Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 29 August 2009

ऍड. जनरल कंटक यांना उच्च न्यायालयाची चपराक

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांच्या लौकिकासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ नयेत, असा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज रद्दबातल ठरवला. त्याचबरोबर कंटक यांनी गुदरलेल्या मानहानी खटल्याच्या सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात निश्चित करण्यात आलेल्या पुढील सुनावणीवेळी त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहाण्याचाही आदेश न्यायमूर्ती एन. ए. ब्रिटो यांनी दिला आहे. या निवाड्यामुळे कंटक यांना सणसणीत चपराक बसली आहे.
सुबोध कंटक हे ऍडव्होकेट जनरल असल्याने त्यांची कार्यक्षमता, चारित्र्य तथा त्यांच्या लौकिकासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ नयेत, असा निवाडा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांनी दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निवाडा आज रद्दबातल ठरविल्याने कंटक यांची उरलीसुरली लक्तरेही चव्हाट्यावर येण्याची अपेक्षा आहे. न्यायालयाच्या या निकालाने सामन्याआधीच समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रीगीस यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऍड. कंटक यांनी गुदरलेल्या मानहानी खटल्यातील पुढील उलट तपासणीसाठी त्यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर १८ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायमूर्ती एन. ए. ब्रिटो यांनी दिल्याने ऍड. रॉड्रिगीस यांना फौजदारी याचिकेच्या उलट तपासणीवेळी आता त्यांच्या लौकिकासंदर्भातही प्रश्न विचारण्याची मुभा मिळाली आहे. कंटक यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील व्ही. ए. लवंदे यांनी उच्च न्यायालयाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी चार आठवड्यांची स्थगिती देण्याची केलेली विनंतीही न्यायमूर्तींनी फेटाळून लावली.
ऍड. कंटक यांची कार्यक्षमता, त्यांचे चारित्र्य तथा त्यांच्या लौकिकासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ नयेत, असा निवाडा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांनी दिल्यानंतर ऍड. रॉड्रिगीस यांनी या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालायत आव्हान दिले होते.
कंटक यांना शुल्कापोटी दिल्या जाणाऱ्या अवाढव्य रकमेवर ऍड. रॉड्रिगीस यांनी प्रकाशझोत टाकल्याने कंटक यांनी पणजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यात त्यांनी रॉड्रिगीस यांनी आपले चारित्र्यहनन केल्याचा दावा करताना भरपाईपोटी १५ कोटींची मागणी केली होती. ऍड. जनरल हे जनतेचे सनदशीर अधिकारी असल्याने त्यांच्या एकूण कार्यपद्धतीची शहानिशा तथा त्यांच्या कृतीवर आपली प्रतिक्रिया नोंदवण्याचा तथा त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यामुळे हा मानहानीचा प्रकार होऊच शकत नसल्याचे ऍड. रॉड्रिगीस यांनी आपली बाजू मांडताना न्यायालयात स्पष्ट केले होते.
मानहानीचा खटला दाखल करणारे ऍड. कंटक हे भारतातील पहिलेच ऍडव्होकेट जनरल असून त्यांच्यावर दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निवाडा देण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी. शिवाय एखाद्या ऍडव्होकेट जनरलवर एका वकिलानेच याचिका दाखल केल्यानंतर त्याला सामोरे जाणारेही कंटक हे पहिलेच ऍडव्होकेट जनरल ठरलेआहेत.

No comments: