Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 15 May 2010

'फरारी' संजय परबला अटक आणि कोठडी

अनेक पोलिसांचे "बिंग' फुटण्याची शक्यता
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): तब्बल ५८ दिवस फरारी असलेला निलंबित पोलिस शिपाई संजय परब ऊर्फ "भट' आज म्हापसा येथील अमली पदार्थ विरोधी न्यायालयात आज दुपारी अडीच वाजता शरण आल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने त्याचा ताबा घेतला. यावेळी त्याला "एनडीपीएस' कायद्याचे ८(सी) २८, २९, ३० व ३१ ही कलमाखाली अटक करून न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. संजय हाती लागल्याने महत्त्वाची माहिती उघडकीस येणार असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस अधीक्षक तथा प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांनी दिली. संजय हा ड्रग माफियांशी संबंध ठेवल्याच्या प्रकरणात अटक होणारा सातवा पोलिस ठरला आहे. यापूर्वी एक पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, एक पोलिस हवालदार व तीन पोलिस शिपायांना अटक करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने त्याच्या अनुपस्थित अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सुनावणीसाठी घेण्याची तयारी न दाखवल्याने अखेर संजय परब याला पोलिसांना शरण येणे भाग पडले. दुपारी २.३० संजय "एनडीपीएस' न्यायालयात येऊन बसल्याची माहिती मिळताच गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर व त्याचे पथक त्याला अटक करण्यासाठी गेले असता तो पोलिसांशी उद्धटपणे वागल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी त्याने पोलिसांना उद्देशून अपशब्द वापरल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणात गुंतलेल्या निरीक्षक आशिष शिरोडकर सह अन्य तुरुंगात असलेल्या अन्य पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलिस खात्याकडे असून खातेनिहाय चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले. पोलिस खात्याने यापूर्वी बडतर्फ केलेल्या काही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने आता बडतर्फ करताना पुरेपूर काळजी घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले. अद्याप या पोलिस शिपायांवर आरोप ठेवण्यात आले नसल्याने खातेनिहाय चौकशी सुरू झाली नसल्याचेही सांगण्यात आले.
दि. १८ मार्च रोजी निरीक्षक आशिष शिरोडकर व अन्य पोलिस शिपायांना अटक करताच संजय गायब झाला होता. अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्याचा छडा न लागल्याने त्याला फरारी घोषित करण्यात आले होते. तब्बल ५८ दिवस गुन्हा अन्वेषण विभागाला त्याचा शोध घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे लपण्यासाठी त्याने कोठे आसरा घेतला होता, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच्या लपण्यासाठी एका पोलिस अधिकाऱ्यानेही मदत केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजून काही पोलिस या प्रकरणात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय याला लपण्यासाठी मदत केलेल्या सर्व व्यक्तींना आम्ही अटक करू, असे यापूर्वी या प्रकरणाचे तपास अधिकारी चंद्रकांत साळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
गेली कित्येक वर्षे गुन्हा अन्वेषण विभागात आणि त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकात सेवा बजावणारा संजय परब नेमकी कोणती माहिती उघड करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय याला अनेक अधिकाऱ्यांची गुपिते माहिती आहेत. तसेच ड्रग माफियांकडून हप्ता गोळा करून तो नेमका कोणाला ते पैसे आणून देत होता, हेही या तपासात उघड होणार आहे.

No comments: