले म्हणणे खोटे वाटत असल्यास येथील होली स्पिरिट चर्चजवळील खांब खोदून खात्री करण्याचे आव्हान दिले.
श्री. सावियो फालेरो हे माजी नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो यांचे बंधू आहेत. मंत्री सिकेरा यांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेताना वीज खाते अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांना घेऊन मडगाव गाठले व फालेरो यांनी उल्लेख केलेल्या वीजखांबाचा पायाकडील भाग खोदला असता फालेरो यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले.मंत्र्यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना तेथे पाचारण करून या प्रकरणी जाब विचारला. तेव्हा सगळेच त त प प करायला लागले. फालेरो यांनी सर्व वीज खांबांची हीच स्थिती असून पावसाळ्याच्या दिवसात सर्व वीजखांब मानवी जीवनास धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविली.
मंत्र्यांनी त्यावर मडगावातील अशा सर्व वीज खांबांची तपासणी करून अनुक्रमवार अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. गोवा सरकार व पॉवर ग्रीड या दरम्यान या कामासाठी झालेल्या करारानुसार वीजखांबांना तांब्याच्या तारांचे अर्थींग सक्तीचे आहे.गत दोन वर्षांत तांब्याचे दर आकाशाला गवसणी घालत असल्याने हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात ही अवस्था तर बाकीच्या टप्प्यातील कामाचे काय असा सवालही केला जात आहे.
Tuesday, 18 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment