Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 21 September 2008

"मरूसागर'ची गोव्यात कसून तपासणी
खास सुरक्षेसह गाडी एर्नाकुलमला रवाना

पणजी, दि. २० (विशेष प्रतिनिधी) - अतिरेक्यांकडून बॉंबने उडवून देण्याची धमकी मिळालेली जयपूर एर्नाकुलम ही "मरूसागर एक्सप्रेस' आज सायंकाळी तब्बल दोन तास उशीरा गोव्यात दाखल झाली. थिवी रेलस्थानकावर दाखल होताच गोव्यातील सुरक्षा यंत्रणांनी गाडीचा ताबा घेत तिची कसून तपासणी केली. पुढे मडगाव स्थानकावरही सुरक्षा यंत्रणांनी तिची पुन्हा झडती घेतली. यावेळी बॉंब निकामी पथक तसेच श्वानपथकाचाही वापर करण्यात आला. या मोहिमेत असंख्य सुरक्षाकर्मींनी भाग घेतला. मडगावहून कारवारकडे जाण्यासाठी नंतर गोवा पोलिसांकडून तिला विशेष सुरक्षा कवचही पुरवण्यात आले.
मरूसागर एक्सप्रेस बॉम्बने उडवून देण्याच्या अतिरेक्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जयपूरहून निघालेल्या २९७७ डाऊन या गाडीची कडेकोट विविध स्थानकांवर तपासणी करण्यात आली गेली. ही तपासणी सदर गाडी शेवटच्या स्थानकावर (एर्नाकुलम) पोचेपर्यंत सुरूच राहाणार आहे. परिणामी या गाडीचे नियोजित वेळापत्रक कोलमडले असून ती सुमारे दोन तास विलंबाने धावत आहे. अतिरेक्यांच्या धमकीमुळे ही गाडी नियोजित स्थानकावर पोहोचेपर्यंत तिला कायम कडक सुरक्षा कवच पुरवले जाणार आहे.
आज या गाडीची सकाळी महाराष्ट्रात वसई व पनवेल या स्थानकांवर तर तेथून पुढे वीर आणि रत्नागिरी स्थानकावर तपासणी झाली. तत्पूर्वी सकाळी ५ वाजता पोचणाऱ्या या गाडीने आज सकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी पनवेल स्थानक गाठले व सुरक्षा यंत्रणेने हिरवा कंदील दाखविल्यानंतर तिने ६ वाजून ५ मिनिटांनी पवनेल स्थानक सोडले.
पनवेल रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीच्या तपासणीसाठी पोलिस, राखीव पोलिस दलाचे जवान, अधिकारी मिळून सुमारे पंचावन्न सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मरूसागरची तपासणी केली. त्यानंतर राखीव पोलिस दलाचा एक अधिकारी व त्यांच्या नेतृत्वाखालील ९ अन्य सुरक्षा रक्षकांनी या गाडीला चिपळूण पर्यंत सुरक्षा कवच पुरविले. तेथून पुढे चिपळूणच्या पोलिसांनी या गाडीला सुरक्षा पुरवली. पोलिस संरक्षणातच ही गाडी गोव्यात दाखल झाली.
गोव्यात थिवी तसेच मडगाव स्थानकांवर बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वानपथक काल रात्रीपासूनच डेरेदाखल झाले होते. थिवीला ही गाडी केवळ दोन मिनिटे थांबा घेते. तथापि, तेथे तिची कसून तपासणी झाली. तेथून उत्तर गोवा पोलिसांच्या संरक्षणात ती मडगाव स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा अर्थात दुपारी ३.३० वाजता दाखल झाली. त्यानंतर पुन्हा या गाडीची तपासणी झाली. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता गाडीला मडगाव स्थानक गाठण्यास विलंब झाल्याची माहिती त्यांनी दिली.
या गाडीच्या प्रत्येक डब्याची श्वानपथकाच्या साहाय्याने कसून तपासणी केली जात आहे. मडगाव स्थानकावर गाडीच्या तपासणीसाठी मडगाव शहर पोलिसांबरोबच पणजी, मायणा कुडतरी, रेल्वे पोलिस व राखीव पोलिस दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तब्बल वीस पंचवीस मिनिटे तपासणी केल्यावर गाडी पुढच्या मार्गाला लागली.
कर्नाटकातील पहिले स्थानक गाठेपर्यंत गाडीला गोवा पोलिसांकडून सुरक्षाकवच पुरविण्यात आले होते. कर्नाटक पोलिसांनी गाडीची तपासणी त्यांच्या हद्दीत सुरू केल्यावर व त्यांचा एस्कॉर्ट या गाडीला पुढच्या प्रवासासाठी लाभल्यावर गोव्याचे पथक माघारी परतले. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीने संध्याकाळी ५ च्या दरम्यान कारवार गाठले होते.
दरम्यान, गोव्यात रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांनी कमालीची दक्षता बाळगली आहे. मरूसागर उडविण्याची धमकी दिली असली तरी इतर गाड्यांबाबतही जोखीम न पत्करता कडेकोट सुरक्षा येथील रेल्वे स्थानकांवर ठेवण्यात आली आहे. विविध गाड्यांमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या सामानाचीही कसून तपासणी केली जात आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. २९७७ डाऊन हीच गाडी २९७८ अप बनून उद्या (रविवारी) एर्नाकुलमहून जयपूरला जाण्यासाठी निघेल. त्यावेळीही पुन्हा या गाडीची अशीच कसून तपासणी केली जाणार आहे.

No comments: