Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 15 December 2009

महागाईने त्रस्त महिलांचा मोर्चा

नागरी पुरवठा संचालकांना घेराव

भाजप महिलांतर्फे आंदोलन सुरू

पणजी,दि.१४ (प्रतिनिधी)- "कितली म्हारगाय गे सायबिणी, संसार कसो करचो आमी, बाजारांत गेल्यार दुडू पावना, हजाराच्या नॉटींक मोल ना.' महागाईच्या ओझ्याखाली भरडलेल्या व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे संसार चालवण्यासाठी कसरत करणाऱ्या संतप्त महिलांनी आज नागरी पुरवठा खात्याच्या मुख्यालयावर धडक दिली. नागरी पुरवठा खात्याचे संचालक सुनील मसुरकर यांना घेराव घालून,"या महागाईत जगायचे कसे हे तुम्हीच सांगा'असा खडा सवाल करून त्यांना चांगलेच धारेवर धरले.
भाजप महिला मोर्चातर्फे महागाई विरोधातील आंदोलनाला आजपासून दणक्यात सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी मोर्चाच्या अध्यक्ष मुक्ता नाईक हिच्या नेतृत्वाखाली सुमारे दीडशे ते दोनशे महिलांनी नागरी पुरवठा खात्यावर धडक दिली. भाजपच्या उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, शुभांगी वायंगणकर, लता नाईक, पणजीच्या नगरसेविका वैदही नाईक, ज्योती मसुरकर आदी महिला पुढारी यावेळी हजर होत्या. संतप्त महिलांनी यावेळी
महागाईविरोधातील खदखदणारा आपला रोष महागाईचे गांभीर्य प्रकट करणाऱ्या विविध घोषणा देत व्यक्त केला. येथील जुन्ता हाउसमधील नागरी पुरवठा खात्याच्या मुख्यालयावर धडक देत या महिला रणरागिणींनी नागरी पुरवठा खाते संचालकांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. मोर्चाबाबत माहिती असूनही या महिलांना सामोरे जाण्याचे धाडस नसलेल्या संचालकांना उपस्थित करण्याचा हट्टच संतप्त महिलांनी केल्याने अखेर त्यांना हजर करण्यात आले. महागाई रोखणे आपल्या हातात नाही, परंतु जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा सामान्य लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असे आश्वासन देत संचालकांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही उपस्थिती लावली. भाजपचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर व भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रूपेश महात्मे हे देखील याठिकाणी हजर होते. मोर्चेकरी महिलांनी कांद्यांच्या माळा संचालकांच्या खुर्चीवर घालून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी पर्रीकर यांनी नागरी पुरवठा संचालकांना दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यात खात्याला अपयश आल्याचा ठपका ठेवला. प्रत्यक्षात बेळगांव येथे कांदे,बटाटे आदी भाजीचे घाऊक दर कमी असताना इथे मात्र वाढीव दराने भाजी विकली जाते. फलोत्पादन महामंडळ ७० टन भाजी खरेदी करते तर मग बाजारभाव नियंत्रणात कसे काय येत नाही. सरकार राबवत असलेल्या योजनेचा फलोत्पादन महामंडळ व इतर लोक गैरफायदा घेत नाहीत याची हमी संचालक देणार काय,असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्रातही कॉंग्रेस आघाडीचेच सरकार आहे पण तेथील सरकारने काहीअंशी सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत पण गोवा सरकारला मात्र जनतेच्या व्यथेची फिकीरच नाही,अशीही टीका यावेळी त्यांनी केली. राज्यात धान्याचा अथवा भाजीचा साठा करून ठेवण्याचे प्रकार घडतात काय, याकडेही खात्याचे लक्ष नसल्याचे यावेळी पर्रीकर म्हणाले. साखर, तेल आदींबाबत केंद्राच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न होत नाहीत,असेही ते म्हणाले. महागाईचा दर असाच वाढत गेला तर मात्र सामान्य माणूस सहनशीलता गमावून बसेल,असा इशाराही पर्रीकर यांनी यावेळी दिला.
महागाई दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे व सरकार पूर्णपणे हतबल झाल्याप्रमाणे हे पाहत आहे. बाजारात दुकानदारांकडून आपल्या मर्जीप्रमाणे दर आकारले जात असून त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही,अशी टीका मुक्ता नाईक यांनी केली. महागाई रोखणे सरकारच्या हातात नाही,असे म्हणून सरकार जर गप्प राहिले तर मग सामान्य जनतेने जगावे कसे,असा सवालही तिने केला.
मंत्री खाण व्यवसायात व्यस्त ः पर्रीकर
विद्यमान सरकारात किमान आठ मंत्री खाण व्यवसायात गुंतले आहेत.खनिजापासून पैसा कमावण्यात व्यस्त मंत्र्यांना सामान्य लोकांच्या समस्यांबाबत काहीही देणेघेणे राहिलेले नाही,असा आरोप पर्रीकर यांनी केला. मधू कोडा यांच्याप्रमाणे गोव्यातीलही अनेक मंत्र्यांनी अल्पावधीत जो पैसा कमावलेला आहे, त्याची लवकरच भांडाफोड होईल,असे संकेतही त्यांनी दिले. या सरकारने सामान्य जनतेला संपवण्याचाच विडा उचलला आहे. उद्या १५ पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडू,असेही पर्रीकर म्हणाले. या सरकारला मांडवीत बुडवावेच लागेल,असे सांगून पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत द्या,असे आवाहनही पर्रीकर यांनी केले.

No comments: