Sunday, 23 August 2009
क्रिकेट मैदानासाठी "जीसीए'ला ५० कोटींचे अनुदान - शशांक मनोहर
"जीसीए'च्या इनडोअर अकादमीचे उद्घाटन
पणजी, दि. २२ - "गोव्यातील क्रिकेटने अधिकाधिक प्रगती करावी यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ("बीसीसीआय'चे) "जीसीए'ला संपूर्ण सहकार्य राहील. गोव्याने लवकरात लवकर स्वतःचे क्रिकेट स्टेडियम उभारावे; त्यासाठी बीसीसीआय गोव्याला पन्नास कोटींचे आर्थिक साहाय्य करेल; सरकारच्या मदतीवर जास्त अवलंबून न राहता जीसीएने क्रिकेट मैदानासाठी खाजगी जागेचा विकल्प निवडावा, जेणेकरून मैदानाचे काम वेगाने पूर्ण होऊ शकेल' अशा मोजक्याच परंतु, आश्वासक शब्दांत "बीसीसीआय'चे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आज संध्याकाळी पर्वरी येथील जीसीएच्या इनडोअर क्रिकेट अकादमीचे जागतिक क्रिकेटमधील आर्थिक महासत्ता असलेल्या बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जीसीएचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर, सचिव प्रसाद फातर्पेकर, खजिनदार विनोद फडके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ऍड. दयानंद नार्वेकरांच्या पुढाकाराने गोव्यात इनडोअर अकादमीची स्थापना झाली आहे. याचा पुरेपूर फायदा गोव्यातील क्रिकेटपटू घेतील व लवकरच गोवा रणजीच्या "एलिट'गटात खेळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मोहाली, मुंबई व चेन्नई येथे वेगवान गोलंदाजांसाठी लवकरच बीसीसीआय क्रिकेट अकादमींची स्थापना करणार आहे. त्यात प्रथितयश माजी क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभेल. गोव्यासाठीही हे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
श्री. नार्वेकर म्हणाले की, जोपर्यंत एखाद्या राज्याच्या क्रिकेट असोसिएशनचे स्वतःचे क्रिकेट मैदान असणार नाही तोपर्यंत त्या असोसिएशनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना मिळणार नाही असा बीसीसीआयचा यापूर्वीच निर्णय झालेला आहे. त्यामुळे जीसीएचे स्वतःचे क्रिकेट मैदान असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. मैदानाच्या उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या प्राथमिक गोष्टींना याआधीच सुरुवात झाली असून येत्या सहा महिन्यात मैदानासाठी जमीन संपादन करून मैदानाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल असे आश्वासन त्यांनी उपस्थित क्रिकेट रसिकांना दिले.
गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आरंभी पार पडले. त्यात घुमट आरती, मांडो व देखणी आदींचा समावेश होता. जीसीएचे सचिव प्रसाद फातर्पेकर यांनी स्वागत केले. खजिनदार विनोद फडके यांनी आभार मानले.
"पुढचा सामना स्वबळावर'
यापूर्वी जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जायचा त्या मडगावच्या फातोर्डा मैदानावर आता जो सामना होईल तो शेवटचा असेल; त्यानंतरचा सामना मात्र "जीसीए'च्या स्वतःच्या मैदानावरच खेळवला जाईल असे श्री. नार्वेकर यांनी सांगितले तेव्हा टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या घोषणेचे स्वागत करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment