काणकोणात प्रत्यंतर
मडगाव, दि.६(प्रतिनिधी): काणकोणमधील प्रलयकारी महापुराचा राजकीय लाभ उपटण्यासाठी सध्या सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये अहमहमिका लागलेली असून त्याचे प्रत्यंतर दिवसागणिक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहे. यात पूर निवारण कामावर भर देण्याऐवजी या कामाचा आपल्याला राजकीय लाभ कसा घेता येईल याचीच शक्कल लढविताना ते दिसत आहेत. सरकारी अधिकारीसुद्धा या कामी त्यांना मदत करताना आढळून येत आहेत.
शुक्रवारी दुपारी आलेल्या या प्रलयाला आज पाच दिवस उलटलेले असले तरी पूर निवारण कामात सरकारी यंत्रणेपेक्षा स्वयंसेवी संस्थांनीच अधिक आघाडी घेतलेली दिसून येत आहे. खोतीगाव, मणे सारख्या भागात अजूनही सरकारी मदत पोहोचलेली नाही, अशी तक्रार तेथील आपद्ग्रस्तांनी आज त्या भागात गेलेल्या पत्रकारांकडे केली. सरकारी मदत मग ती आर्थिक असो वा वस्तूरुपांतील असो ती दळणवळणाची सोय असलेल्या भागापुरती आहे. पण ज्या भागात पाय तुडवत जावे लागते असे भाग अजूनही मदतीविना आहेत. परंतु सरकारी यंत्रणा मात्र सर्व भागात मदत पोचल्याचे दावे करत आहे. प्रत्यक्षात आपद्ग्रस्तांच्या हाल अपेष्टा सुरूच आहेत.
ज्यांची घरे वाहून गेली आहेत त्यांना धान्य मिळाले पण ते शिजविण्यासाठी भांडी नाहीत, स्टोव्ह मिळाले पण त्यात घालण्यासाठी केरोसीन कोठून आणणार अशी येथील परिस्थिती आहे. अखेर आज एका सहृदयी व्यापाऱ्याने प्रसंग ओळखून केरोसीन साठा उपलब्ध करून दिला. ही अवस्था एका वाड्याची नाही तर पैंगीण, लोलये व श्रीस्थळ पंचायतीच्या कक्षेतील गालजीबाग व तळपण नदीच्या तीरावर असलेल्या प्रत्येक वस्तीची आहे.
रविवारी मुख्यमंत्र्यांनी दहा हजारांचा धनादेश व दोन हजार रोकड अशी मदत वितरित केली पण ही मदत करताना देखील येथे राजकारण केले गेले. यात आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून असलेली सत्ताधारी पक्षांतील मंडळी असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे. या पुराचा फटका दक्षिण काणकोणला सर्वाधिक बसला आहे. त्यामानाने उत्तर काणकोणला कमी प्रमाणात फटका बसल्याची साक्ष कोसळलेली व वाहून गेलेली घरेच देत आहेत. असे असताना रविवारी दिलेल्या धनादेशांत पैंगीण पंचायतीतील रहिवाशांसाठी एकही धनादेश नव्हता. वास्तविक सर्वाधिक फटका या पंचायतीला बसलेला असताना असा हा प्रकार घडावा यातून पुराचा राजकीय फायदा घेण्याचा डाव उघड होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपद्ग्रस्तांची नाव नोंदणीच नव्हे तर नुकसानभरपाईचा आकडा ठरविण्यापर्यंत या मंडळीचा तेथे हस्त क्षेप सुरू असून अधिकारी त्यांच्या दडपणाला बळी पडत आहेत. त्यामुळे आपद्ग्रस्तांमध्ये असंतोष माजलेला असून त्यात खरे आपद्ग्रस्त बाजूला पडून भलतेच लोणी खाऊन मोकळे होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या भागाला भेट देणारे मुख्यमंत्री वा अन्य मंत्र्यांनी कुठे जावे कुठे जाऊ नये हे देखील हीच मंडळी ठरवते. यामुळे 'आग रामेश्र्वरी अन् बंब सोमेश्र्वरी ' असा प्रत्यय काणकोणात येऊ लागलेला आहे.
Wednesday, 7 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment