Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 3 February 2009

चंद्रकांत केणी यांचे देहावसान

मडगाव,दि.२ (प्रतिनिधी) : गोमंतकीय पत्रकारिता क्षेत्रातील मुकुटमणी गणले जाणारे ज्येष्ठ पत्रकार, राष्ट्रमत व सुनापरांत या दैनिकांचे माजी संपादक तथा थोर साहित्यिक चंद्रकांत शांताराम केणी यांचे आज पहाटे येथे दुःखद देहावसान झाले. ते ७५ वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने येथील व्हिंटेज इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच आज पहाटे ५-३० वाजता त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
केणी यांच्या मागे पत्नी विनोदिनी,कन्या उर्विजा हर्ष भाटकुली व प्रज्ञा अभित नायक व नातू वेद व पार्थ असा परिवार आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गोवा मुक्तीनंतर राज्याच्या जडणघडणीत सामाजिक व सांस्कृतिक आदी क्षेत्रातील केणी यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे श्री.पर्रीकर यांनी सांगितले.
मुक्तीनंतर गोव्याच्या सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान दिलेल्या केणी यांच्या निधनाचे वृत्त सकाळी वाऱ्यासारखे पसरले व त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घोगळ येथील निवासस्थानी चाहत्यांची एकच गर्दी उसळली. तत्पूर्वी व्हिंटेजमधून त्यांचे पार्थिव घोगळ येथील त्यांच्यास्थानी नेण्यात आले होते.
दुपारी मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुतणे पांडुरंग वैकुंठ केणी यांनी चितेस मंत्राग्नी दिला.यावेळी समाजाच्या सर्व थरांतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यांत माजी परराष्ट्र राज्य मंत्री एदुआर्द फालेरो,दत्ता दामोदर नायक व दत्ता श्री. नायक, दामोदर नरसिंह नायक, रामनाथ कारे, महादेव काकोडकर, पुंडलिक केणी, प्रशांत केणी, उदय भेंब्रे, कोकणी अकादमीचे अध्यक्ष एन. शिवदास, पुंडलिक नायक, गुरुनाथ केळेकर,दिलीप बोरकर,रमेश वेळुस्कर, नागेश करमली, सुरेश काकोडकर,डॉ.आंतोन रॉड्रगिस, डॉ. जगदीश रायकर, डॉ.कादंबरी व डॉ. कुलकर्णी, शाणू पै पाणंदीकर, डॉ. जगन्नाथ भिंगी, शांताराम कंटक, दिलीप गायतोंडे. चंद्रकांत प्रभू, उल्हास पै भाटीकर ,पत्रकार , उद्योजक ,केणी यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळपासून केणी यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. सकाळी अंत्यदर्शन घेणाऱ्यात सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव,आमदार दामू नाईक ,नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो, नगरसेवक रामदास हजारे, राजू शिरोडकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण फोंडेकर,डॉ. जगदीश रायकर,गोवा सारस्वत समाजाचे अध्यक्ष शाणू पै पाणंदीकर, वीणा पै पाणंदीकर, मठग्रामस्थ सारस्वत समाजाचे अध्यक्ष डॉ. देश प्रभूदेसाई ,माजी आमदार विनय तेंडुलकर,भाजपचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार नरेंद्र सावईकर, दामोदर आडपईकर, कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांचा समावेश होता.
दुपारी विधानसभा कामकाज काही काळासाठी तहकूब केल्यावर मुख्यमंत्री दिगंबर कामत व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी मडगावात येऊन अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्रे वाहिली. नंतर कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड कुलासो यांनीही अंत्यदर्शन घेतले.नंतर मात्र अंत्यदर्शन घेणाऱ्यांची एकच रीघ लागून राहिली ती अंत्यसंस्कारासाठी मृतदेह बाहेर काढेपर्यंत कायम होती. यावेळी सुनापरांत या वृत्तपत्रातर्फे संपादक अनंत साळकर तसेच बाबली नायक उल्हास नायक तसेच व्ही. एम. साळगावकर समूहातर्फे बेणे, "गोवादूत'चे संपादक राजेंद्र देसाई, सरव्यवस्थापक ज्योती धोंड, मुख्य उपसंपादक प्रमोद प्रभुगावकर, कोकणी साहित्य परिषदेतर्फे गोकुळदास प्रभू यांनी पुष्पचक्रे वाहिली. धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी जातीने येऊन अंत्यदर्शन घेतले. गोमेकॉचे डॉ.राजन कुंकळयेकर,माजी खासदार रमाकांत आंगले, प्रशांत केणी, डॉ. पांडुरंग घाणेकर, सुरेश बोरकर,मीना काकोडकर,परेश जोशी, डॉ.दिनेश वेलिंगकर यांचाही अंत्यदर्शन घेणाऱ्यांत समावेश होता.
२६ नोव्हेंबर १९३४ मध्ये कासावली येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या केणी यांचे बालपण तेथेच गेले. नंतर ते मडगावात आले व त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथील पोप्युलर हायस्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच त्यांना लेखनाची व साहित्याची आवड होती.पम त्याला वाव मिळाला तो ते नंतर मुंबई आकाशवाणीवर आल्यावर. तेथून त्यांना दिल्ली आकाशवाणीवर जाण्याची संधी मिळाली. मुंबईत असताना त्यांचा रवींद्र केळेकरांशी संपर्क आला व त्यांच्या एकंदर जीवनालाच कलाटणी मिळाली. केळेकरांमुळे त्यांचा काकासाहेब कालेलकरांशी व त्यांच्यामुळे पं. नेहरु व इंदिरा गांधींशी त्यांचा संपर्क आला. नेहरुंनी त्यांची विदेश व्यवहार खात्यात नियुक्तीही केली होती. गोवा स्वातंत्र्य आंदोलनाबाबतची वृत्ते नेहरुंना पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यातून त्यांना भारत रक्षक समाजात स्थान मिळाले . गोवा स्वतंत्र झाल्यावर ते गोव्यात आले व त्यांनी त्या समाजाचे काम गोव्यात चालविले . जनमत कौलावेळी सुरु झालेल्या राष्ट्रमत या मराठी वृत्तपत्रातून त्यांनी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याचा डाव हाणून पाडला. तो एक ऐतिहासिक प्रसंग म्हणून नोंद झालेली आहे. नंतर गोव्यातील अनेक राजकीय व सामाजिक तसेच भाषिक स्थित्यंतरात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोकणीला मिळालेली घटना मान्यता , राजभाषा दर्जा व गोव्याला लाभलेला घटकराज्याचा दर्जा यांत त्यांचे मोठे योगदान होते.
गोव्यात भूमिपुत्राशी होणारी अवहेलना, त्यातून उद्भवणारे संकट याचा इशारा त्यांनी २५ वर्षांपूर्वी दिला होता व आज त्याचेच प्रत्यंतर येत आहे. राष्ट्रमतचे संपादक व सुनापरांत या कोकणी दैनिकाचे संपादक या नात्याने त्यांनी बजावलेली भूमिका संस्मरणीय ठरली. मठग्रामस्थ हिंदू सभा, पर्तगाळी मठ , गोवा सारस्वत समाज, कोकणी भाशा ंमंडळ , अ.भा. कोकणी साहित्य परिषद ,इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, अनिवासी भारतीय कक्ष गोवा अशा अनेक संस्थांवर काम करताना त्यांनी आपल्या वेगळ्या कर्तृत्वशैेलीचा ठसा उमटविला. पर्तगाळी मठाचा ऐतिहासिक ठरलेला पंचशताब्दी महोत्सव असो वा तेथील अन्य कोणताही कार्यक्रम असो त्यामागील कल्पना केणी यांचीच असायची.
व्हकल पावणी या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. त्यानंतर त्यांना अगणित पुरस्कार मिळाले, त्यांत गोमंत शारदा व कला सन्मान यांचा समावेश होतो. आपल्या हयातीत त्यांनी अगणित लेखन केले व शरीर साथ देईपर्यंत लेखणी चालूच ठेवली. कुळागर , ऋतू, त्रिवेणी अशी नियतकालिके त्यांनी सुरु केली व ती सातत्याने चालू ठेवली.

No comments: