नरेंद्र बोडके
पुणे, दि. २७- आपल्या कथा-कादंबऱ्यांच्या जोरावर मराठीत फडके-युग निर्माण करणारे अग्रगण्य लघुकथाकार आणि कादंबरीकार ना. सी. फडके यांचे समग्र साहित्य आता खंडरुपाने उपलब्ध होणार आहे. पुण्याच्या ना. सी. फडके फाऊंडेशनने हा उपक्रम हाती घेतला असून फडके यांचे सुपुत्र विजय यांनी या साहित्याचे संकलन केले आहे.
एकूण चौदा खंडांचा हा प्रकल्प असून त्यापैकी चार खंड तीन वर्षांपूर्वीच प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यात त्यांच्या लघुकथा वाङ्मयाचा समावेश आहे. त्यांची एकूण पृष्ठसंख्या ३५०० आहे. फडके यांनी सुमारे ५० वर्षे मराठी साहित्यजगतावर अधिराज्य गाजवले आणि १७५ ग्रंथांची निर्मिती केली. लघुकथांव्यतिरिक्त अन्य अनेक साहित्यप्रकार हाताळले. त्यात मानसोपचार आणि तर्कशास्त्रावरील प्रबंध, नाटके, लघुनिबंध, दादाभाई नौरोजी, टिळक, गांधी, किर्लोस्कर, नाट्याचार्य खाडिलकर आदींची चरित्रे, प्रतिभा साधन, पुरोगामी साहित्य आदी वाङ्मयीन प्रबंध, टीका व रसग्रहण, प्रवासवर्णन व आठवणीवजा लेखन, काव्य व्याख्याने, जीवन व समाजविषयक लेखन, आत्मचरित्रपर लेखन आदींचा समावेश आहे. हे सर्व लेखन खंड ५ ते १४ मध्ये समाविष्ट करण्यात येणार असून हे दहा खंड सुमारे ९ हजार पृष्ठांचे भरतील. फडके यांचे ६३ ग्रंथ त्यात समाविष्ट करण्यात येतील. संपूर्ण संचाचे मूल्य रु. १० हजार आहे. ते ४ ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित होतील. मात्र प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास ते ४५०० रूपयात उपलब्ध होतील. हे दहा खंड नोंदवणाऱ्या संस्थांना पहिले चार खंड रु. १२०० मध्ये देण्यात येतील. व्यक्तींना हप्त्यांची सवलत आहे. या संदर्भात सविस्तर माहिती ९८८१४९५४५२ या मोबाईलवर उपलब्ध आहे.
ललित साहित्याचा निर्माता आणि ललित साहित्याचे मीमांसक या दोन्ही भूमिका फडके यांनी कौशल्याने पार पाडल्या, कलेसाठी कला या भूमिकेचा पुरस्कार आयुष्यभर केला. वि. स. खांडेकरांनी जीवनासाठी कला हा विचार मांडला आणि मराठीत कलावाद व जीवनवाद या विचारसरणींनी कायमचे मूळ धरले. फडके यांनी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून सातत्याने साहित्यनिर्मिती केली. ललित साहित्याची निर्मिती ही एक निरामय आनंदाची भूमी आहे याची खात्री बाळगून लेखकाने लिहावे अशी फडके यांची भूमिका होती. लेखनकला ही जबरदस्त शक्ती आहे असा अमर्याद अभिमान ज्या लेखकाला वाटतो त्याच्यावर कालांतराने का होईना प्रतिभा प्रसन्न होणारच अशी ग्वाही फडके यांनी प्रतिभा साधन या ग्रंथात दिली होती. फडके यांच्या शेकडो लघुकथांनी त्याकाळी वाचकांच्या मनात रुंजी घातली. फडके यांची नायिका देखणी, आकर्षक, पुरोगामी व जीवनाचा आनंद घेणारी असावयाची. अशा अनेक नायिकांच्या अनेक कहाण्या त्यांनी लिहिल्या. हे साहित्य खंडरुपात उपलब्ध असताना आज मालिका व चित्रपटांमध्ये जे विषय-दारिद्र्य आहेत ते निमार्त्यांच्या विदग्ध वाङ्मयाकडे झालेले दुर्लक्ष आहे अशी प्रतिक्रिया दूरदर्शनवरील मालिका नित्यनियमाने पाहणाऱ्या दीप्ती नितनवरे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारने या खंडांची खरेदी मोठ्या प्रमाणात करून या युगप्रवर्तकाचे साहित्य खेडोपाडी पोहोचवावे अशी अपेक्षा फडके साहित्याचे अभ्यासक व फडके यांच्यावर "पीएचडी' करणारे समीक्षक डॉ. प्रल्हाद वडेर यांनी व्यक्त केली.
Friday, 28 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment