Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 25 July 2009

पर्रीकरांनी काढली इंग्रजीवाल्यांची हवा

माध्यम आणि अनुदानाचे ठराव बारगळले

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस तसेच कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे दोन खाजगी ठराव आज विधानसभेतील पुरेशा प्रतिसादअभावी बारगळले. त्यापैकी आग्नेल फर्नांडिस यांचा ठराव पर्रीकर यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे फेटाळला गेला; तर रेजिनाल्ड यांनी ठराव मतदानाला जाण्यापूर्वीच तो मागे घेतला व स्वतःची सुटका करून घेतली. महत्त्वाचे म्हणजे विरोधी गटाचे दूरच; परंतु खुद्द सत्तारूढ गटातील कोणीही इंग्रजीच्या प्रश्नावरून या दोघांना पाठिंबा दिला नाही, मातृभाषेतून शिक्षण हा शिक्षणाचा पायाभूत नियम आहे, तो बदलता येणार नाही. कारण इंग्रजी ही या राज्याची किंवा या देशाची मातृभाषाच नाही, अशी उघड भूमिका विरोधी भारतीय जनता पक्षाने घेतली.
आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर, आग्नेल फर्नांडिस आपल्या खाजगी ठरावाच्या अनुषंगाने बोलायला उभे राहिले. आग्नेल व रेजिनाल्ड यांचे ठराव एकाच स्वरूपाचे असल्याने सभापती प्रतापसिंग राणे यांनी हे दोन्ही ठराव एकत्रित चर्चेला घेण्याची घोषणा केली. रेजिनाल्ड यांनी प्राथमिक स्तरावरील शिक्षणातील "मातृभाषा' या शब्दाची व्याख्या बदलण्याविषयी ठरावाद्वारे मागणी केली होती, जेणेकरून प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यमालाही अनुदान देणे शक्य होईल. आग्नेल यांनी आपल्या ठरावासंदर्भात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला व त्यांना तात्काळ थांबवले. तुम्ही ज्या कायद्याचा उल्लेख केला आहे तो चुकीचा आहे. गोव्यात शिक्षण कायदा १९८६ नसून १९८४ असा आहे, त्यामुळे हा सदोष ठराव चर्चेला घेताच येणार नाही, असे त्यांनी सभापतींच्या व सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ज्या सहजतेने हे (आग्नेल) या ठरावाकडे पाहतात तेवढा तो विषय सोपा नाही. संपूर्ण शैक्षणिक धोरणावर परिणाम करणारा तो निर्णय ठरेल. त्यामुळे खुद्द ठराव लिहिताना तरी अशा चुका होऊ नयेत, असे सांगून हा ठराव दाखल करून घेताच येणार नाही. सभापतींनी तो फेटाळून लावावा, अशी विनंती पर्रीकरांनी केली. त्यावर आग्नेल यांनी काहीतरी थातूरमातूर सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु सभापतींनीही असा सदोष ठराव दाखल करून घेण्यास येणार नाही, असे आग्नेल यांना सांगितले. विधिमंडळ खात्याच्या चुकीमुळे ८४ च्या जागी ८६ झाले असे काहीबाही त्यांनी म्हटले. तथापिु काय सांगायचे ते नंतर भेटून सांगा, अशा शब्दांत सभापतींनी आग्नेल यांचा मुद्दा फेटाळून लावला.
आग्नेलची ही परिस्थिती सत्तारूढ गटामध्ये सगळे निमूटपणे पाहत होते, परंतु त्यांच्या मदतीला कोणीच धावले नाही. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर असलेला, आलेक्स रेजिनाल्ड यांचा ठराव चर्चेला घेण्यात आला. प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यमाला अनुदान मिळण्यासंदर्भात तो होता. रेजिनाल्ड यांनी आपला मुद्दा मांडताना लिखित स्वरूपातील भाषण वाचून दाखवले. इंग्रजी ही भाषा किती उपयुक्त आणि प्राथमिक स्तरावर ती कशी आवश्यक आहे हे सांगताना, मातृभाषा म्हणजे काय वगैरे विवेचन केले. पालकांना भाषेचे माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य हवे वगैरे युक्तिवाद त्यांनी केला. इंग्रजी माध्यमातून शिकलेली मंडळी नाही का मोठी झाली, असाही सवाल त्यांनी केला. परंतु त्याला उत्तर देण्यासाठी उभ्या राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांनी, इंग्रजी शब्दकोश आणून "मातृभाषा' या शब्दाचा अर्थ सांगितला. मातृभाषा म्हणजे आई बोलते ती भाषा नव्हे तर मातृभाषा म्हणजे, आपल्या परिसरात, स्थानिक पातळीवर बोलली जाणारी भाषा. त्यामुळे इंग्रजी ही मातृभाषा होऊच शकत नाही. त्यामुळे कायद्यानुसार तिला अनुदानही मिळू शकत नाही'. पर्रीकरांच्या या युक्तिवादापुढे रेजिनाल्ड यांचे काहीच चालले नाही. त्यांच्याबाजूने कोणी बोलायलाही उभा राहिला नाही. परिणामी, ठराव मागे घेता की मतदानाला टाकू, असा सवाल सभापतींनी केला. त्यामुळे रेजिनाल्ड यांची पंचाईत झाली. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी रेजिनाल्ड यांना ठराव मागे घेण्याची विनंती केली. हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे व सगळे एकत्र बसूनच त्याबाबत चर्चा करून काही तोगडा काढता येतो काय हे पाहावे लागेल, असे मोन्सेरात म्हणाले. शेवटी रेजिनाल्ड यांनी ठराव मागे घेतला व प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा आणि अनुदानाचा विषय फुलण्यापूर्वीच कोमेजला.
विधानसभेत आज हे ठराव येणार हे कळल्यामुळे, माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, ऍड. रमाकांत खलप तसेच गोव्याच्या विविध भागातील जागृक नागरिक विधानसभेत उपस्थित होते.
"त्यासाठी सोळा आणेच लागतात'
मनोहर पर्रीकर यांनी आग्नेल फर्नांडिस यांची हवा काढून घेतल्यानंतर, हे आठ आणे अथवा बारा आण्याचे काम नाही, हे यांना (आग्नेल) आता कळलेच असेल, असा टोमणा त्यांनी आग्नेल यांना मारला. यासाठी सोळा आणेच लागतात, असे स्वतःकडे अंगुलीनिर्देश करत पर्रीकर म्हणाले तेव्हा सभागृहात हास्याचे फवारे उडाले. दयानंद नार्वेकरांनाही तेव्हा हसू आवरले नाही.

No comments: