Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 4 October 2009

आपत्कालीन यंत्रणा पणाला लावा : श्रीपाद नाईक

'इफ्फी' खर्चात कपात करा, वायफळ खर्च आवरा
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): गेल्या तीन दिवसांपासून राज्याला झोडपून काढलेल्या पावसामुळे काणकोण तालुक्याची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. तालुक्याच्या आपत्तीची भीषणता पाहिल्यास सुमारे दीडशे कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने नियोजित "इफ्फी' वरील खर्चात कपात करावी तसेच इतर वायफळ खर्चाला कात्री लावून या लोकांच्या पुनर्वसनासाठी आपली सारी यंत्रणा पणाला लावावी, अशी मागणी उत्तर गोव्याचे खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर उपस्थित होते. अशा प्रकारची भीषण आपत्ती पहिल्यांदाच काणकोण तालुक्यावर ओढवली आहे. या आपत्तीत शेकडो कुटुंबे बेघर झाली असून अनेकांची घरे जमीनदोस्त झाली तर इतरांची घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. तीन व्यक्ती वाहून गेल्याचा संशय असून जनावरांचाही पत्ता नाही. शेती, बागायती, उसाचे मळे आदी पाण्यासोबत लोटून गेल्याने या भागातील शेकडो लोकांचे संसारच उघड्यावर पडले आहेत. राज्य प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेने आपली सारी ताकद पणाला लावली आहे, त्यामुळे विनाकारण सरकारवर टीका करणे ठीक नसून त्यात सातत्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही खासदार श्री. नाईक यांनी केली.
या भागातील भाजपचे आमदार रमेश तवडकर व विजय पै खोत हे आपल्या लोकांच्या मदतकार्यात पूर्णपणे सक्रिय आहेत. प्रदेश भाजपनेही या लोकांसाठी मदतकार्याला प्रारंभ केला आहे. भाजयुमोतर्फे आज तात्काळ काणकोण तालुक्यात जीवनावश्यक वस्तू पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी पुरात सापडलेल्या सुमारे सातशे ते आठशे लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. विविध मदतशिबिरांत स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्त लोकांसाठी ५ हजार किलो तांदूळ, अडीच हजार किलो साखर, दोनशे किलो चहा पावडर, दोनशे किलो कांदे, बटाटे आदी साहित्य पाठवण्यात आले आहे. काणकोणातील या लोकांच्या पुनर्वसनासाठी मदतनिधी उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेणार, असेही श्री. नाईक म्हणाले. पैंगीण तथा इतर काही भागांत ज्या गतीने पाण्याची पातळी वाढली ते पावसामुळे शक्य नसून एखाद्या डोंगरमाथ्यावर ढगफुटी झाल्याची शक्यता या भागातील काही जाणते लोक व्यक्त करतात,असे श्री.नाईक म्हणाले.
अस्नोडा भागाचा दौरा
दरम्यान, आज मयते अस्नोडा भागातही पाणी भरल्याने ३० ते ४० लोकांची घरे पाण्याखाली गेल्याची घटना घडली. खासदार श्रीपाद नाईक यांनी या भागाचा दौरा करून स्थितीची पाहणी केली. आमठाणे धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने व पाणी अडवून ठेवण्याची यंत्रणा कोलमडल्याने हे पाणी भरल्याचे सांगण्यात येते. येथील ६ कुटुंबीयांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले असून दोन घरे जमीनदोस्त झाल्याचीही घटना घडली आहे,असेही श्री. नाईक म्हणाले.
वाढदिवसानिमित्ताचे कार्यक्रम रद्द
आपल्या वाढदिवसानिमित्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे उद्या ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम या आपत्तीमुळे रद्द करण्याची विनंती आपण केल्याचे श्री. नाईक यांनी यावेळी जाहीर केले. सकाळी १० वाजता भाजयुमोतर्फे होणारे रक्तदान शिबिर हा एकच कार्यक्रम होईल, उर्वरित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणारा खर्च काणकोण पूरग्रस्तांसाठी देण्याची इच्छा मातृभूमी सेवा प्रतिष्ठानने व्यक्त केल्याचेही ते म्हणाले.

No comments: