Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 12 July 2009

भाजपची विचारधारा बदलणार नाही : राजनाथ सिंग

मुंबई, दि. ११ - लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने अनेक विचारवंत भारतीय जनता पक्षाला राजकीय विचारधारा बदलण्याचा सल्ला देत आहेत. परंतु, जगाची विचारधारा बदलली तरी भाजप आपली विचारधारा बदलू शकत नाही, भाजपाने याच विचाराने विजय संपादित केला आहे आणि पुन्हा करेल, असा जबरदस्त आत्मविश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी व्यक्त केला.
जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात भाजपने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत घेण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहनही राजनाथसिंग यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे, प्रदेश अध्यक्ष नितीन गडकरी, खासदार आणि सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा, राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार बाळासाहेब आपटे, प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार गोपाळ शेट्टी आदी उपस्थित होते.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आम्हाला सांस्कृतिक राष्ट्रवादाची शिकवण दिली. भारतीय राजकारणात तेच सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जनक आहेत. हिंदुत्व आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद समान आहे. अशा हिंदुत्वाला जातीयवादी, धार्मिक ठरवून कॉंग्रेस भाजपाला जातीयवादी ठरवू इच्छित आहे. परंतु जे हिंदुत्व नागपंचमीच्या दिवशी विषारी नागाला देखील दूध पाजणे आपली संस्कृती मानते, ते जातीयवादी असेलच कसे? असा सवाल राजनाथसिंग यांनी उपस्थित करून कोणी काहीही म्हटले, तरी भाजपा आपले राजकीय चरित्र बदलणार नाही. या विचारधारेवरच पुढेही मार्गक्रमण करीत राहील, असे स्पष्ट केले.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात कॉंग्रेसएवढा आणि एकावेळी त्यापेक्षाही मोठा पक्ष म्हणून उभा राहाणारा भाजपा हा एकमेव प्रश्न आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पराभवाने विचलित न होता कार्यरत व्हावे, असे सांगतानाच राजनाथसिंग म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळाला तर संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल. तेव्हा कार्यकर्त्यांनी विजयासाठी सज्ज व्हावे.
दिल्ली गमावली तरी मुंबई कमावू : मुंडे
या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाने दिल्ली गमावली असली, तरी मुंबई कमावू, असा विश्वास व्यक्त केला. तसेच बीडमध्ये आपला प्रचंड विजय होऊनही मुंबईत पराभव झाल्याने अंगाला गुलाल लावून घेतला नाही, असे स्मरण करून जोपर्यंत मुंबई जिंकत नाही तोपर्यंत अंगाला गुलाल लावून घेणार नाही, अशी प्रतिज्ञाच केली. तसेच वांद्रे- वरळी सागरी सेतूचे राजीव गांधी असे नामकरण कॉंग्रेस आघाडीने केले असले, तरी युतीची सत्ता येताच या सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जाईल, याचाही पुनरुच्चार केला.
दरम्यान, राजनाथसिंग यांचा आज जन्मदिवस होता. असे असूनही ते आपल्या कुटुंबीयांसोबत न राहता मुंबईच्या मेळाव्याला आल्याबद्दल सर्वच नेत्यांनी त्यांचे मनोमन आभार मानले आणि त्यांचे अभीष्टचिंतनही केले. तर प्रदेश अध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांचा विशेष सत्कार करतानाच या वाढदिवशी महाराष्ट्र विधानसभा जिंकण्याचा संकल्प व्यक्त केला.
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपा कार्यकारिणीची बैठक उद्या मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येला आज प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीलाही राजनाथसिंग उपस्थित होते. या लोकसभा निवडणुकीत युतीला १२२ विधानसभा क्षेत्रात आघाडी आहे. ही आघाडी १५० जागांवर नेऊन राज्यात सत्ता स्थापन करता येईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

No comments: