Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 17 July 2009

महापालिकेतील घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी)- कायम स्वरूपी ठेवीतील पैसे कोणतीही मान्यता न घेता काढून वापरणे हा गंभीर गुन्हा असून दोषींवर कारवाई न झाल्यास महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा विरोधी गटातील नगरसेवकांनी दिला. पणजी महापालिकेत घडलेल्या सर्व घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी करण्याची जोरदार मागणी करताना उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निवृत्त न्यायाधीशांमार्फत ही चौकशी केली जावी अशी सूचना करण्यात आली. अशा आशयाचे पत्र पणजी, ताळगाव आणि सांताक्रूझ मतदारसंघाच्या आमदारांना पाठवण्यात आल्याची माहिती भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक मिनीन डिक्रुझ यांनी दिली.
यावेळी नगरसेवक सुरेश चोपडेकर, वैदेही नाईक, संदीप कुंडईकर, ज्योती मसूरकर, दीक्षा माईणकर, हर्षा हळर्णकर व रुपेश हळर्णकर आणि माजी महापौर अशोक नाईक उपस्थित होते.
शहरात साचलेल्या कचऱ्यापेक्षा पालिकेच्या आत असलेला कचरा आधी साफ केला पाहिजे, असे मत यावेळी मिनीन डिक्रुझ यांनी व्यक्त केले. आमच्या पूर्वजांनी बॅंकेत कायम स्वरूपी ठेवीत हे पैसे जमा करून ठेवले होते. काही भ्रष्ट नगरसेवकांनी या पैशांनाही सोडले नाही. पालिकेच्या कामगार पटावर ६०० कामगारांची नोंद आहे. मात्र त्यातील जेमतेम कामगार कामासाठी उपलब्ध होतात. बाकीचे कामगारांची माहिती कुणालाच माहीत नाही. त्यांच्या नावाने दरमहा वेतन मात्र घेतले जाते. हे वेतनही कोण घेतो, हेही कोणाला कळत नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कामगारांच्या नावाने गेल्या काही वर्षात सुमारे ६० लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा दावा नगरसेवक डिक्रुझ यांनी केला.
ब्रिटिशांनी भारतात येऊन येथील लोकांकडून कर गोळा करून मौजमजा केली. त्याप्रमाणे या काही नगरसेवकांनी महापालिकेला आपली मालमत्ता समजून लुटले आहे. "पे पार्किंग' घोटाळ्यानंतर नगरसेवक नागेश करिशेट्टी याला अपात्र ठरवण्याची मागणी झाली होती. परंतु, कोणतीही कारवाई करण्याचे सोडून उलट पालिकेने त्याच्या विरोधात पोलिस स्थानकात दाखल करण्यात आलेली पोलिस तक्रार मागे घेतली. पोलिस तक्रार मागे घेण्याचा कोणताही अधिकार पालिकेला नसून दोष सिद्ध करण्याचा अधिकार न्यायालयाचा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या नावानेही लाखो रुपयांच्या घोटाळा झाला असून येत्या काही दिवसांत याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे गरज भासल्यास दक्षता विभागाकडेही तक्रार केली जाणार असल्याचे यावेळी नगरसेवक डिक्रुझ म्हणाले.

No comments: