Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 22 September 2008

गोव्यातही स्फोट घडवण्याचा कट

दिल्लीमध्ये अटकेतील अतिरेक्यांनी उघड केलेली माहिती

नेत्रावती एक्सप्रेसलाही सुरक्षा कवच


पणजी, दि. २१ (विशेष प्रतिनिधी) - दिल्लीत कालच्या चकमकीत पकडलेल्या अतिरेक्यांनी गोव्यात बॉंम्बस्फोट घडविण्याचा आमचा इरादा होता, असे चौकशीत उघड करून त्यांचे इतर साथीदार काम फत्ते करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर गृह मंत्रालयाने राज्यांना कमालीची सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रामुख्याने गोव्यातील त्यांचा कट उघड झाल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेत्रावती व मरूसागर या गाड्या केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आदी राज्यांतून जात असल्याने गोव्यासह या राज्यांनाही सुरक्षचे जाळे मजबूत करा, असे सांगण्यात आले आहे.
गोव्यात अतिरेक्यांकडून घातपात घडवून आणण्याची शक्यता असल्याचा संदेश कर्नाटक गृह मंत्रालयाकडून मिळाल्याने राज्यात कमालीची सावधगिरी बाळगण्यात आली आहे. सर्वत्र चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. विमानतळ, रेल्वे स्थानके व इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. सर्वच पातळ्यांवर कडक तपासणी करण्यात येत आहे. मरूसागर एक्सप्रेसवर हल्ला करण्याच्या दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) एर्नाकुलमहून जयपूरला जाण्यासाठी निघालेल्या "२९७७ अप' गाडीमागे पुन्हा तपासाचा सिलसिला सुरू झाला. घातपात घडवण्यासाठी अतिरेकी किंवा स्फोटके नेत्रावती एक्सप्रेसमधून गोव्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने "६३४६ अप' गाडीचीही प्रत्येक स्थानकावर तपासणी केली जात आहे. ही गाडी नेहमीच्या वेळापत्रकानुसार पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी कारवार तर त्यानंतर ४.५८ ला काणकोण, ५.५० ला मडगाव, ६.२९ ला करमळी व ७.०१ मिनिटांनी थिवीला पोहोचते. मात्र तपासाच्या गराड्यात ती अडकल्याने तिचे नियोजित वेळापत्रक बिघडले आहे. कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी सुमारे पाऊण तास उशिराने धावत आहे. गोव्यात वरील चारही स्थानकावर ही गाडी थांबते. त्यामुळे या स्थानकांवर तिची तपासणी होणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्रिवेंद्रम ते कुर्ला दरम्यान नेत्रावती तब्बल ४३ स्थानकांवर थांबते. गोव्यातील बेत ऐनवेळी बदलून अतिरेकी अन्य स्थानकांवर उतरण्याची किंवा स्फोटके आणली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व स्थानकांवर नेत्रावतीची तपासणी होईल.
शुक्रवारी जयपूरहून एर्नाकुलमला निघालेली मरूसागर एक्सप्रेस तेथून परतीच्या प्रवासासाठी केरळहून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी जयपूरला जाण्यासाठी रवाना झाली. ही गाडी सोमवारपर्यंत उडविण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली होती. नियोजित वेळीच जरी ही गाडी सुटली असली तरी तपासणीमुळे तिचे वेळापत्रक कोलमडले आहे. ही गाडी गोव्यात केवळ मडगाव व थिवी या दोनच स्थानकांवर थांबा घेते, तर एर्नाकुलम ते जयपूर प्रवासात ती एकूण २७ स्थानकांवर थांबते.

No comments: