Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 13 December 2009

तेलंगणची राजधानी हैदराबादच : चंद्रशेखर राव

हैदराबाद, दि. १२ - वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीला काही घटक विरोध करीत असले तरी, संपुआचे नेतृत्व आपल्या आश्वासनावर कायम राहील असे तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. आम्हाला संपुआच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि वेगळ्या तेलंगणा राज्याच्या आश्वासनांची ते पूर्तता करण्याचा आपला शब्द पाळतील, असे आम्हाला वाटते. आम्ही संपुआचे आभारी आहोत, असे चंद्रशेखर राव म्हणाले. तसेच तेलंगणची राजधानी हैदराबादच असेल, असे त्यांनी निक्षून सांगितले.
तेलंगणाला विरोध करण्यासाठी आमदारांनी राजीनामे देण्याची जी मोहीम हाती घेतली आहे, त्याला फार महत्त्व देण्याचे काहीही कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
वेगळ्या तेलंगणाची निर्मिती करण्यासाठी विधानसभेच्या ठरावाची काहीही गरज नाही. फक्त केंद्र सरकारने आंध्रच्या विधिमंडळाला सूचना तेवढी द्यायची आहे, असे राव म्हणाले. आपण आणखी किती दिवस वाट पाहणार, असा नेमका प्रश्न विचारला असता राव म्हणाले, पी. चिदंबरम यांनी घोषणा करताना आपण केंद्र सरकारच्या वतीने घोषणा करीत आहोत, असे स्पष्टपणे म्हटले होते. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांची आहे. हा आता केंद्र सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, असे उत्तर त्यांनी दिले.
केंद्राने घोषणा केल्यानंतर ज्या घडामोडी घडत आहेत, त्याची चिंता आम्हाला करण्याचे कारण नाही. ही घोषणा करण्यापूर्वी त्याचे काय पडसाद उमटतील, याची जाणीव त्यांना असेलच. आता निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची हे त्यांना ठरवायचे आहे. आपण केंद्राला काही कालावधी नेमून देणार आहात काय, या प्रश्नाच्या उत्तरात राव म्हणाले, तेलंगणाच्या जनतेने आतापर्यंत खूप वाट पाहिली आहे आणि आणखी वाट पाहण्याची त्यांची तयारी नाही. तेलंगणाची राजधानी हैदराबादच असेल, त्यावर आता पुनर्विचार करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंजाब आणि हरयाणा मिळून जशी चंदीगड ही एकच राजधानी आहे, त्या धर्तीवर हैद्राबादला दोन्ही प्रदेशाची राजधानी करण्याचा प्रस्ताव चंद्रशेखर राव यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, चंदीगड आणि हैद्राबादची कधीच तुलना होऊ शकत नाही. आता हा निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे, असे राव म्हणाले. तेलंगणाला होत असलेला विरोध पाहता आपण दोन पावले मागे येणार का, असा प्रश्न विचारला असता राव म्हणाले, आता हा प्रश्नच उद्भवत नाही. धनुष्यातून बाण सुटलेला आहे, तो आता परत आणता येणार नाही.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानताना राव म्हणाले, संपूर्ण तेलंगणाच्या जनतेचा भार आता त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळेच आमचे हे स्वप्न साकार झाले आहे. सोनिया गांधी माझ्यावर मुलासारखे प्रेम करतात. माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही आमची मागणी मान्य होण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत, असे राव म्हणाले.
दरम्यान, टीआरएसने आज हैदराबाद आणि तेलंगणा भागात अनेक ठिकाणी विजयी सभांचे आयोजन केले होते.
००००

No comments: