Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 28 August 2009

चिमुकल्या बालकाचा मृतदेह विहिरीत; घातपाताची शक्यता

कुडचडे, दि. २७ (प्रतिनिधी)- खांडीवाडा कुडचडे येथे चाळीत राहणाऱ्या सुमारे १ वर्षीय नागराज कुमार कामतर या चिमुकल्या बालकाचा मृतदेह घरापासून अंदाजे ५०० मीटर दूर असलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आला. यामागे घातपाताची शक्यता असल्याच्या संशयावरून कुडचडे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
यासंबंधी पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार खांडीवाडा येथील चाळीमध्ये सकाळी १० च्या सुमारास बालक घरातून गायब झाल्याची तक्रार त्याचे वडील कुमार यांनी दुपारी पोलिसात नोंदविली. पोलिसांनी सदर प्रकरण अपहरण म्हणून बाल कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून घेतला होता. यानंतर संध्याकाळी ५ च्या सुमारास शिरफोड येथील विहिरीत बाहुलीसारखी वस्तू पाण्यात तरंगत असल्याचा दूरध्वनी पोलिस स्थानकात आल्यानंतर अग्निशामक दलाच्या सहाय्याने पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व पंचनामा करून शव चिकित्सेसाठी पाठवला आहे.
कुमार हे तिस्क उसगाव येथे लॉटरी विक्रीसाठी सकाळी बाहेर पडले. आई मुलाला झोपण्यासाठी घरात झोळीत टाकून बाहेरून दाराला कडी लावून सकाळी १० च्या सुमारास कपडे धुण्यासाठी बाहेर पडली. अर्ध्या तासाने परत आल्यानंतर घरात बालक नसल्याचे तिच्या लक्षात आले. सगळीकडे शोधाशोध केली. बालकाला धड चालताही येत नव्हते. ताबडतोब वडिलांनी पोलिसांत मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंद केली.

सतत तिसऱ्या वर्षी
तिसरी घटना
गेल्यावर्षी सदर चाळीत सुमारे २ वर्षाचे मूल गायब होण्याचा प्रकार घडला होता. त्याची शोधाशोध करता करता सदर मूल घरात कोपऱ्यात कुजलेल्या अवस्थेत चादरीत गुंडाळलेले आढळून आले होते. सदर घटनेच्या एक वर्षापूर्वी अंदाजे अडीच वर्षीय मुलगी विहिरीत पडून मृत पावली होती. आजची ही घटना तिसरी असून धड चालता न येणारे बालक रेल्वे रूळ ओलांडून सुमारे ५०० मीटर अंतर जाणे शक्य नसून मीटरभर उंचीवर बांधून घेतलेल्या विहिरीत बालकाला मुद्दामहून टाकल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर विहिरीच्या चारही बाजूने घरे असल्याने यामागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक नीलेश राणे पुढील तपास करीत आहेत.
सदर बालकाच्या हत्येमागे अंधश्रद्धेचा प्रकार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वीच सदर प्रकरणे याच भागात घडल्याने यामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी कुडचडेवासीयांनी केली आहे.

No comments: