पुणे, दि. १३ - ग्रामीण ढंगाच्या आपल्या अभिजात अभिनयाने महाराष्ट्राच्या मराठी आणि हिंदी रसिकमनावर गेली चार दशके आपली स्वतंत्र छाप निर्माण केलेले अभिनेते व सामाजिक चळवळीचे भान असलेले कार्यकर्ते नीळकंठ कृष्णाजी उपाख्य निळू फुले यांचे आज पहाटे एक वाजून पन्नास मिनिटांनी येथील जहांगीर रुग्णालयात अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७९ वर्षांचे होते.
त्यांना नऊ दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, अन्ननलिकेच्या कर्करोगावरील उपचाराला त्यांची प्रकृती प्रतिसाद देत नव्हती. म्हणून गेले दोन दिवस त्यांच्यावरील उपचार थांबविण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अकराच्या सुमारास येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, महापौर राजलक्ष्मी भोसले, समाजवादी चळवळीतील नेते डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य, माजी मंत्री मोहन धारिया व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी रजनी, कन्या गार्गी व जावई ओंकार थत्ते असा परिवार आहे.
गेली पाच वर्षे त्यांनी तसे काम कमी केले होते. तरीही काही निवडक कामे ते करत असत. त्यांना मधुमेहाचा त्रास होत होता. त्यांच्या अन्ननलिकेला कॅन्सरचा विकार जडल्याचे दोन महिन्यापूर्वी लक्षात आले होते. तेव्हापासून त्यांचा आहारही कमी झाला होता. गेल्या आठवड्यात रविवारी त्यांना येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना विशेष कक्षात हालविण्यात आले होते.
गेले काही दिवस त्यांची शुद्धही हरपली होती. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळीच त्यांचा पार्थिव देह त्यांच्या पौड रस्त्यावरील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अंत्यदर्शनाची गर्दी ओसरल्यावर बंद गाडीतून त्यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. तेथे पिंपरी चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके, विभागीय आयुक्त दिलीप बंड, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, अभिनेत्री उषा चव्हाण, सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर, रवींद्र मंकणी, मधु कांबीकर, अमोल पालेकर, माधव वझे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, माजी खासदार श्रीनिवास पाटील, विश्र्वजीत कदम यांनी अंत्यदर्शन घेतले.
त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, " समाजातील वैगुण्यावर त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अचूक शरसंधान केले. सामाजिक जाण असलेला हा कसबी कलाकार होता. मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टी या प्रत्येक क्षेत्रावर त्यांनी आपल्या अभिनयाची खोलवर अशी छाप उमटवली आहे. राज्यशासन त्यांचे योग्य असे स्मारक करेल. गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या अष्टपैलू अभिनेत्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
Tuesday, 14 July 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment