Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 22 September 2008

शिरगावचा लढा आता अस्तित्वासाठी

खाणी पोखरतायत डोंगराला आणि गावकऱ्यांनाही
पणजी, दि. २१ (विशेष प्रतिनिधी) - शिरगावची शेतजमीन नापीक बनली आहे, भर पावसात सुकली आहे शिरगावची आयुर्वेदिक औषधी झर. विहिरीतील पाणी तळाला गेले आहे. शेतजमीन एवढी टणक बनली आहे आहे की, पावसाळा असूनही त्यावरून कोणीही सहज चालून जाऊ शकेल! यावर कळस म्हणजे शिरगाव-मुळगाव हा रस्ताच गायब झाला आहे! या विनाशाला कारणीभूत ठरला आहे तो तेथे हातपाय पसरत चाललेला खाणव्यवसाय. कोणताही धरबंध नाही, खनिजासाठी किती खोलवर पोखरत जावे यावर मर्यादा नाही.अशा स्थितीत हा गाव वाचेल का, त्याचे अस्तित्व राहील का, असा प्रश्न आज तेथील जागरूक लोक डोळ्यांत पाणी आणून विचारत आहेत. डोंगराच्या स्वरूपात असलेले "शिर'तर कापले गेलेच आहे, आता "गाव'तरी राहील का, अशी चिंता शिरगावचे रहिवासी व्यक्त करीत आहेत.
शिरगावचे नाव घेतले की आठवत असते तेथील जागृत देवता श्रीलईराई.आता शिरगावची ही ओळख मागे पडत चालली आहे. याचा अर्थ देवी लईराईचा महिमा कमी झाला असा नाही तर खाण व्यवसायाने हा गाव अक्षरशः गिळंकृत केला आहे. त्यामुळे तेथील मोजक्या जागरूक मंडळींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आपला गाव वाचविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तेथील नेमकी समस्या काय आहे, ते समजून घेण्यासाठी "गोवादूत'च्या खास पथकाने शिरगावला भेट दिली. तेथे दिसले ते असहाय्यपणे आपल्या समस्या मांडणारे रहिवासी. एकाकीपणे खाण आणि सरकारशी लढा देत आपले आणि गावाचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडणारे जीव! जर आताच आम्ही या संकटाशी दोन हात करण्याचे प्रयत्न केले नाहीत तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही, अशी कैफियत त्यातील एकाने मांडली तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. खोलवर गेलेल्या खाणीत साचलेले पाणी खाण कंपन्या उपसून गावाला असलेला कथित धोका दूर करण्याचा आभास निर्माण करीत आहेत. प्रत्यक्षात हे पाणी गावच्या भूपातळीखाली आहे. ते उपसल्याने गावातील तळी, विहिरी आणि नाल्यांचे पाणी त्या दिशेला वळले आहे, याकडे लक्ष देण्याची कोणाचीच तयारी नाही. खाणीतील पाणी उपसून ते थेट भूमिगत वाहिन्यांद्वारे नदीत सोडले जात आहे. ही पाण्याची पातळी कमी झाली की गावातील विहिरीही सुकायला लागतात. कधीही न आटलेली आयुर्वेदिक पाण्यासाठी प्रसिद्ध असलेली झर गेले काही महिने भर पावसात कोरडी पडली आहे. बाजूचे माड "शिर'च नष्ट झाल्याने निश्चल आणि निराकार बनले आहेत. ही सारी विदारक कहाणी ऐकून व पाहून कोणाचेही डोके सणसणून जावे. तेथील "कासवाचे पेडाकडील तळे'ही सुकले आहे. सुमारे ४० ते ५० मीटर खोल खोदलेल्या खाणीत साचलेले पाणी पावसाचे नसून, ते गावातील झऱ्यांचे आहे, या गावकऱ्यांच्या दाव्यात बरेच तथ्य असल्याचे तेथे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दिसून येते. गावातील अनेक झरे आटले आहेत, पाण्याचे स्रोत सुकले आहेत. विहिरींतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. असे असताना खाणीत साचलेले पाणी उपसण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा खटाटोप का चालला आहे, या प्रश्नालाही गावकऱ्यांकडे उत्तर आहे. हे पाणी गावासाठी धोका उत्पन्न करीत नाही; पण खाण व्यवसायात मात्र व्यत्यय निर्माण करते आहे.त्यासाठी गरज नसताना ते उपसून गावाला वेठीस धरून वाया घालविले जात आहे! खाणी खोलवर खोदण्यात आल्या असताना बाजूला असलेल्या कठड्याच्या ठिकाणीही खनिज शोधले जात आहे. तेथेही ट्रकांची ये-जा सुरू आहे. हा प्रकार म्हणजे मढ्याच्या टाळूवरील लोणी चाटण्यासारखाच, म्हटला पाहिजे.
शिरगाव ते मुळगावच्या रस्त्याची कथा तर अजबच! हा रस्ता तेथे होता हे सांगूनही खरे वाटणार नाही. कारण तेथेच आज खाण सुरू असून पाण्याचे प्रचंड तळे निर्माण झाले आहे. त्यात रस्ता कधीच गायब झाला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याला याची माहिती नसेल असे कसे म्हणायचे? रहदारीचा रस्ता अशा प्रकारे गडप व्हावा आणि सरकारी यंत्रणेला त्याचा पत्ताही नसावा, हे शक्य आहे काय? एरवी रस्त्याचा एखादा दगड जरी हलवला तरी सामान्य माणसाला वेगळ्या अर्थाने सरकारकडून रस्त्यावर आणले जाते; पण येथे तर खाणीने अख्खा रस्ताच गिळंकृत करूनही कोणावरच कारवाई नाही. अस्नोड्याजवळच्या या खाणीजवळ मोठे तळे निर्माण झाले आहे. त्याजवळच नाला आहे, "पोय'आहे. तेथेही येथील पाणी घुसते आहे. नदीनाले केवळ दूषित होत आहे असे नाही तर तेथे पाण्याबरोबर मातीही वाहत जात असल्याने ते काही महिन्यांनी बुजले तर आश्चर्य वाटायला नको. खाणींनी शिरगाववर आणलेले संकट कसे दूर होऊ शकेल?
शिरगावचे लोक म्हणतात की, खाणमालकांनी आता आम्हाला पोखरणे बंद करावे! माती मिळावी म्हणून गावाला ते किती खोलवर खोदणार आहेत? त्यासाठी कोणतेच नियम-कायदे नाहीत का? यावर कोणाचेच नियंत्रण नाही का? मन मानेल तसे डोंगर कापायला, बिनकामाची माती माथ्यावर टाकायला संमती कोण देतो? ही माती गावावर कोसळली तर? पाणी साचून बनलेल्या तळ्याचा कठडाही आता का पोखरला जात आहे? मात्र पाण्यामुळे तळ्याचा बांध फुटून पाणी खाली गावात घुसण्याची भीती घालून वास्तवाचा विपर्यास केला जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच, शिरगावचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जेथे पाणी नाही, आरोग्य नाही अथवा शेतजमीन सुपीक नाही, तो कसला गाव म्हणायचा? याच तीन बाबी तर कोणत्याही गावाची लक्षणे आहेत. तीच जेथे नाहीत, त्या शिरगावचे भवितव्य काय? याचे उत्तर कोण देऊ शकेल?

No comments: