Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 20 December 2009

मयेत विजेच्या उच्च दाबाने घबराट २० लाखांची हानी; टीव्ही, फ्रीज जळाले

डिचोली, दि. १९ (प्रतिनिधी): मये पंचायतक्षेत्रातील हळदणवाडी प्रभागात विजेच्या उच्च दाबामुळे या प्रभागातील सुमारे पन्नास घरातील टीव्ही आणि फ्रीज जळाले असून बहुतेक घरातील ट्युबलाईट आणि बल्ब जळून गेले आहेत. या कहरामुळे ग्रामस्थांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असून वीज खात्याने सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा या खात्याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मये भूविमोचन समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर, यंग स्टारचे अध्यक्ष संदीप माईणकर आणि अन्य ग्रामस्थांनी दिला आहे.
आज शनिवार रोजी सकाळी ११ च्या दरम्यान चिमुलवाडा, पाटो आणि कारभाट येथील घरातील विजेचे दिवे अत्यंत प्रखर बनले. हा प्रकाश वाढतच गेला. सर्व दिव्यातून धूर निघू लागला आणि दिवे मोठा आवाज करून फुटू लागले. तसेच टिव्ही आणि फ्रिजांचाही मोठा आवाज होऊन ते बंद पडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घरातील महिला मुलांना घेऊन बाहेर आल्या. घरात जळाल्याचा दर्प येऊ लागला. काहींनी त्वरित विजेची बटणे बंद केली. पंखे खूप वेगाने फिरू लागले, अशी माहिती वृंदा मयेकर या महिलेने पत्रकारांना दिली.
याबाबत लाईनमन मुकुंद परब यांना कळवताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित घटनेची माहिती आपल्या अधिकाऱ्यांना दिली. साहाय्यक अभियंते पार्सेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले.
वरील घटनेमुळे बहुतेक घरातील टिव्ही आणि फ्रीज जळाले आहेत. भंडारवाडा, चिमुलवाडा, पाटो आणि कारभाट या वाड्यांसाठी एकच ट्रान्सफॉर्मर समोर असून घरे जास्त असल्याने या ट्रान्सफॉर्मरवर अधिक ताण पडतो. यासंबंधी वारंवार वीज खात्याला कळवूनसुद्धा खाते त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यांवरील पथदीप लागत नाहीत. रात्री विजेचा दाब कमी असल्याने ट्युब लाईट पेटत नाहीत. पाटो आणि कारभाट भागासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर घालावा, अशी आग्रही मागणी करूनसुद्धा वीज खात्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज ग्रामस्थांना लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे मयेकर आणि माईणकर यांनी सांगितले.
या घटनेची वीज खात्याने त्वरित दखल घेऊन नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या घरी भेट देऊन अहवाल तयार करून सर्व नुकसानग्रस्तांना ताबडतोब भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments: