Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 19 December 2009

डॉ.अनिल काकोडकरांना 'गोमंत विभूषण' पुरस्कार

पणजी, दि. १८ (विशेष प्रतिनिधी): राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेले नामवंत गोमंतकीय, पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांना यंदा गोवा सरकारतर्फे "गोमंत विभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. गोवा घटकराज्यदिनी ३० मे २०१० रोजी श्री. काकोडकर यांना हा पुरस्कार एका सोहळ्यात प्रदान केला जाईल.
राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्यातर्फे स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने ही निवड केली आहे. हा पुरस्कार मूळ गोमंतकीय असलेल्या व विविध क्षेत्रांत आपल्या लौकिकाने गोव्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.
श्री. काकोडकर हे नामवंत भारतीय अणुशास्त्रज्ञ आहेत. ते भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तसेच भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याचे सचिव होते. ट्रॉम्बे येथील भाभा अणू संशोधन केंद्राचे ते १९९६ ते २००० पर्यंत संचालक होते व त्यांना भारतीय अणू कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली होती. २६ जानेवारी २००९ रोजी त्यांचा पद्मविभूषण देऊन गौरवही करण्यात आलेला आहे.
श्री. अनिल काकोडकर सध्या भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी, राष्ट्रीय विज्ञान अकादमी, महाराष्ट्र विज्ञान अकादमीचे ते सदस्य असून विविध संचालक मंडळावरही ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. १९९८ मध्ये काकोडकर यांना पद्मश्री, १९९९ मध्ये पद्मभूषण तर २००९ साली त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला मुख्य सचिव संजय श्रीवास्तव व कला आणि संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर उपस्थित होते.

No comments: