मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी) : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना राजकीय क्षितिजावर मात्र वेगळेच वातावरण पसरले आहे. दिगंबर कामत मंत्रिमंडळात खांदेपालट होणार या चर्चेला पुन्हा ऊत आला असतानाच आता नेतृत्वबदलाचेही वारे तेवढ्याच गतीने वाहू लागले आहे. दिगंबर कामत हे "लोकप्रिय' मुख्यमंत्री बनले आहेत पण प्रशासकीय पातळीवर मात्र त्यांचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा जराही वचक नसल्याने सरकारात एकसूत्रता अजिबात दिसत नाही, त्यामुळे प्रशासनात बेशिस्तीला उधाण आले आहे. या परिस्थितीत सरकारचे नेतृत्व पुन्हा एकदा विद्यमान सभापती तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडे सोपवले जावे, असा सूर सरकारातील एका गटाने नव्याने आळवायला सुरुवात केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
गेले काही दिवस प्रतीक्षेत असलेला कामत सरकारच्या मंत्रिमंडळाचा खांदेपालट या आठवडा अखेरीस होणार असून त्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस तथा गोवा प्रभारी बी. के. हरिप्रसाद हे येत्या शुक्रवारी राज्यात दाखल होणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जात आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत मंत्रिमंडळात फेरबदल करताना किंवा खातेबदल करताना सत्तांतर होण्याची शक्यता कमी असल्याने हा प्रयोग करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, कामत यांचा आपल्या मंत्रिमंडळावर कोणताही ताबा राहिलेला नाही. त्यामुळे सरकारातील मंत्री एकमेकांवर जाहीरपणे टीका करत असल्याचे तसेच आपल्याच सरकारच्या विरोधात जाहीर भाष्य करत असल्याची प्रकरणे श्रेष्ठींकडे पोहोचली आहेत. सरकारच्या काही निर्णयांना खुद्द प्रदेश कॉंग्रेस व युवा कॉंग्रेसही विरोध करीत असल्याने याचीही गंभीर दखल श्रेष्ठींनी घेतली आहे. गत विधानसभा अधिवेशनात विरोधी व खुद्द सत्ताधारी आमदारांकडून मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खाण खात्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी खाण खात्यातील गैरकारभारांची जंत्रीच सभागृहासमोर ठेवून सरकारची बरीच नाचक्की केल्याने सरकारची बेअब्रू झालेली आहे. युवा कॉंग्रेसकडून सरकारातील काही मंत्र्यांच्या विरोधात खुद्द पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली असून त्यांना हटवले नाही तर पक्षावर गंभीर परिणाम होणार असल्याचीही त्यांना जाणीव करून दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांच्याकडून या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे व त्यानुसारच पुढील कृतीबाबत निर्णय घेतला जाणार, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, उपसभापती मावीन गुदिन्हो व केपेचे आमदार बाबू कवळेकर हे मंत्रिपदासाठीचे प्रमुख दावेदार मानले जातात. पांडुरंग मडकईकर यांच्यासाठी स्वतंत्र अनुसूचित जमात कल्याण खाते निर्माण करून त्यांची सोय करून देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; परंतु त्यात सरकारला अपयश आल्याने सरकारने थेट अनुसूचित जमात समाजाचा एकार्थाने रोष पत्करला आहे. यावेळी अर्थसंकल्पात या समाजासाठी राखीव भागही ठेवला नसल्याने त्याबाबतीतही या समाजाच्या नेत्यांत नाराजी पसरली आहे. नव्या मंत्र्यांची वर्णी लावण्यासाठी नेमके कोणाला वगळावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला असला तरी त्यासाठी पक्षातर्फे काही मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवालच सादर करण्यात आला असून त्यानुसार ही कारवाई करण्यात येईल, असे सूतोवाचही पक्षाकडून मिळाले आहे.
सध्याच्या परिस्थितीत आलेमावबंधूंपैकी एक मंत्री तसेच वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या नावांचा समावेश संभावित अर्धचंद्र मिळणाऱ्यांत असल्याचे बोलले जात आहे. सरकारला मगो पक्षाच्या पाठिंब्याची गरजच नाही, अशीही मागणी काही नेत्यांनी केली आहे.
पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे सध्या सरकारासाठी खरोखरच डोकेदुखी बनले आहेत पण केंद्रात कॉंग्रेस- राष्ट्रवादीची युती असल्याने मिकी यांना वगळणे सरकारसाठी सोपे नाही. मिकी यांना वगळून त्यांच्या जागी नीळकंठ हळर्णकर यांची वर्णी लावण्याबाबतही प्रस्ताव असून त्याचाही विचार सुरू असल्याची खबर आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मुख्यमंत्रिपदावर असताना हे बदल करणे शक्य होणार नाही त्यामुळे नेतृत्व बदल करून मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा एकदा खाशांकडे देण्याचाही विचार पक्षातील एका गटाकडून सुरू आहे.
Thursday, 27 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment