पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): काणकोण तालुक्यातील उघड्यावर पडलेल्या पूरग्रस्तांना दिलासा देण्यात प्रशासकीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असताना गांधी जयंती धरून तीन दिवसांच्या सुट्टीवर असलेल्या प्रशासकीय यंत्रणेचे कुठेच अस्तित्व जाणवत नव्हते. केंद्राकडून मदतनिधी मिळेल व त्यानंतर या लोकांचे पुनर्वसन केले जाईल हे अजिबात चालणार नाही. आपद्ग्रस्तांना योग्य पद्धतीने व पुरेशा प्रमाणात तात्काळ मदत मिळायलाच हवी, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज पणजी येथे पत्रपरिषदेत ते बोलत होते. मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यावेळी उपस्थित होते. पुरामुळे भयाण प्रसंग काणकोणवासीयांवर ओढवला आहे. तसेच राज्यातील इतर भागांतही शेतीची प्रचंड नासाडी झाली आहे, त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार या आपत्तीचा आकडा शंभर कोटी रुपयांवर जाईल, अशी शक्यता श्री. पर्रीकर यांनी व्यक्त केली.
काणकोण भागांत शेकडो लोकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांच्या घरांत पाणी शिरून चिखल साचला आहे. मुख्यमंत्री व इतर मंत्री या भागाला भेट देतात. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा त्यांच्याभोवतीच घिरट्या घालत आहे. सरकारी मदत सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सुनियोजनाची गरज आहे. सगळा संसारच वाहून गेलेल्या लोकांना सुरुवातीला प्राधान्यक्रमाने पिण्याचे पाणी, कपडे, स्टोव्ह, केरोसीन, गॅस आदींची सोय करून देणे गरजेचे आहे. पहिले दोन दिवस सरकारी यंत्रणेचे अस्तित्वच दिसले नाही. या काळात येथील केशव सेवा साधना संस्थेतर्फे सुमारे ६०० ते ७०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. भाजयुमोतर्फे तात्काळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. काही लोकांच्या घरात चिखल साचला असून अग्निशमन दलाच्या मदतीने हा चिखल हटवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. तसे घडलेले दिसत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक भागांत या कामांत झोकून दिले आहे. मुख्यमंत्री कामत यांनी पीडितांच्या हाती धनादेश ठेवले; पण त्या बदल्यात बॅंकेच्या साहाय्याने रोख रक्कम दिली असती तर त्याचा जादा फायदा झाला असता. बॅंकेत हे धनादेश वठण्यास दोन दिवस गेले. पैसे मिळाले तरी वस्तू विकत घेण्यासाठी दुकाने हवीत. तीदेखील पुरात वाहून गेल्याने मडगाव शहरातून काही प्रमाणात जीवनावश्यक वस्तू या लोकांना विकत घेण्यासाठी उपलब्ध करून देता येणे शक्य आहे का, याचाही विचार व्हायला हवा. काणकोणात ही दारूण परिस्थिती ओढवली असताना राज्यात मोफत सिलिंडर वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेले सिलिंडर काणकोण भागाकडे वळवण्याची सुबुद्धीही कुणालाच सुचली नाही हे दुर्दैवच, असेही पर्रीकर म्हणाले.
सुरुवातीला आपद्ग्रस्तांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री कामत हे स्थानिक आमदार विजय पै खोत यांना बरोबर घेऊन फिरले; परंतु धनादेशाचे वाटप करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून भलत्याच लोकांना सोबत घेण्याची त्यांची कृती अशोभनीय असल्याचा टोला पर्रीकर यांनी हाणला. आमदार विजय पै खोत व रमेश तवडकर यांच्याकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून त्यांना मदत करण्यासाठी धडपड सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सुरुवातीला या भागांत सरकारने पाठवलेल्या तलाठ्यांच्या गटाकडून कोऱ्या कागदावर पूरग्रस्तांच्या सह्या घेण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याचे पर्रीकर म्हणाले. मुळात सदर तलाठ्यांनी नुकसानीचा तपशील लिहून घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच हानीचा नेमका तपशील मिळू शकेल,असे पर्रीकर म्हणाले.
-------------------------------------------------------------
भाजपतर्फे मदतनिधी
भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून पक्षातर्फे १ लाख रुपये घोषित केले आहेत. भाजप विधिमंडळ गटाकडून १ लाख रुपये या मदतनिधीत जमा करण्यात आले आहेत. पक्षाचे कार्यकर्ते सर्वत्र फिरून मदतनिधी गोळा करणार असल्याने त्यांना जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. पक्षाला मोठ्या प्रमाणात मदत करणाऱ्यांना करसवलतही प्राप्त होणार आहे. एखाद्या दात्याला भाजपनिधीमार्फत पूरग्रस्तांना मदत पोहचवायची असले तर त्यांनी भाजप मदत निधीच्या नावाने धनादेश किंवा रोख रक्कम पक्षाच्या मुख्यालयात पाठवावेत, असेही याप्रसंगी सांगण्यात आले.
Tuesday, 6 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment