Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 29 June 2010

भाजपच्या नगरसेवकांनी केला दुकान विभाजनाचा भांडाफोड

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): पणजी महापालिका बाजार संकुलात रातोरात एका दुकानाची भिंत पाडून त्याची दोन दुकाने करण्याच्या बेतात असताना भाजपच्या नगरसेवकांनी भांडाफोड करून सदर काम बंद पाडले आणि यासंदर्भात पोलिस तक्रार करण्याची मागणी घेऊन आज सायंकाळी महापौर कॅरोलिना पो यांना घेराव घातला. यावेळी सदर दुकानाची भिंत होती त्याप्रमाणेच पुन्हा बांधून देण्याचे आदेश महापौरांनी काढले असून पोलिस तक्रारीला मनाई केली आहे. या सर्व प्रकरणामागे पालिकेचे स्वीकृत सदस्य दया कारापूरकर असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. भाजप नगरसेवकांना दबाव वाढवल्यानंतर उद्या (मंगळवारी) याप्रश्नी पालिका बाजार समितीची बैठक बोलावण्यात आली असून त्यानंतर पोलिस तक्रार करावी की नाही याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
नव्या बाजार संकुलाच्या पहिल्या मजल्यावर प्रशांत राय नामक व्यक्तीस ३ चौरस मीटर दुकानाची जागा मंजूर झाली आहे. तथापि राय याला ९ चौरस मीटर देण्यात आली आहे. यानंतर एका नगरसेवकाने त्या ९ चौरस मीटर पैकी सहा मीटर जागा २० लाख रुपयांत अन्य एका व्यक्तीला विकली असल्याचा आरोप नगरसेवक मिनीन डिक्रूज यांनी केला. याविषयीच आज महापौरांना विचारले असता त्यांनी आपल्याला याची कोणताही माहिती नसल्याचे सांगितले.
या दुकानाची काल रात्री सुमारे ११ वाजता भिंत पाडून नवीन शटर बसवून विभागणी सुरू असल्याची माहिती मिळताच भाजप नगरसेवकांनी हल्लाबोल केला. यावेळी त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना पाठीशी घालण्यासाठी दया कारापूरकर हजर झाले व त्यांनी नगरसेवकांशी हुज्जत घातली. तसेच, याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचेही सांगून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजप नगरसेवकांनी त्याठिकाणी पोलिसांना पाचारण करून पालिकेची कोणताही परवानगी न घेता सुरू असलेले काम बंद पाडले.
ही भिंत कोणी पाडली त्याच्याकडून आम्ही पैसे वसूल करून घेणार आहोत. पोलिस तक्रार दिल्यास त्यावर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे ती करावी की नाही यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. मात्र विरोधी गट ऐकायला तयार नसल्याने त्यांनी महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत मोडतोड करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिस तक्रार झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. तसेच पोलिस तक्रार न करता पुन्हा ती भिंत उभारून पालिकेने या प्रकरणातील पुरावे नष्ट करू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

No comments: