Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 23 December 2009

महिला सदस्याचा थयथयाट, मुख्यमंत्री पुन्हा एकदा चाट!

'इफ्फी'ची खलबते उघड झाल्याने अस्वस्थता!
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवरील एका खास महिला सदस्याकडून संपूर्ण समितीलाच वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे, अशी जोरदार चर्चा सध्या मनोरंजन संस्थेत सुरू आहे. काल सुमारे तीन तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत सदर खास महिला सदस्य व इतर काही सदस्यांत "इफ्फी'संबंधी व्यवहारांची माहिती वृत्तपत्रांत छापून येत असल्याच्या विषयावरून बरीच जुंपली. सदर महिला सदस्य ही खास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मर्जीतील असल्याने यावेळीही त्यांनाच हस्तक्षेप करावा लागला व त्यात त्यांची बरीच दमछाक झाल्याची खबर संस्थेच्या अधिकाऱ्यांत सध्या बऱ्याच चवीने चर्चिली जात आहे.
यंदाच्या ४० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली खरी; परंतु या महोत्सवाचे कवित्व मात्र आता बरेच दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत काल २१ रोजीच्या बैठकीनंतर मिळाले. अलीकडेच विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी यंदाच्या "इफ्फी' महोत्सवासाठी हॉटेल ठरवण्याबाबतचा निर्णय हा एकतर्फी झाल्याचा आरोप केला होता. हा निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली बैठक ही प्रत्यक्षात झालीच नाही, असा आरोप करून पर्रीकर यांनी या घटनेचा पर्दाफाश केला होता. पर्रीकरांनी भर विधानसभेत केलेल्या या आरोपांमुळे मुख्यमंत्री कामत त्रिफळाचित झाले व त्यांना या आरोपांचे खंडनही करता आले नाही. कालच्या बैठकीत मात्र पर्रीकरांच्या या आरोपांबाबत सखोल चर्चा झाली, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. हे आरोप होताना विधानसभेत गप्प बसलेले मुख्यमंत्री काल मात्र याविषयावरून उघडपणे प्रसारमाध्यमांकडे बोलले व पर्रीकरांनी केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नाही, असाही दावा त्यांनी केला. महोत्सव हॉटेल निवडीचा निर्णय पूर्णपणे कायदेशीर व नियमांना धरूनच होता, याबाबत त्यांनी ठाम भूमिका घेतली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत पर्रीकरांचे आरोप फेटाळण्याबाबत नेमकी काय खलबते झाली याची माहिती आता हळूहळू समोर यायला लागली आहे.
दरम्यान, "इफ्फी'संबंधी मनोरंजन संस्थेच्या बैठकीत होणारी चर्चा व विविध निर्णय यांची इत्थंभूत माहिती वृत्तपत्रांवर छापून येते, असे सांगून प्रशासकीय समितीवरील एका बड्या महिला सदस्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय समितीवरील राजकीय आश्रयाने स्थान मिळवलेल्यांकडूनच ही माहिती वृत्तपत्रांना दिली जाते, असा शेराही या महिला सदस्याने हाणल्याने या बैठकीत वातावरण बरेच गरम झाले. एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री कामत यांनी संपूर्ण प्रशासकीय समितीचीच फेररचना करावी, असा सल्लाही या महिला सदस्याने दिल्याने बाकी सदस्य मात्र भडकले. सदर महिला सदस्याने सरसकट हा आरोप केल्याने इतर अनेक सदस्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. जलस्रोतमंत्री तथा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष फिलिप नेरी रॉड्रिगीस यांनी तर थेट या आरोपांबाबत नाराजी व्यक्त करून आपल्या राजीनाम्याचीच तयारी दर्शवली, असेही कळते. समितीच्या इतरही काही सदस्यांनी हा आरोप निश्चित असावा व अशा सदस्यांची नावे जाहीर व्हावीत असे सुचवले. सरसकट आरोप करून सर्वांनाच त्यात गोवण्याचे प्रयत्न केले जाणे ठीक नाही, असेही अनेकांनी सांगितले.
मुळात प्रसिद्ध उद्योजक असलेल्या व प्रत्यक्ष या महोत्सव व्यवहाराचा एक भाग असलेल्या सदर महिला सदस्य याच मुळी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असल्याने राजकीय आश्रयाने समितीवर नियुक्त झालेल्या आहेत. या महिला सदस्याकडूनच असे वाऱ्यावर आरोप केले जाणे कितपत योग्य, असेही काही सदस्यांचे म्हणणे होते. या एकूण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मात्र परिस्थिती दोलायमान बनली असून नेमकी कुणाची बाजू उचलून धरावी अशा विवंचनेत ते सापडले आहेत.

No comments: