पेडणे, दि. १६ (प्रतिनिधी): विठ्ठलदासवाडा - मोरजी येथे कॉस्ता नामक रशियन नागरिकाकडून दि. ११ रोजी जबर मारहाण करण्यात आलेल्या मरडीवाडा - मोरजी येथील रोहिदास ऊर्फ रवी आत्माराम शेटगावकर या टॅक्सीचालकाचे आज दि. १६ रोजी सकाळी ७. १५ वा. बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असता निधन झाले. संध्याकाळी ४ वाजता त्याच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, भाऊ, भावजया, पुतण्या असा मोठा परिवार आहे.
याप्रकरणी मारहाण करणाऱ्या कॉन्सांतिन अलेक्झांडर मोरोझोली ऊर्फ कॉस्ता या रशियन नागरिकावर भादंसंच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दि. १२ रोजी कॉस्ता याला पेडणे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली कलम ३०७ अन्वये अटक केली होती आणि त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्यात आले होते. उद्या दि. १७ रोजी त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभा करून पोलिस त्याच्या कोठडीत वाढ करून घेण्याची शक्यता आहे.
विठ्ठलदास - मोरजी येथे दि. ११ रोजी रात्री ११ वाजता पर्यटकांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या रवी याच्या नाकावर किरकोळ वादावादीतून आश्वे येथे एक रेस्टॉरंट चालवत असलेल्या कॉस्ता नामक रशियन पर्यटकाने जबरदस्त ठोसा लगावला होता. त्या धक्क्याने रवी रस्त्यावर पडला होता व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर रवी याला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते व तेथे त्याच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु, तो उपचारांना साथ देत नव्हता. शेवटी आज सकाळी ७.१५ वा. त्याची प्राणज्योत मालवली.
मोरजीवर शोककळा
दरम्यान, आज सकाळी मोरजी गावात रवी शेटगावकर याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी लोकांची व नातेवाइकांची रीघ लागली. यात मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी शिक्षणमंत्री संगीता परब, जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष राजन घाटे, मोरजी सरपंच अर्जुन शेटगावकर, मांद्रेचे पंच राघोबा गावडे, हरमलचे पंच मधुकर ठाकूर, मोरजीचो एकवट संघटनेचे अध्यक्ष वसंत शेटगावकर व हजारो नागरिकांचा समावेश होता. अडल्या - नडलेल्यांना सदैव मदत करणारा व मनमिळाऊ स्वभावाचा असलेल्या रवी याच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांतच नव्हे तर सर्व मोरजी गावावरच शोककळा पसरली होती.
मुले अनाथ
रवी शेटगावकर यांचा मोठा मुलगा मांद्रे येथील खलप विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत असून संदेश हा मधला मुलगा इयत्ता सातवीत पीटर आल्वारीस हायस्कुलात शिकत आहे. सर्वांत लहान मुलगा सूरज हा पर्वरी येथील संजय स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. वडिलांच्या अकाली जाण्याने ही मुले अनाथ झाली आहेत.
तालुक्यात तीव्र पडसाद
दरम्यान, या घटनेमुळे मोरजी परिसरातच नव्हे तर पेडण्यातील सबंध किनारपट्टी भागांत तीव्र पडसाद उमटले असून मोरजी सरपंच अर्जुन शेटगावकर व मोरजीचो एकवटचे अध्यक्ष आबा शेटगावकर यांनी यापुढे विदेशी नागरिकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे. पर्यटकांनी आपली मर्यादा सांभाळून राहावे व पर्यटनाचा आनंद लुटावा असे त्यांनी सुचविले आहे. राष्ट्रवादीचे नेते राजन घाटे यांनी, एका रशियन पर्यटकाने एका स्थानिकाचा खून केला, हा विषय अतिशय गंभीर असून याचा राष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा केला जावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून बेकायदा व्यवसाय करणाऱ्या विदेशी नागरिकांविरुद्ध पुन्हा एकदा उठाव करण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान, स्थानिकांनी या मारहाणीत कॉस्ता व्यतिरिक्त आणखी चार विदेशी नागरिकांचा हात असल्याची माहिती देऊन पोलिसांनी त्यांनाही त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे.
Wednesday, 17 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment