Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 8 October 2009

धनादेश वितरणातही "गोंधळ'

आगोंद, दि. ७ (वार्ताहर)- काणकोण येथील जलप्रकोप झालेल्या भागात मदत पोचवण्याच्या कार्यात शासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आज संध्याकाळपर्यंत महालवाडा येथील वत्सला पागी व अन्य पाच कुटुंबांना सरकारतर्फे १० हजारांचा धनादेश व दोन हजार रोख रक्कम मिळाली नव्हती. यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात विचारपूस केली असता उपजिल्हाधिकाऱ्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला तयार असलेले दोन धनादेश त्वरित सुपूर्द करण्याचे आदेश दिले. उर्वरित चार कुटुंबांना मडगाव येथून धनादेश आल्यावर दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच पाणयेफोंड येथील विनायक सज्जगी या पूरग्रस्तालाही अद्याप मदत धनादेश मिळालेला नसल्याचे स्पष्ट झाले.
काणकोणात शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असतानाच स्वयंसेवी संघटना व भाजपतर्फे मदतकार्य जोरात सुरू असल्याचे चित्र आज अनेक ठिकाणी दिसले. किंदळे, पाणयेफोंड, पैंगीण, मयक, पर्तगाळ, भाटपाल, पासेल, मोर्खड, इडदर, तामणे भागात प्रत्यक्ष पुनर्वसनाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पूरग्रस्त भागात केवळ जेवणाची पाकिटे तसेच काही प्रमाणात कपडे लत्ते पुरवण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. ललित रिसॉर्ट या पंचतारांकित हॉटेलतर्फे दररोज सुमारे २ हजार जेवणाची पाकिटे पुरवली जात आहेत. भाजपतर्फे आज पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी परिस्थितीची जाण असलेले संबंधित भागाची इत्थंभूत माहिती असलेल्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी आपद्ग्रस्तांना अन्नधान्याचे वितरण केले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक साह्य उपलब्ध करण्यासाठी निधी संकलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाणयेफोंड मणगण येथील पंता सोमा पागी (७०) या वयोवृद्धाचे घर अन्य सात कुटुंबीयांच्या घरांसह जमीनदोस्त झाले होते. आज स्वयंसेवी संघटनांनी त्यांना मदत दिल्याने त्यांनी खुषी व्यक्त केली. पंता पागी आपल्या देविदास पागी या मुलासोबत राहत होते. घराच्या पायऱ्यांशिवाय अन्य कोणतीच खूण येथे अस्तित्वात नाही. शेगडी मिळालेली असली तरी इंधन नसल्याने अन्न कसे शिजवायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालेला आहे.

विहिंपतर्फे शालेय साहित्याचे वितरण
विश्व हिंदू परिषदेतर्फे आज शालेय विद्यार्थ्यांसाठी १०० स्कूल बॅग्ज, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रभात वेर्णेकर, मिलाताई कळंगुटकर पैंगीण भागातील आपद्ग्रस्तांना साहित्याचे वितरण केले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज संध्याकाळी ६ वाजता काणकोणातील परिस्थितीचा फेरआढावा घेतला. यानंतर त्यांनी आपला मोर्चा पैंगीण येथे वळवला. दरम्यान, सरकारतर्फे वितरित करण्यात येणारी मदत स्वतःच्या पक्षाची असल्याप्रमाणे भासवत कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून अक्षरशः उधळपट्टी सुरू असल्याची खंत येथील एक व्यापारी कृष्णा देसाई यांनी व्यक्त केली. गैरसरकारी संघटनांकडून दिली जाणारी मदत त्या त्या संघटनेने स्वतः जाऊन वितरित करावी, असे आवाहन त्यांनी केले.
क्रीडामंत्री बाबू आजगावकर, कॉंग्रेसचे विजय सरदेसाई, माजीमंत्री इजिदोर फर्नांडिस यांनी आज दुपारी महालवाडा पैंगीण येथे भेट दिली असली तरी अद्याप सरकारतर्फे या भागात कोणीच फिरकले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. आज या मंत्र्यांनी या भागाला भेट दिली खरी परंतु आश्वासनाखेरीज आपद्ग्रस्तांच्या पदरी काहीच पडले नाही, असे सांगण्यात आले.
काणकोणचे नगराध्यक्ष श्यामसुंदर देसाई यांनी लवकरच मदत निधी उभारण्याचे संकेत दिले. यात पालिका कर्मचारी आपला दोन दिवसांचा पगार तसेच नगरसेवकही आपले योगदान देणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

५० लाखांचे पॅकेज जाहीर
नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांनी काणकोण पालिकेने जाहीर केलेला पाच लाख रुपयांचा निधी चेकस्वरुपात संबंधितांना दिला. संपूर्ण जमीनदोस्त झालेल्या घरांचे सर्वेक्षण करून प्रत्येक घराच्या पुनर्निमितीसाठी ५० लाखांचे पॅकेज पाणयेफोंड मणगण येथे घोषित केले.
दरम्यान, गोवा पुनर्वसन महामंडळाचे अध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गोवा रेंदेर संघटनेचे अध्यक्ष व पुनर्वसन महामंडळाचे सदस्य सायमन डिसोझा, आरनॉल्ड रेगो, हनुमंत कोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गावकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी पाणयेफोंडच्या पूरग्रस्तांना मदत वितरित केली.

आयत्या बिळात नागोबा
मडगाव, (प्रतिनिधी): मडगाव नगरपालिकेने काल रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीत व्यत्यय आणल्याच्या आरोपाखाली जप्त केलेल्या चार फळगाड्यांवरील सर्व फळे आज काणकोण पूर पीडितांना पाठवून दिली व फुकटचे श्रेय उपटण्याचे काम केले. मिळालेल्या माहिती प्रमाणे अशा प्रकारे जप्त केलेल्या वस्तू दंड वसूल करून संबंधितांना परत केल्या जातात. मुख्याधिकाऱ्यांनीही प्रत्येकी एक हजार रु. दंड वसूल करून ही फळे मालकांना परत करावी असा शेरा मारला होता. त्यामुळे ते गाडे पालिकेच्या जागेत ठेवले होते. परंतु आज सकाळी आलेल्या नगराध्यक्षांनी ती फळे काणकोण येथील पूरग्रस्तांना पाठवून देण्याचे फर्मान सोडले व त्यामुळे नगरपालिकेने या फळांचे श्रेय फुकटचे लाटल्याची चर्चा आज पालिकेतच सुरू होती.

No comments: