प्रीतेश देसाई
पणजी, दि. २६ - ""८३ सहस्त्रमुनींची भारती, प्रथमारंभी स्मरावा श्री गणपती, दृढोत्तर आहे वचनोग्ती, श्री गणनाथाय नमो नमः,'' अशा स्वरूपात ज्या गणरायाची घरोघरी पूजा केली जाते त्या गणनायकाची महती अस्सल कलाकाराच्या नजरेतून सुटल्यास नवल ते काय! सर्व कलांचा अधिपती असलेल्या गणनायकाला भजताना कोणताही निस्सीम कलाकार जाती-धर्माचे आवरण दूर सारून गणमय होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. गोमंतभूषण असलेला आणि आपल्या जादुमयी सुरांनी अपरंपार कीर्ती प्राप्त केलेला पद्मश्री रेमो फर्नांडिस त्यास अपवाद ठरूच शकत नाही. त्यामुळे असावे की या अभिजात कलाकाराने आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. रेमोच्या घरी पाऊल ठेवताच एका कलाकाराने कलेची गणरुपात थाटलेली पुजा चित्तवेधक ठरते. कलेच्या अधिष्ठानाची याहून वेगळी साधना ती काय असावी...
कळंगुटला राहणाऱ्या रेमोने शेषनागावर नृत्य करणाऱ्या मनोहारी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. रेमोच्या घरात प्रवेश करताच मंद आवाजात शास्त्रीय संगीतातील रागाची धून कानावर पडते आणि समोरील सजवलेल्या टेबलावर विराजमान केलेली गणेशमूर्ती नजरेत भरते...
मूर्तीच्या एका बाजूला एकतारी हे वाद्य ठेवले आहे तर, दुसऱ्या बाजूला पाच फळांनी भरलेले ताट ठेवण्यात आले आहे. तेथे "माटोळी' दिसली नाही तरी रंगीबेरंगी तोरण आणि "बोनेरांनी' सजवलेली मूर्ती आरास तुमचा आनंद नक्कीच द्विगुणीत करते.
""चतुर्थी आदल्या दिवशी मी म्हापशात मूर्ती आणण्यासाठी गेलो होतो. एका सभागृहात सुंदर अशा मूर्ती ठेवल्या होत्या. त्यातील सुमारे ९० टक्के मूर्तींचे आरक्षण झाले होते. मोजक्याच मूर्ती शिल्लक होत्या. त्यातील एका मूर्तीवर माझी नजर खिळली आणि मी ती घेऊन आलो. त्यानंतर त्या मूर्तीच्या हातात बासरी देण्यात आली,'' असे "गणेशपुराण' रेमो यांनी कथन केले.
एकदा प्रतिष्ठापना केल्यानंतर दर वर्षी पूजन करावे लागते, ही संकल्पना मी मानत नाही. पंधरा वर्षापूर्वी मी पहिल्यांदा गणरायाची मूर्ती आणली. त्यावेळी गणनायकाचा घरात प्रवेश होताच जो मला बदल मला जाणवला तो मी शब्दांत सांगू शकत नाही. माझी नाळ येथे जोडलेली आहे याचा मला साक्षात्कार झाला. हिंदू धर्म ५ हजार वर्षापूर्वीचा आहे. त्यानंतर अनेकांचे धर्मांतर झाले, असेही रेमोने सांगितले.
"देव व त्याचा सेवक यांच्यात मला कोणताही अडथळा मला नको आहे. मी धर्म मानत नाही. त्यामुळे संदेश वाहकाची मला गरजच भासत नाही. मुंबईत जाण्यासाठी एक व्यक्ती रेल्वेतून जाते, दुसरी बसमधून तर तिसरी व्यक्ती विमानाची निवड करते. मात्र मुंबईला फक्त विमानानेच जावे, असे म्हणणे योग्य नाही. तुम्ही रेल्वे आणि बसमधून पोहोचणार नाही, असे म्हणणे हे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण होय,' असे मत रेमो यांनी व्यक्त केले.
"येशू हे प्रेम आणि शांतीचे तर गणराय आनंद तथा उत्कर्षाचा संदेश देतो, अशी रेमो यांची श्रद्धा आहे. अंधारातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारा दिवाळी हा सण मला खूप आवडतो. प्रत्येक धर्मात जे चांगले आहे घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
गणरायाला पंचारतीने ओवाळले जाते. मग धूप आणि अगरबत्ती दाखवली जाते. त्याच्या जोडीला मंत्र आणि शास्त्रीय संगीत लावले जाते. अशा सुरमयी पद्धतीने रेमो यांच्या घरात विराजमान झालेल्या गणरायाची पूजा केली जाते."मला गणनायकाकडे काहीही मागायचे नाही. गेल्या वर्षभरात मला भरपूर काही दिले आहे, त्यामुळे या देवाचे आभार मानायचे आहेत,' असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment