Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 29 August 2009

'बंद' मोडीत काढण्यासाठी 'एस्मा' वाहतूकदारांचे सरकारला प्रतिआव्हान

भाजपचा 'बंद'ला पूर्ण पाठिंबा
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील वाहन चालक व मालकांनी सरकारच्या "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' विरोधात येत्या सोमवारी "चक्का जाम'ची घोषणा केल्यानंतर आज संध्याकाळी उशिरा सरकारने हा बंद मोडीत काढण्याच्या उद्देशाने राज्यात "एस्मा' (अत्यावश्यक सेवा कायदा) लागू केला आहे. तथापि सरकारने "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' सक्तीचा निर्णय मागे घेण्याचे ठोस आश्वासन न दिल्यास सोमवारचा नियोजित बंद होईलच, असा निर्धार व्यक्त करीत वाहनचालकांनी सरकारला प्रतिआव्हान दिले आहे. दरम्यान, सोमवारच्या "वाहतूक बंद'ला भाजपने आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.
"हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' लादण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे ठोस आश्वासन सरकारने दिल्यास ३१ ऑगस्टला प्रवासी बस, तसेच अन्य सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्याच्या निर्णयावर विचार होऊ शकतो असे मत उत्तर गोवा बस मालक संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर यांनी व्यक्त केले. मात्र, कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही तर "एस्मा' ची पर्वा न करता नियोजित बंद होईलच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आज उशीरा गृहखात्याच्या सचिवांनी सोमवारच्या बंदच्या पार्श्वभूमीवर "एस्मा' कायदा लागू केल्याचा आदेश जारी केला आहे.
वाहतूक बंद ठेवून जनतेची गैरसोय करण्याचा किंवा त्यांना वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही. परंतु, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच आज आमच्यावर ही पाळी आल्याचे ते म्हणाले. या विषयावर अनेक वेळा आम्ही चर्चा करून तोडगा काढण्यासाठी वाहतूकमंत्र्यांकडे चर्चेसाठी वेळ मागितला होता. पण आम्हाला अजूनही मंत्र्यानी चर्चेचे निमंत्रण दिलेले नाही, असे ताम्हणकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावर अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतर त्यासंदर्भातही सरकारने आम्हाला काहीही कळवले नसल्याचे त्यांनी सांगितले.
मागे तिकीट दरवाढ देताना वाहतूक खात्याने आम्हाला असंख्य अटी घातल्या होत्या. त्यात चालक व वाहकाने गणवेश परिधान करावा, तिकिटाची योग्य रक्कम आकारावी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबू नये अशा त्या अटी होत्या. या अटी अंमलात आणण्यासाठी संघटनेने अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र संघटनेच्या या प्रयत्नांना वाहतूक अधिकारीच (आरटीओ) सहकार्य करीत नसल्याने त्याचा शंभर टक्के अंमल शक्य न झाल्याचे ताम्हणकर म्हणाले. आम्ही गेल्या वर्षभरात सरकारच्या या अटींचे उल्लंघन करणारी बरीच प्रकरणे वाहतूक अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
उत्तर गोवा प्रवासी बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांना केवळ पंधरा-वीस लोकांचाच पाठिंबा आहे, असे वक्तव्य केलेल्या मंत्र्यांवर ताम्हणकर यांनी जोरदार टीका केली. वाहतूक मंत्र्यांनी श्री. कळंगुटकर यांच्यामागे किती लोक आहेत, याची काळजी करण्यापेक्षा त्यांनी केवळ आपले मंत्रिपद शाबूत कसे राहील याची काळजी करावी, असा टोलाही त्यांनी हाणला. कळंगुटकर यांच्यामागे किती लोक आहेत हे येत्या सोमवारीच कळून येईल, असेही श्री. ताम्हणकर म्हणाले.

No comments: