Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 25 September 2008

'कालिका ज्वेलर्स'वरील दरोड्याचा प्रयत्न फसला माशेलमधील घटना; मालकाचे प्रसंगावधान


माशेल दि. २४ (प्रतिनिधी) : येथील हमरस्त्यानजीक "हिराश्री' अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावरील नीलेश शिरोडकर (रा. करमळी) यांच्या मालकीच्या "कालिका ज्वेलर्स' या सराफी दुकानावर आज (दि. २४) सकाळी साडेअकराच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात दरोडेखोरांकडून दरोडा घालण्याचा प्रयत्न श्री शिरोडकर यांच्या प्रसंगावधानामुळे उधळला गेला.
सकाळी नित्याप्रमाणे श्री. शिरोडकर दुकानात आले तेव्हा समोरील रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती दुकानाकडे पाहून मोबाईलवर बोलत असल्याचे त्यांनी पाहिले. काही वेळाने एक सफेद इंडिका गाडी (क्र. ९९८९ - पूर्ण क्रमांकाची नोंद नाही) दुकानाच्या बाजूला उभी करून चौघेजण दुकानात शिरले. त्यांनी श्री. शिरोडकरशीे दागिन्यांविषयी कोकणीतून बोलणे सुरू केले.
अचानक त्या चौघातील एकाने श्री. शिरोडकर यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पटकन खाली बसले व मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला; पण बाहेरून प्रतिसाद न मिळाल्याने हाताशी असलेले नाव कोरण्याचे जड मशीन दुकानासमोरील दर्शनी काचेच्या दरावर फेकून मारले. त्यामुळे त्या दरवाजाची काच फुटून मोठा आवाज झाला. त्याबरोबर बाहेरून जाणाऱ्या लोकांचे लक्ष दुकानाकडे गेले. परिणामी दरोडेखोर गोंधळले. ते गोंधळल्याचे पाहून श्री. शिरोडकर यांनी आपल्या हाती दांडा घेऊन त्यांना मारायचा प्रयत्न केला असता एक दरोडेखोर पायऱ्यावरून खाली फुटलेल्या काचांवर पडून जखमी झाला. त्याला काचा लागल्याने रक्त वाहू लागले. तसेच त्यांच्या हाती असलेली नऊ इंच लांब सुराही तिथेच पडला. या स्थितीत त्या चौघांनी समोर उभ्या केलेल्या गाडीतून बेतकीच्या बाजूने पळ काढला.
सदर चारही युवक काल (दि. २३) संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान चोरीच्याच उद्देशाने दुकानात आले होते. मात्र दुकानात गिऱ्हाईके असल्याने त्यांचा तो प्रयत्न फसला असावा असे श्री. शिरोडकर यांनी सांगितले.
दरम्यान, काही मिनिटांत माशेलहून पोलिस कंट्रोल मोबाईल व्हॅन जाताना दुकानासमोर उपस्थित जमावाने अडवून त्यांना दरोड्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने ही घटना फोंडा पोलिस स्थानकाला कळवली. दुकानावर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची बातमी माशेल परिसरात पसरताच श्री. शिरोडकर यांचे मित्र तसेच इतर शेकडो ग्रामस्थ दुकानासमोर जमले.
यावेळी खासदार श्रीपाद नाईक आपला खांडोळा महाविद्यालयातील कार्यक्रम उरकून परतत असताना वाटेत गर्दी दिसल्यामुळे त्यांनी थांबून चौकशी केली. यावेळी उपस्थित जमावाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असलेल्या माशेलात पोलिस स्थानकाची नितांत गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तशी विनंती त्यांनी खासदार नाईक यांना केली. पुढील तपास फोंडा पोलिस करीत आहेत. घटनेचा पंचनामा फोंडा पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई आणि श्री. पेडणेकर यांनी केला.

याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एकाला "कालिका ज्वेलर्स'चे मालक नीलेश शिरोडकर यांनी ओळखल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: