पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): गोमंतकातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, विश्वचरित्रकार, कवी कालिदास पुरस्कार विजेते श्रीराम पांडुरंग कामत यांचे आज सकाळी साडेसातच्या सुमारास बेळगाव येथील केएलई इस्पितळात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव आज गोव्यात आणल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता सांतइनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यावेळी खास उपस्थिती लावून त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित पुत्र ज्ञानेश व महेश, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने बेळगाव येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचा अंत झाला. दुपारी तीन वाजता त्यांचे पार्थिव पर्वरी येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर तसेच साहित्य,कला आदी क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली. संध्याकाळी ५ वाजता सांतइनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांत साहित्यिक रवींद्र घवी, स्वातंत्र्यसेनानी नागेश करमली, पद्मश्री सुरेश आमोणकर, मुख्यमंत्र्यांचे वृत्तपत्र सल्लागार सुरेश वाळवे, पत्रकार सागर जावडेकर, कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, गोमंत विद्या निकेतनचे सचिव जनार्दन वेर्लेकर आदी मान्यवरांचा समावेश होता.
१७ मे १९३४ रोजी अस्नोडा येथे जन्मलेले श्रीराम कामत एम. ए. (मराठी - इंग्रजी) झाले होते. महाविद्यालयीन काळात त्यांनी नाट्यलेखन, ग्रंथ समीक्षा तसेच वृत्तपत्र स्तंभलेखन केले. कला, साहित्य, राजकारणास वाहिलेले "मांडवी' हे मासिक त्यांनी अस्नोडा येथूनच सुरू करून १९६२ ते १९७० पर्यंत त्याचे संपादन केले. गोमंतकासारख्या सुंदर भूमीत उण्यापुऱ्या तीन तपांच्या, ७४० क्षेत्रांतील, २३७ तज्ज्ञांच्या कष्टातून, विश्वचरित्रकोश हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प झपाट्याने आकाराला येत होता. त्याचे प्रमुख संपादक म्हणून ते काम पाहत होते. एकूण ६ खंडांच्या या विश्वचरित्र कोशातील पाच खंड प्रकाशित झाले आहेत. सहावा निम्म्याहून अधिक पूर्ण झाला होता व त्याचे प्रकाशन यावर्षी होणार होते. केप्यात २००२ मध्ये भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात विश्वचरित्रकोशकार म्हणून सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. पर्वरी लायन्स क्लबतर्फे विश्वचरित्रकोशकार म्हणून त्यांना गौरवण्यात आले होते. पुणे मराठी ग्रंथालयातर्फे २९ ऑक्टोबर २००२ रोजी वर्धापनदिन पुरस्कार, गुरुकुल प्रतिष्ठान - पुणेतर्फे सत्कार, गोमंतक सेवा संघ - विलेपार्ले मुंबईतर्फे फोंडा गोवा येथे सत्कार, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठान सोलापूरतर्फे सन्मान व पुरस्कार, गोवा सरकारचा २००६ सालचा गुणगौरव पुरस्कार, डॉ. पद्मिनी भांडारकर, नागपूर यांचा वैयक्तिक पुरस्कार, लक्ष्मीदास बोरकर पत्रकारिता पुरस्कार, अस्नोडा ग्रामविकास सेवा संघ पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरीतर्फे डॉ. श्रीधर केतकर कोशवाङमय स्मृती पुरस्कार, कृष्णदास शामा पुरस्कार, बार्देशकर गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे बार्देशकर ज्ञातीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या व्यक्तीस देण्यात येणारा सुमतीबाई रा. शिरोडकर पुरस्कार आणि नुकताच कोकण मराठी परिषदेतर्फे देण्यात आलेला कवी कालिदास पुरस्कार, असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले होते. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सव्विसाव्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. विश्वचरित्रकोशातील नोंदींव्यतिरिक्त विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतूनही त्यांनी लेखन केले आहे.
Tuesday, 16 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment