पोलिस महासंचालकांच्या
गाडीचा वापर चैनबाजीसाठी!वास्को, दि. ६ (प्रतिनिधी)ः वास्को येथे पोलिस महानिरीक्षकांच्या मुलाकडून सरकारी वाहन ठोकरल्याप्रकरणी झालेल्या घटनेमुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी व मंत्र्यांची मुले यांच्यातील घनिष्ठ मैत्रीची यापूर्वी चर्चा होतीच परंतु या घटनेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा समोर आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अपघातात सापडलेली जीए-०७-जी-००६३ ही "इनोव्हा' गाडी नेमकी कोण वापरत होता, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वाहतूक खात्यातर्फे संकेतस्थळावर दाखवण्यात येणाऱ्या माहितीनुसार ही गाडी पोलिस महासंचालकांच्या नावावर नोंद आहे. आता ही गाडी पोलिस महासंचालकांची असेल तर ती पोलिस उपमहानिरीक्षकाच्या मुलाकडे कशी काय पोहचली, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
वास्को येथे एका "फास्ट फूड' सेंटरमध्ये जात असताना पहाटे ४.१५ च्या सुमारास हा अपघात चिखली चढावावर झाला होता. ही गाडी पोलिस महानिरीक्षकांचा मुलगा सिद्धार्थ सिंग चालवत होता व त्यात वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांच्या मुलासह लिएंडर दा क्रुझ, करण विर्जीनकर, राहूल पवार आदी दोस्त मंडळी होती. या अपघातानंतर सिद्धार्थ सिंग याच्याविरोधात वास्को पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, वास्को पोलिस स्थानकाचे प्रभारी उपनिरीक्षक जिवबा दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सिद्धार्थ सिंग, लिएंडर दा क्रुझ, राहुल पवार व करण विर्जीनकर यांची जबानी घेतल्याची माहिती दिली. वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांचा मुलगा मात्र अजूनही गोवा आरोग्य महाविद्यालयात उपचार घेत असून तो देखरेखीखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आल्याचेही यावेळी पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, वास्को- चिखली चढतीवर झालेल्या या अपघातात वाहनाचा हा धक्का एवढा जबरदस्त होता की त्या खांबाचे दोन तुकडे झाले होते. या अपघातात सरकारी वाहनाचे सुमारे ४ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचीही खबर पोलिसांनी दिली. दरम्यान, पहाटे ४.१५ च्या सुमारास "फास्टफूड' मध्ये खाण्यासाठी जाणारी ही मंडळी रात्रभर होती कुठे, असाही सवाल यानिमित्ताने केला जात आहे. सरकारी वाहने आपल्या मुलांना चैन करण्यासाठी उडवण्याची मोकळीक वरिष्ठ पोलिसांनी दिलीच कशी असा सवाल करून ते दारूच्या नशेत तर नव्हते,असाही सवाल केला जात आहे. पोलिसांकडे चौकशी केली असता त्यांची आरोग्य तपासणी केल्याचे त्यांनी सांगितले. ते दारूच्या नशेत होते की नाही याबाबत मात्र पोलिसांनी बोलण्यास नकार दिला.
Monday, 7 December 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment