Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 11 December 2009

तेलंगणला केंद्राची मान्यता, आंध्रात मोठा राजकीय पेचप्रसंग

९३ आमदार, एका खासदाराचा राजीनामा
कॉंग्रेस, तेदेपा आणि प्रजा राज्यमच्या आमदारांचा समावेश

हैदराबाद, दि. १० : केंद्र सरकारच्या वेगळ्या तेलंगण राज्य निर्मितीच्या निर्णयाला २४ तास पूर्ण होण्याआधीच जोरदार विरोध होऊ लागला असून राज्यातील कॉंग्रेस, तेलगू देसम पार्टी आणि प्रजा राज्यम पार्टी मिळून एकूण ९३ आमदार आणि कॉंग्रेसच्या एका खासदाराने राजीनामा दिल्याने आंध्रात मोठाच राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आपल्या निर्णयाने कॉंग्रेसमध्येच एवढी मोठी प्रतिक्रिया उमटेल, याचा अंदाज पक्षाला न आल्याने संतप्त खासदारांना शांत करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तातडीने सर्व खासदारांची बैठक बोलावली. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी खासदारांना दिले. तर, केंद्राच्या निर्णयाविरुद्ध राज्याच्या अनेक भागात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काही ठिकाणी दगडफेक आणि रास्ता रोकोच्या घटना घडल्या आहेत. तर, तेलंगणाच्या निर्मितीसाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रियांची पूर्तता केंद्र सरकार करेल, अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत दिली.
वेगळ्या तेलंगण राज्य निर्मितीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी करताच या ९३ आमदारांनी आपले राजीनामे विधानसभेचे अध्यक्ष किरण कुमार रेड्डी यांच्या स्वाधीन केले. तथापि, हे राजीनामे अध्यक्षांनी स्वीकारले की नाही, याबाबत लगेच माहिती मिळू शकली नाही.
राजीनामे दिलेल्या ९३ आमदारांमध्ये कॉंग्रेसचे ५३, तेलगू देसमचे २९ आणि प्रजा राज्यमच्या ११ आमदारांचा समावेश आहे. तर, विजयवाडाचे कॉंग्रेसचे खासदार लगदापती राजगोपाल यांनी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांच्या स्वाधीन केला.
आम्हाला विश्वासात न घेता कॉंग्रेसने एकतर्फी निर्णय घेण्याला या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या निर्णयामुळे आम्हाला खूपच वेदना झाल्या. आंध्र प्रदेशच्या विविध भागांतून हजारो लोक रोजगारासाठी हैदराबादला येत असतात. राज्याचे विभाजन झाल्यानंतर त्यांचे काय होणार? असा प्रश्न कृष्णा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार पी. वेंकटरामय्या यांनी विधानसभेत विचारला.
केंद्र सरकार आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तेलंगणबाबत घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या संदर्भात निर्णय घेताना सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे ते म्हणाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी तेलंगणचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे.
२९४ सदस्यीय आंध्र विधानसभेत तेलंगण भागातील ११९ आमदार आणि १७ खासदार आहेत. या ११९ पैकी ५१ आमदार हे कॉंग्रेसचे आहेत. २९४ सदस्यीय विधानसभेत कॉंग्रेसचे १५५, तेलगू देसमचे ९२ आणि प्रजा राज्यमचे १८ आमदार आहेत. ज्या खासदारांनी राजीनामे देण्याची घोषणा केली आहे, त्यात लगदापती राजगोपाल आणि अनंतवेंकटरामी रेड्डी (दोन्ही लोकसभा) आणि मैसूरा रेड्डी (तेलगू देसम राज्यसभा) यांचा समावेश आहे.
तिकडे उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत करताना ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा केला.
हिंसाचार, विरोध सुरू
वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीला विरोध करण्यासाठी आज रायलसीमा आणि राज्याच्या किनारपट्टी भागात लोकांनी अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक केली तर अनेक ठिकाणी रस्ते रोखून धरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. आम्हाला अखंड आंध्र प्रदेशच हवा अशा घोषणा देत विद्यार्थी आणि विरोधकांनी विशाखापट्टम, गुंटूर, कृष्णा, अनंतपूर आणि चित्तूर या रायलसीमा भागातील जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली. अनंतपूर येथील श्रीकृष्ण देवराय विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांनी आज ठिकठिकाणी आंध्र एसटीच्या बसेसवर दगडफेक केली व काचा फोडल्या. तसेच अनेक ठिकाणी रास्ता रोको करून वाहतूक रोखली, अशी माहिती अनंतपूरचे पोलिस अधीक्षक मुरूगेश कुमार सिंग यांनी दिली. विशाखापट्टम येथे "सम्यक आंध्र प्रदेश' अशा घोषणा देत विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
विजयवाडा येथे कॉंग्रेस नेत्यांनी साखळी उपोषण सुरू केले असून उद्या शुक्रवारी विजयवाडा बंदचे आवाहन केले आहे. तर, काही विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुंटूर येथे आचार्य नागार्जुन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले व मानवी साखळी उभारून रास्ता रोको आंदोलन केले. पूर्व गोदावरी जिल्ह्यात आंदोलकांनी अनापर्ती गावात रेल रोको आंदोलन केले.

No comments: